आमचे नाना क्रांतीकारी, त्यांच्यामुळे मोदींचाही थरकाप व्हायचा.. - Congress president Nana patole revolutionaries, Says Aschok Chavan | Politics Marathi News - Sarkarnama

आमचे नाना क्रांतीकारी, त्यांच्यामुळे मोदींचाही थरकाप व्हायचा..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

आताचे नाना खऱ्या अर्थाने आधुनिक काळातले क्रांतीकारी आहेत, ज्यांच्यामुळे तिकडे मोदींचाही थरकाप उडायचा. बेधडक निर्णय घेण्याची त्यांची क्षमता निश्चितच कौतुकास्पद आहे. अशा नानांनी आज प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार घेतला.

मुंबई ः काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा ज्यांनी सांभाळली ते आमचे नाना म्हणजे क्रांतीकारी आहेत. मला दोन नाना माहित आहेत, एक क्रांतीवीर चित्रपटातले नाना पाटेकर, दुसरे नाना पटोले. तिसरे आमच्या घरातच होते म्हणून मी त्यांचा उल्लेख करणार नाही. पण नाना पटोले हे देखील धडाकेबाज निर्णय घेणारे क्रांतीकारी आहेत, ज्यांच्यामुळे मोदींचाही थरकाप व्हायचा, अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री काॅंग्रसचे नेते अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उल्लेख केला.

राज्यातील काॅंग्रेसची धुरा माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. त्यानंतर मुंबईतील क्रांती मैदानात झालेल्या काॅंग्रेस प्रदेशच्या अधिवेशनात माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून नाना पटोले यांनी सुत्रे हाती घेतली. यावेळी मोदी चलेजावचा नारा देखील देण्यात आला. काॅंग्रेसच्या सर्वच नेत्यांनी यावेळी आपल्या भाषणातून नाना पटोले यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात नाना पटोले यांचा उल्लेख क्रांतीकारी असा केला. चव्हाण म्हणाले, धडाकेबाज निर्णय घेणारे नाना आता पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना फक्त डायरेक्शन देत नाहीत, तर ते आता अॅक्शनमध्ये देखील आले आहेत. पक्षाला शिस्त असली पाहिजे, या भावनेतून सत्कारमुर्ती असतांना देखील ते जागेवरून उठून काॅंग्रेस कार्यकर्त्यांना सूचना देत होते. त्यांच्या कामाचा धडाका आता कुठे सुरू झाला आहे.

मला जे दोन नाना माहित आहेत त्यात नाना पाटेकर जे आपल्या क्रांतीवीर चित्रपटातील भूमिकेतून सगळ्यांना माहित आहेत, शिवाय त्यांचा देखील स्वभाव तडकफडक जे आहे ते स्पष्टपणे बोलून मोकळे होणार असाच. तर दुसरे क्रांतीकारी नाना ज्यांना आपण सगळेच ओळखतो. त्यांच्या कामगिरीबद्दल तर वादच नाही ते जागतिक स्तरावरचे नेते होते.  तिसरे नाना माझ्या घरातच होते, त्यांच्याबद्दल मी अधिक बोलणार नाही.

पण आताचे नाना खऱ्या अर्थाने आधुनिक काळातले क्रांतीकारी आहेत, ज्यांच्यामुळे तिकडे मोदींचाही थरकाप उडायचा. बेधडक निर्णय घेण्याची त्यांची क्षमता निश्चितच कौतुकास्पद आहे. अशा नानांनी आज प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार घेतला, त्याच्या नेतृत्वाखाली काॅंग्रेसची राज्यातील वाटचाल दमदार असेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी नाना पटोल यांना शुभेच्छा दिल्या.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख