आदित्य ठाकरेंच्या हस्ते औरंगाबादेत विकासकामांचे लोकार्पण ; काॅंग्रेस, राष्ट्रवादीला निमंत्रण नाही.. - Dedication of development works in Aurangabad by Aditya Thackeray; Congress, NCP are not invited. | Politics Marathi News - Sarkarnama

आदित्य ठाकरेंच्या हस्ते औरंगाबादेत विकासकामांचे लोकार्पण ; काॅंग्रेस, राष्ट्रवादीला निमंत्रण नाही..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 जानेवारी 2021

१२ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण वगळता इतर कुणीही नव्हते. काॅंग्रेसला तेव्हा देखील निमंत्रण नव्हते, असे सांगितले जाते. आता पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांना डावलून शहरात झालेल्या व भविष्यात होऊ घातलेल्या विकासकामांचे श्रेय एकटी शिवसेना घेऊ पाहत असल्याचे बोलले जाते.

औरंगाबाद ः शहरातील १६८० कोटींच्या पाणी पुरवठा योजनेसह रस्ते, आणि बाळासाहेब ठाकरे स्मृती वन, सफारी पार्कसह विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन १२ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. आता १६ जानेवारी शनिवारी राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अनेक विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. परंतु हा कार्यक्रम दोन दिवसांवर आलेला असतांना देखील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांना निमंत्रण मिळाले नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजी आहे.आधी मुख्यमंत्र्यांच्या आणि आता आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात डावलेले जात असल्याची भावना काॅंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आहे.

औरंगाबाद की संभाजीनगर या मुद्यावरून काॅंग्रेस विरुद्ध शिवसेना असे चित्र राज्यभरात निर्माण झाले आहे. अशातच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांकडून शहरातील विविध विकासकामांच्या भूमीपुजन व लोकार्पणाचा धडका सुरू आहे. आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अनेक विकासकामांचे भूमीपूजन येत्या शनिवारी (ता.१६) होत आहे. परंतु काॅंग्रेस- राष्ट्रवादीला अशा कार्यक्रमांना डावलले जात असल्याचा आरोप होत आहे. शिवसेनेने मात्र हे आरोप फेटाळत हा कार्यक्रम पक्षाचा नसून महापालिकेचा आहे, असे म्हणत यावर अधिक भाष्य टाळले.

राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढायच्या असा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत याची अंमलबजावणी देखील झाली. पण पुढील काळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत तीन्ही पक्षांनी आपापल्या पक्षाची वाढ करण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्याचे म्हणत स्वबळाची तयारी सुरू केली आहे. औरंगाबाद महापालिकेत काॅंग्रेसचे संपर्कमंत्री असलेल्या अमित देशमुख आणि काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील ही निवडणुक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

त्यामुळे राज्याच्या सत्तेत एकत्र असलेले हे पक्ष आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार का? हे पहावे लागेल. याचाच परिणाम म्हणून की काय, शिवसेनेकडून आतापासूनच काॅंग्रेस-राष्ट्रवादीला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. १२ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण वगळता इतर कुणीही नव्हते. काॅंग्रेसला तेव्हा देखील निमंत्रण नव्हते, असे सांगितले जाते. आता पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांना डावलून शहरात झालेल्या व भविष्यात होऊ घातलेल्या विकासकामांचे श्रेय एकटी शिवसेना घेऊ पाहत असल्याचे बोलले जाते.

विकास प्रश्नावर नागरिकांशी संवाद..

कांचनवाडी येथील बायोगॅस प्रक्रिया आणि युएनडीपी ड्राय वेस्ट सेंटरचे लोकार्पण, क्रांतीचौक येथील सायकल ट्रँकचे लोकार्पण, स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत पोलिस आयुक्त कार्यालयाजवळ असलेले कमांड आणि कंट्रोल सीसीसी सेंटर, टीव्ही सेंटर येथील मिनी स्टेडियम आणि बीओटी शॉपिंग कॉम्प्लेक्सचे लोकार्पण शनिवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत आदित्य ठाकरे व पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. 

तसेच अमरप्रित चौक येथील स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या म्युरलचे अनावरणही  आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. पाच वर्षांपूर्वी या कामासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. एक टर्म गेल्यानंतर आता हे काम पूर्ण झाले आहे. यासोबतच  पडेगाव कचरा प्रक्रिया केंद्र, स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत रेल्वेस्टेशन येथील आऊटडोअर डिस्प्ले लोकार्पण, बसवे आणि शंभर बस थांब्यांचे भूमिपूजन, चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे शहराच्या विकासाच्या प्रश्नावर मोजक्या नागरिकांशी हॉटेल रामा इंटरनँशनल येथे सायंकाळी ६ वाजता संवाद साधणार आहेत.

Edited By : Jagdish Pansare

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख