बाबासाहेबांचे नाव आणि मराठवाड्याची अस्मिता जपली... - Babasaheb's name and the identity of Marathwada were preserved | Politics Marathi News - Sarkarnama

बाबासाहेबांचे नाव आणि मराठवाड्याची अस्मिता जपली...

जगदीश पानसरे
गुरुवार, 14 जानेवारी 2021

२६ वर्षापुर्वी हा नामविस्तार झाला आणि त्याच स्वागत सबंध महाराष्ट्राने, मराठवाड्याने विशेषतः विद्यार्थ्यांनी केले. आज या ऐतिहासिक घटनेला २६ वर्ष पुर्ण झाली. महाराष्ट्रात मराठवाडा विद्यापीठाने मोठा विस्तार केला, प्रगती केली. त्यामुळे मराठवाड्यात आणखी एक विद्यापीठ व्हावे अशी मागणी झाली, आणि नांदेडला स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाने दुसरे विद्यापीठ स्थापन झाले. असा हा सगळा इतिहास आहे.

औरंगाबाद : मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करण्याचा प्रस्ताव १९७८ मध्ये मी मुख्यमंत्री असतांना विधीमंडळाने घेतला. पण मराठवाड्यातील जनतेला विशेषतः या भागातील विद्यार्थ्यांना तो मान्य नव्हता. नामांतराच्या निर्णयानंतर मराठवाड्यात तीव्र आंदोलनं झाली, दलितांच्या घरांवर हल्ले होऊन दंगली भडकल्या. तेव्हा नामांतराच्या प्रस्तावाला स्थगिती देण्याचा निर्णय घ्यावा लागला. महाराष्ट्रात पुन्हा तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून आलो, तेव्हा मराठवाडा विद्यापीठाला आपण डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच नाव देऊ शकलो नाही याची खंत होती.

मराठवाड्यात जाऊन विद्यार्थ्यांशी बोलून या संदर्भातला निर्णय घेण्याचे ठरवले. तेव्हा असे लक्षात आले की मराठवाडा या नावाशी येथील लोकांची अस्मिता जोडली गेली होती, त्यामुळे नामांतराला ते कदापी तयार नव्हते. यातून मार्ग काढतांना नामांतर न करता मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करण्याचा विचार पुढे आला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आणि मराठवाड्याची अस्मिता जपत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार १९९६ मध्ये केला आणि त्याचे मराठवाड्यातील जनतेने स्वागत केले, अशी आठवण नामविस्ताराचे जनक शरद पवार यांनी सांगितली.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज २६ वा नामविस्तार दिन. या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देतांनाच त्यांनी या नामविस्ताराचा प्रवास आणि विद्यापीठाच्या स्थापनेचा इतिहास याची सविस्तर माहित देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार म्हणाले, १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, तेव्हा विदर्भ हे स्वतंत्र्य राज्य होते. १९५६ मध्ये हा भाग भारताचा मध्य भाग म्हणून ओळखला जायचा. या ठिकाणी मराठी भाषिकांची मोठी संख्या होती. असाच एक भाग मराठवाडा जो हैदराबादच्या निजामाच्या अख्त्यारित असलेला प्रदेश होता. पण या भागातील लोकांची मातृभाषा मराठी होती. त्यामुळे मराठी भाषिकांचे एक स्वतंत्र राज्य होती, अशी मागणी जोर धरू लागली होती, त्यासाठी चळवळी देखील झाल्या. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, विदर्भ आणि मराठावाडा मिळून एक राज्य व्हावे, अशी भूमिका स्वीकारली गेली.

नवे राज्य स्थापन झाल्यानंतर या राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते. त्या काळात मराठवाड्यात शैक्षणिक सुविधा नव्हती. फक्त अंबाजोगाई येथे बाबासाहेब परांजपे यांनी एक शैक्षणिक संस्था सुरू केली होती. त्यामुळे अंबाजोगाई हेच मराठवाड्यातील शिक्षणाचे एकमेव प्रमुख केंद्र होते. त्यानंतर सेलू येथे अशाच प्रकारचे महाविद्यालय चारठाणकर यांनी स्थापन केले होते. मराठवाड्याचं महत्वांच केंद्र म्हणून औरंगाबाद ओळखलं जात होतं, पण तिथे शिक्षणाची व्यवस्था नव्हती. परंतु या भागात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपर्क आणि वास्तव्य होते आणि म्हणून तिथे महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय बाबासाहेबांनी घेतला. मिलिंद महाविद्यालय हे पहिले काॅलेज बाबासाहेबांनी तिथे सुरू केले आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर लाॅ, विज्ञान, कला आणि वाणित्य अशी, दोन ती तीन महाविद्यालये देखील सुरू केली.

औरंगाबादसह विदर्भातील बुलडाणा, अमरावती, अकोला, भागातील विशेषतः दलित विद्यार्थ्यांची संख्या या महाविद्यालयांमध्ये अधिक होती. बाबासाहेबांनी हे महाविद्याल स्थापन केलेले असल्यामुळे समाजातील गरीब घटकातील विद्यार्थ्यांमध्ये या महावि्यालायबद्दल आकर्षंण होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या महाविद्यालायत शिक्षणासाठी येऊ लागली. त्यानंतर आणखी काही शैक्षणिक संस्था ज्यामध्ये सरस्वती शिक्षण संस्था, मराठवाडा प्रसारक शिक्षण संस्था या परिसरात उभ्या राहिल्या. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असतांना राज्यात विद्यापीठ स्थापन करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.

यात मराठवाड्यासाठी स्वंतत्र मराठवाडा विद्यापीठ आणि कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठ अशी दोन विद्यापीठ स्थापन केली गेली. मराठवाडा विद्यापीठाचा विस्तार वाढत गेला, शिक्षणाची अनेक दालना या माध्यमातून उभी राहत असतांना मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यकारणीने एक ठराव करून मराठवाडा विद्यापीठाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकराचे नाव देण्याची मागणी सरकारकडे केली. या भागातील विद्यार्थ्यांनी यासाठी पाठपुरावा देखील सुरू केला. निर्णयाला विलंब होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मराठवाड्यात आंदोलनं देखील सुरू झाली.

पुलोद सरकारने नामांतराचा निर्णय घेतला..

मराठवाडा विद्यापाठीला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या, अशी मागणी वाढू लागली तेव्हा १९७८ मध्ये माझ्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारने विधीमंडळात नामांतराचा प्रस्ताव मांडला गेला. मी स्वतः तो मांडला आणि एकमाताने तो मंजुर झाल्याचा मला आनंद आहे. नामांतराचा ठराव जरी एकमताने मंजुर झाला असला तरी त्याचे स्वागत मात्र मराठवाड्यात झाले नाही. ठराव मंजुर झाला त्या रात्रीच या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाली. काही ठिकाणी दलित वस्त्यांवर हल्लेही झाले, ते पुढे वाढतही गेले. त्यानंतर मी आणि एस.एम.जोशी दोघेही औरंगाबादला गेलो. विद््यार्थ्यांच्या भेटी घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यात आम्हाला यश आले नाही. परत आल्यानंतर दलितांच्या घरावर होणारे हल्ले थांबवण्यासाठी नामांतराचा निर्णय स्थगित करण्याचा कटू निर्णय आम्हाला घ्यावा लागला. त्यानंतर दंगली थांबल्या.

दरम्यानच्या काळात मला महाराष्ट्रातून दिल्लीत जावं लागलं. संरक्षण खात्याची जबाबदारी माझ्यावर आली. पुन्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून याव लागलं आणि जबाबदारी स्वीकारल्यानंतर माझ्या मनात एक खंत लागून होती. महात्मा ज्योतीबा फुलेंचे नाव आम्ही राहूरी विद्यापीठाला देऊ शकलो, पंजाबराव देशमुखांचे नाव अकोला कृषी विद्यापीठाला देऊ शकलो, शिवाजी महाराजांच नाव कोल्हापूर विद्यापीठाला देऊ शकलो, पण संविधानाची निर्मीती करणाऱ्या आणि देशाला नवा दृष्टीकोन देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मात्र आम्ही विद्यापीठाला देऊ शकत नाही याची खंत माझ्या मनामध्ये होती. काही करून नामांतराच्या निर्णयात दुरुस्ती करायची हा विचार माझ्या मनात होता.

असा झाला नामविस्तार..

मराठवाडा नामांतराला विद्यार्थ्यांचा मोठा विरोध होता. विधीमंडळात जेव्हा आम्ही नामांतराचा प्रस्ताव मंजुर केला होता, तेव्हा विद्यार्थी किंवा शैक्षणिक संस्थाना विश्वासात घेतले नव्हते. फक्त आमदारांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता, तो पुरेसा नाही हे माझ्या लक्षात आल्यानंतर मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन विद्यार्थ्यांशी व शैक्षणिक संस्थाशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आणि १९९४ मध्ये प्रत्येक जिल्ह्यात जाऊन विद्यार्थ्यांशी बोललो. मराठवाडा नाव कमी करणे हा आमच्या अस्मितेचा विषय असल्याचे या चर्चेतून लक्षात आले. यातून काय मार्ग काढता येईल याची चर्चा जेव्हा केली तेव्हा नामांतर न करता नामविस्तार करण्याचा पर्याय समोर आला. विद्यार्थ्यांनी देखील याचे स्वागत केले. आणि नामांतरा ऐवजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यावर एकमत झाले.

२६ वर्षापुर्वी हा नामविस्तार झाला आणि त्याच स्वागत सबंध महाराष्ट्राने, मराठवाड्याने विशेषतः विद्यार्थ्यांनी केले. आज या ऐतिहासिक घटनेला २६ वर्ष पुर्ण झाली. महाराष्ट्रात मराठवाडा विद्यापीठाने मोठा विस्तार केला, प्रगती केली. त्यामुळे मराठवाड्यात आणखी एक विद्यापीठ व्हावे अशी मागणी झाली, आणि नांदेडला स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाने दुसरे विद्यापीठ स्थापन झाले. असा हा सगळा इतिहास आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २६ व्या नामविस्तारा निमित्त शरद पवार यांनी येथील जनतेला शुभेच्छाही दिल्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख