उस्मानाबाद ः येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाला नुकतीच राज्यमंत्रीमंडळाची मंजुरी मिळाली. हे महाविद्यालय, रुग्णालय अजून उभे राहिले नाही तोच, त्याला नाव देण्यावरून आता वादाला सुरूवात झाली आहे. तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी या महाविद्यालयास स्वातंत्र्यसेनानी भाई उद्धवराव पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्री तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत, असे देखील राणा पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर म्हटले आहे.
राणापाटील यांनी ही पोस्ट केल्यानंतर त्यांच्या या मागणीवर वेगवेळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे. स्वातंत्र्यसेनानी भाई उद्धवराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमात आमदार राणा पाटील यांनी उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला उद्धवराव पाटील यांचे नाव देण्या संदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले. तसेच यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
राणापाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, उस्मानाबादचे वैभव व श्रमिकांचे नेते म्हणून महाराष्ट्रभर ओळख असलेल्या भाई उद्धवराव पाटील यांच्या कार्याचे स्मरण कायम रहावे व यातून कार्याची प्रेरणा सतत मिळावी यासाठी उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वातंत्र्यसेनानी भाई उद्धवराव पाटील यांचे नाव देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे रीतसर मागणी करून पाठपुरावा करण्यात येणार आहे. अनेक वर्षांच्या नियोजनबद्ध परिश्रमानंतर मंजूर झालेल्या या महाविद्यालयाला दादांचे नाव देणे सार्थ राहील. या अनुषंगाने जिल्हा परिषद उस्मानाबाद, नगर परिषद उस्मानाबाद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे ठराव घेण्याचे देखील ठरले आहे.
उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी पुढील आठवड्यात बारामती येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा अभ्यास दौरा करण्याचे देखील ठरले आहे. राजकारण विरहित विकासासाठी सर्वांनी एकत्रितरीत्या काम करणे हीच खऱ्या अर्थाने स्व.भाई उद्धवराव (दादा) पाटील यांना आदरांजली ठरेल.
या पोस्टनंतर आता त्यावर प्रतिक्रिया उमटायाला सुरूवात झाली असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, तुळजा भवानी वैद्यकीय महाविद्याल नाव द्यावे, असेे सूचवण्यात आले आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे नाव या नव्या वैद्यकीय महाविद्यालयाला देण्याची मागणी करण्यात आली होती, त्याला राणाजगजीतसिंह पाटील यांचा विरोध आहे का? अशी विचारणा देखील कमेंटमध्ये करण्यात आली आहे.
Edited By : Jagdish Pansare

