राज्यमंत्री सत्तारांच्या मतदारसंघात भाजपच्या कमळाचीही चलती; ५३ ग्रामपंचायती ताब्यात.. - BJP's lotus is also moving in the constituency of Minister of State Sattar; In the possession of 53 Gram Panchayats. | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यमंत्री सत्तारांच्या मतदारसंघात भाजपच्या कमळाचीही चलती; ५३ ग्रामपंचायती ताब्यात..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

तांडाबाजार ग्रामपंचायत ही २५ वर्षांपासून भाजपा प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी यांच्या ताब्यात आहे.  परंतु २०१५ साली ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यामुळे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात गेली होती, आता त्यांच्या ताब्यातून भाजपने ही ग्रामपंचायत पुन्हा खेचून आणली आहे.

सिल्लोड ः महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार विरुद्ध भाजप या दोन पक्षांच्या पॅनलमध्ये सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील १०३ ग्रामपंचायतींमध्ये सामना रंगला होता. सत्तार यांच्याकडून ५७ ग्रामपंचायतींवर भगवा फडकवल्याचा दावा केल्यानंतर भाजपने देखील ५३ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच-उपसरंपच केल्याचा दावा केला आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्वतः प्रत्येक गावात प्रचार करून देखील मतदारांनी भाजपला घवघवीत यश दिल्याचे भाजपने म्हटले आहे. 

ग्रामंपचायत निवडनुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वाधिक सरंपच- उपसरपंच केल्याचा दावा करत शिवसेनेने नवनिर्वाचित सरपंच-उपसरंपचाचे सत्कार देखील केले. मात्र मतदारांनी त्यांना नाकारल्याचे सांगत भाजपने आपल्या ताब्यात आलेल्या ग्रामपंचायतींची यादी देखील प्रसिद्धीस दिली आहे.  ग्रामीण भागात भाजपाचे वर्चस्व कायम असून पैसा व सत्तेच्या राजकारणाला जनतेने धुडकावून लावत जनता भाजपच्या पाठिशी भक्कमपणे उभी असल्याचा दावा केलआ आहे. 

भाजपच्या ताब्यात सोयगाव तालुक्यातील गलवाडा, कवली, निबायती, जरंडी, सावळदबारा, देव्हारी, नांदा तांडा, वरखेडी बु,आमखेडा, रावळा- जवळा ग्रामपंचायती आल्या आहेत. तर सिल्लोड तालुक्यातील वडाळा, भराडी सासुरवाडा, लिहखेडी, खेडीलिहा, आसडी, मांडणा, चिंचपुर, चांदापूर, भवन, चिंचखेडा, तांडाबजार, तलवाडा, पळशी टाकळी जीवरग, बाभूळगाव, भायगाव- वरखेडी गोळेगाव बु, गोळेगाव खु, बाळापूर, खंडाळा, हळदा- डकला, शिवना खुपटा, मादणी, वाघेरा-नाटवी, आमसरी, उंडणगाव, घटाब्री, सिरसाळा, शेखपुर पिंपळगाव घाट, अंधारी, लोणवाडी, मांडगाव, टाकळी खु, पिरोळा, आमठाणा, तळणी, पेंडगाव, धावडा चिंचवन, बोजगाव-जळकीघाट आदी ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

मुस्लिम बहुल तांडाबाजारवर भाजपचा झेंडा 

सिल्लोड तालुक्यातील शंभर टक्के मुस्लिम बहुल असलेल्या तांडाबाजार गावाची ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आली आहे. नाजमाबी आरेफखा मुलतानी यांची सरपंच तर उपसरपंचपदी नहिदाबी शेख अजमत यांची निवड झाली. तांडाबाजार हे भाजपचे प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी यांचे गाव आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जोर लावून देखील ही ग्रामपंचायत भाजपच्या पॅनलने राखली. 

तांडाबाजार ग्रामपंचायत ही २५ वर्षांपासून भाजपा प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी यांच्या ताब्यात आहे.  परंतु २०१५ साली ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यामुळे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात गेली होती, आता त्यांच्या ताब्यातून भाजपने ही ग्रामपंचायत पुन्हा खेचून आणली आहे.

Edited By : Jagdish Pansare

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख