दीड महिन्यात मुख्यमंत्री ठाकरे दुसऱ्यांदा औरंगाबादेत; उद्या जिल्हा क्रिडा संकुलाचे भुमीपूजन.. - Chief Minister Thackeray in Aurangabad for the second time in a month and a half; Bhumi Pujan of District Sports Complex tomorrow .. | Politics Marathi News - Sarkarnama

दीड महिन्यात मुख्यमंत्री ठाकरे दुसऱ्यांदा औरंगाबादेत; उद्या जिल्हा क्रिडा संकुलाचे भुमीपूजन..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल तेव्हा येईल, पण त्या निमित्ताने औरंगाबादकरांचे वर्षानुवर्षांपासून रखडलेली विकासकामे आणि प्रकल्प मार्गी लागत आहेत, हे ही नसे थोडके..

औरंगाबाद ः निवडणुका आल्या म्हणून विकासकामे करायची नाहीत का? असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा औरंगाबादेत येत आहेत. उद्या (ता.५) रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा क्रिडा संकुलाचे भुमीपूजन होणार आहे. तसेच  पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या जलकुंभाच्या कामाची देखील ते पाहणी करणार आहेत.

डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादेत १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेसह, दीडशे कोटींचे रस्ते, सफारी पार्क, बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन व स्मारकाचे भुमीपूजन केले होते. तेव्हा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही उद्घाटने आणि भूमीपुजन केली जात आहेत का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर निवडणुका आल्या की विकासकामे करायची नाहीत का? असे म्हणत त्यांनी टीकाकारांना उत्तर दिले होते.

त्यांनतर पंधरा दिवसांपुर्वीच राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील शहरातील अनेक विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले होते. आदित्य ठाकरेंचा दौरा होत नाही तोच, आता उद्या मुख्यमंत्री पुन्हा विकासकामांच्या निमित्ताने शहरात येत आहेत. सकाळी ८ वाजेपासून त्यांचा दौरा सुरू होणार असून या दरम्यान ते जिल्हा क्रिडा संकुलाचे भुमीपूजन, जलकुंभाच्या कामाची पाहणी व जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी दोन वाजता ते पुन्हा मुंबईला रवाना होणार आहेत.

मुख्यमंत्र्याचा औरंगाबाद आणि लोणार हा अवघ्या सहा तासांचा दौरा असणार आहे. शिवसेनेकडून कितीही दावा केला जात असला तरी ज्या पद्धतीने विकासकामांचे भुमीपूजन आणि उद्घाटने सुरू आहेत, त्याचा थेट संबंध आगामी महापालिकेशी जोडला जाणे सहाजिकच आहे. दोन महिन्यात मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांचे शहरातील दौरे, बैठका, कार्यक्रमांचा वेग पाहता शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे असेच म्हणावे लागेल.

कोरोनामुळे आधीच लांबलेली महापालिकेची निवडणूक वार्ड रचना आणि आरक्षणाच्या वादामुळे आणखीन पुढे ढकलली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयातील याचिका, त्यावरील सुनावणी व निर्णय होईपर्यंत महापालिका निवडणुकीचा नारळ फुटणे शक्य नाही. वार्ड रचना व आरक्षणा संदर्भातील सुनावणी आता मार्च महिन्यात होणार असल्याचे महापालिकेच्या निवडणुका थेट पावसाळ्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल तेव्हा येईल, पण त्या निमित्ताने औरंगाबादकरांचे वर्षानुवर्षांपासून रखडलेली विकासकामे आणि प्रकल्प मार्गी लागत आहेत, हे ही नसे थोडके..

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख