उस्मानाबाद ः महाराष्ट्रात विरोधी पक्षाचे सरकार आहे, त्यामुळे अर्थसंकल्पात तरतूद करतांना केंद्र सरकारने हात आखडता घेतला आहे. महाराष्ट्रावर असलेला रागच यातून व्यक्त करण्यात आल्याची तिखट प्रतिक्रिया शिवसेना आमदार कैलास घाडगे पाटील यांनी व्यक्त केली आहे. दिशाहीन आणि अर्थ नसलेला हा अर्थसंकल्प असल्याची टीका देखील त्यांनी केली.
केंद्राच्या बजेटवर राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून या अर्थसंकल्पाचे कौतुक होत असले तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी मात्र केंद्राने राज्यात सत्ता नसल्याचा सूड उगवल्याचे म्हटले आहे.
शिवसेना आमदार कैलास घाडगे पाटील यांनी देखील या बजेटबद्दल नाराजी व्यक्त केली. पाटील म्हणाले. महाराष्ट्रात सरकार विरोधी पक्षाचे असल्याचा राग केंद्र सरकारने अर्थसंकल्पातुन दाखवुन दिला आहे. नाशिक व नागपुर मेट्रो वगळता राज्याला अर्थसंकल्पातुन काहीच मिळालेले नाही. शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे भव्य स्वप्न दाखवून शेतकर्यांना खूश करण्याचे काम अर्थमंत्र्यांनी गेल्यावर्षी केले होते. त्यासाठी काय करणार याविषयी तेव्हाच्या आणि आताच्या अर्थसंकल्पात देखील काहीच भाष्य करण्यात आलेले नाही.
देशाला दिवसा स्वप्न दाखवणारी केंद्राची भुमिका घातक ठरण्याची भिती वाटते, २० लाख शेतकर्यांना स्वतंत्र सौरपंप बसवण्यासाठी निधी देण्याचे आश्वासनही गेल्यावेळी दिले. सौरपंप बसवण्यासाठी १५ लाख शेतकर्यांना आर्थिक साह्य केले जाईल, असेही सांगितले होते. त्यातील किती योजना यशस्वी झाल्या, शेतकर्यांना याचा किती फायदा झाला? याचे उत्तरही देशाला मिळाले नाही.
गेल्या वर्षी शेती क्षेत्रासाठी १५ लाख कोटी कृषी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निर्धारित केले होते. तसेच शेतकर्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे ध्येय ठेवून १६ कलमी कार्यक्रमही त्यांनी जाहीर केला होता, ते तर झालचं नाही, पण यावेळी तर शेतकरी अर्थसंकल्पातुन गायबच झाल्याचे दुर्देवी चित्र आहे. एकाच वाक्यात अर्थसंकल्पाचे विश्लेषण करायच झाल तर , दिशाहीन तसेच 'अर्थ' नसलेला संकल्प असेच करावे लागेल, अशी टीकाही कैलास पाटील यांनी केली.
Edited By : Jagdish Pansare

