महाविकास आघाडीच्या एकजुटीपुढे विखुरलेली भाजप निष्प्रभ.. - BJP scattered in front of the unity of Mahavikas Aghadi | Politics Marathi News - Sarkarnama

महाविकास आघाडीच्या एकजुटीपुढे विखुरलेली भाजप निष्प्रभ..

जगदीश पानसरे
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

महाविकास आघाडीतील शिवसेना- काॅंग्रेस या घटक पक्षाची देखील प्रामाणिक साथ सतीश चव्हाण यांना मिळाली. विशेषतः शिवसेनेने औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी, जालना जिल्ह्यात ही निवडणूक एखादा शिवसेनेचा उमेदवार लढवतोय अगदी त्या पद्धतीनेच आपली यंत्रणा राबवली. त्याचा देखील मोठा फायदा चव्हाण यांना झाला हे नाकारून चालणार नाही.

औरंगाबाद ः  मराठवाड्यासह राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीने महाविकास आघाडी भक्कमपणे पाय रोवून उभी असल्याचे सिध्द झाले आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने केंद्रातील सत्तेचा वारेमाप गैरवापर करत महाविकास आघाडीतील नेते, लोकप्रतिनिधींना त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण हे सुडाचे राजकारण भाजपच्या अंगलट आल्याचे लागलेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

मराठवाडा पदवीधर मतदरासंघाचा विचार केला तर दोन टर्म आमदार राहिलेले महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांना शिवसेना आणि काॅंग्रेसची मिळालेली साथ महत्वाची ठरली. तर दुसरीकडे अगदी उमेदवारी जाहीर होण्यापासून भाजपमध्ये सुरू असलेल्या नाराजी नाट्याचा शेवट अखेर दारूण पराभवाने झाला. महाविकास आघाडीच्या एकजुटीपुढे विखुरलेली भाजप निष्प्रभ ठरली एवढे मात्र निश्चित.

महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी पदवीधर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत एक अनोखा विक्रम केला आहे. या शिवाय आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य मिळवण्याचा रेकाॅर्ड देखील त्यांच्या नावावर नाेंदवला गेला आहे. सतीश चव्हाण यांच्या विरोधात पदवीधरांमध्ये काही प्रमाणात नाराजी होती, मात्र नव्याने केलेली नाेंदणी आणि केलेल्या प्रत्येक मतदाराचे मतदान करवून घेण्यासाठी घेतलेली मेहनत या जोरावर त्यांनी ती मोडून काढली.

तिसऱ्यांदा उमेदवारी आपल्यालाच मिळणार याचा शब्द खूप आधीच मिळाल्यामुळे सतीश चव्हाण यांनी दोन वर्षापासूनच नव्या मतदार नाेंदणीच्या कामावर जोर दिला होता. कोरोनाच्या संकटामुळे निवडणूक लांबली तरी सातत्याने मतदारांशी सुरू ठेवलेला संपर्क त्यांना ५८ हजारांचे मताधिक्य मिळवून देणारा ठरला. प्रभावी प्रचार यंत्रणा, कार्यकर्त्यांचे जाळे, शहरी, तालुकास्तर आणि अगदी ग्रामीण भागातील शेवटच्या गावातील मतदारापर्यंत पोहचून त्याला मतदान केंद्रापर्यंत आणण्यात आलेले यश हीच सतीश चव्हाण यांच्या विजयातील जमेची बाजू म्हणावी लागेल.

महाविकास आघाडीतील शिवसेना- काॅंग्रेस या घटक पक्षाची देखील प्रामाणिक साथ सतीश चव्हाण यांना मिळाली. विशेषतः शिवसेनेने औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी, जालना जिल्ह्यात ही निवडणूक एखादा शिवसेनेचा उमेदवार लढवतोय अगदी त्या पद्धतीनेच आपली यंत्रणा राबवली. त्याचा देखील मोठा फायदा चव्हाण यांना झाला हे नाकारून चालणार नाही. काॅंग्रेस महाविकास आघाडीच्या प्रचारात काही जिल्ह्यांमध्ये दिसली पण प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी प्रत्येक बुथवर फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते दिसत होते. अर्थात काॅंग्रसचे केवळ सोबत वावरणे याचा देखील चांगला परिणाम महाविकास आघाडीची एकजूट दाखवण्यात झाला.

नेत्यांच्या राजकारणात बोराळकरांचा बळी..

भाजपमध्ये सध्या बहुजन विरुध्द इतर असा नावाच वाद पहायला मिळाला. अगदी पदवीधर मतदारसंघासाठी नागपूरमधून संदीप जोशी आणि औरंगाबादेतून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे इतर घटक नाराज झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर पत्रकार परिषदेत किशोर शितळे माझ्या जवळचे असून मी त्यांना देखील उमेदवारी मिळवून देऊ शकलो नाही, असे जाहीरपणे सांगितले होते.

तिकडे राज्याच्या राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात गेलेल्या भाजपच्या सचिव पकंजा मुंडे यांनी देखील कोअर कमिटीच्या समितीत मी बोराळकरांचे नाव घेतले नव्हते, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांच्या मनातील उमेदवार व भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी गोपीनाथ  मुंडे यांची मुर्ती हातात घेत बंडखोरी केली. एकूणच देवेंद्र फडणवीस विरुध्द पंकजा मुंडे यांच्या राजकीय संघर्षाचा फटका शिरीष बोराळकर यांना बसला.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे अपुर्ण स्वप्न पुर्ण करण्यासाठी बोराळकर यांना विजयी करा, असे आवाहन पंकजा मुंडे यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी पदवीधरांच्या मेळाव्यातून केले. पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी ते फारसे मनावर घेतले नाही हे बोराळकर यांना मिळालेल्या मतांच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. २०१४ च्या निवडणुकीपेक्षा जवळपास दुप्पट मतदान होऊन देखील भाजपच्या उमेदवाराला एक लाख मतांचा पल्ला गाठता आला नाही, याचे आश्चर्य त्यासाठीच वाटते.

हक्काचा मतदारसंघ खेचून आणण्याची भाषा आणि राज्यातील सहाही विधान परिषदेच्या जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपने एवढा सपाटून मार खाल्ला यामागे पक्षांतर्गत विरोध आणि कुरघोडीचे राजकारण याचा मोठा वाटा होता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मुड आॅफ नेशन भाजपच्या बाजूने आहे हे फडणवीसांनी केलेले विधान राज्यातील पदवीधरांनी चुकीचे ठरवले. बिहार व देशातील विविध राज्यांमधील पोटनिवडणुकीच्या निकालांवरून सहाही जागा जिंकण्याचा भाजपचा दावा हास्यास्पद ठरला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख