भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या निवडीला खंडपीठात आव्हान - BJP MLA Abhimanyu Pawar's election challenged in bench | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या निवडीला खंडपीठात आव्हान

सुषेन जाधव
गुरुवार, 14 जानेवारी 2021

२०१९ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत अभिमन्यू पवार यांनी आपल्या नामनिर्देशन पत्रात विस्तृत माहिती सादर केलेली नाही; तसेच पवार यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाचा उल्लेख देखील नामनिर्देशन पत्रात केलेला नाही असेही याचिकेत म्हटले आहे.

औरंगाबाद : भारतीय जनता पार्टीचे औसा (जि. लातूर) मतदारसंघातील आमदार अभिमन्यू पवार यांच्या निवडीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. सदर याचिका न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांच्यासमोर सुनावणीस आली असता, न्यायमूर्तींनी याचिकेतील प्रतिवादींना नोटीस बजावून आठ आठवड्यांनंतर सुनावणी ठेवली आहे.

याप्रकरणी बजरंग जाधव यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार विधानसभेच्या २०१९ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत अभिमन्यू पवार यांनी आपल्या नामनिर्देशन पत्रात विस्तृत माहिती सादर केलेली नाही; तसेच पवार यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाचा उल्लेख देखील नामनिर्देशन पत्रात केलेला नाही असेही याचिकेत म्हटले आहे.

याचिकाकर्ते जाधव यांच्यावतीने अॅड. प्रल्हाद बचाटे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आणि निवडणूक आयोगाचे मार्गदर्शक तत्त्व यानुसार याचिकेत नमूद करण्यात आलेली माहिती विस्तृतपणे देणे बंधनकारक असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले;

तसेच आमदार पवार यांची निवड रद्द करावी अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे. खंडपीठाने निवडणुकीत पराभूत सर्व उमेदवार व निवडणूक आयोगास नोटीस बजावण्याचे आदेश दिले असून आठ आठवड्यांनी सुनावणी ठेवली आहे. 

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख