औरंगाबाद- संभाजीनगर एकत्र; आजी-माजी खासदारांमध्ये रंगली चर्चा.. - Aurangabad- Sambhajinagar together; discussion between present and former MPs .. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

औरंगाबाद- संभाजीनगर एकत्र; आजी-माजी खासदारांमध्ये रंगली चर्चा..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 26 जानेवारी 2021

विशेष म्हणजे इम्तियाज जलील व खैरे यांच्यातील सख्य पाहता या दोघांमध्ये कराडांना बसवण्यात आले होते की काय?  असा प्रश्न देखील अनेकांना पडला असेल. एकंदरित नेहमी एकमेकांच्या विरोधात तावातावाने बोलणारेे हे तीनही नेते कधी हास्यविनोद तर कधी गंभीर चर्चा करतांना दिसले.

औरंगाबाद ः प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या शासकीय ध्वजारोहन समारंभात एक सुखद चित्र आज पहायला मिळाले. एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील, भाजपचे डाॅ. भागवत कराड आणि माजी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे हे एकाच सोफ्यावर मांडीला मांडी लावून बसले होते. कराड आणि खैर भगवे जॅकेट घालून तर इम्तियाज हे फाॅर्मल पेहरावत. हे चित्र पाहून औरंगाबाद आणि संभाजीनगर एकत्र आल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती. या तीन नेत्यांमध्ये देखील चांगला संवाद होतांना दिसला.

शहर किंवा जिल्ह्यांच्या विकासा संदर्भातील कुठलाही प्रश्न किंवा विषय असला की वेगवेगळ्या पक्षात असलेले जिल्ह्यातील हे तीन मोठे नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी कधी सोडत नाहीत. डाॅ. कराड. इम्तियाज जलील व चंद्रकांत खैरे हे आपापल्या पक्षाच्या धोरणानूसार संधी मिळेल तेव्हा एकमेकांवर तुटून पडतांना अनेकदा दिसले. यात खैरे आणि इम्तियाज यांच्यातील वाद आणि आरोप-प्रत्यारोप तर राज्यपातळीवर चर्चिले जातात. क्वचितच हे नेते एकत्रित पहायला मिळतात, पण आज तो योग आलाच.

आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सध्या औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचा मुद्दा चांगलाच गाजतोय. शिवसेनेने तर संभाजीनगरवर लवकरच शिक्कामोर्तब होणार असे जाहीर करत श्रेय घेण्याची तयारी सुरू केली आहे. तर भाजपचे डाॅ. भागवत कराड यांनी संभाजीनगरसह चिकलठाणा विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाचा पाठपुरावा केंद्रात सुरू करत मी ही शर्यतीत असल्याचे दाखवून दिले आहे.

दुसरीकेड विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र कराड यांनी चांगले काम करावे, घाणेरडे राजकारण करू नये, असा सल्ला कराडांना याआधीच दिला होता. तर संभाजीनगरच्या मुद्यावरून खैरे यांच्याशी त्यांचा होत असलेला संवाद-वाद आपण जाणतोच. त्यामुळे या तिघांना एकत्रित एकाच सोफ्यावर पाहून चर्चा झाली नाही, तर नवलच. जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी खैरे, कराड, इम्तियाज हे नेते देखील आवर्जून उपस्थित होते.

यावेळी जी बैठक व्यवस्था करण्यात आली होती, त्यात दोन विद्यमान आणि एक माजी खासदार यांची एकत्रित बसण्याची सोय करण्यात आली होती. अंगाला झोंबणारा सकाळचा गारवा आणि प्रमुख पाहुण्यांना येण्यासाठी असलेला वेळ याचा या तीनही नेत्यांनी चांगलाच सद्उपयोग करून घेतला. शहरातील विविध विषयांवर हे तीनही नेते चर्चा करतांना दिसले.

विशेष म्हणजे इम्तियाज जलील व खैरे यांच्यातील सख्य पाहता या दोघांमध्ये कराडांना बसवण्यात आले होते की काय?  असा प्रश्न देखील अनेकांना पडला असेल. एकंदरित नेहमी एकमेकांच्या विरोधात तावातावाने बोलणारेे हे तीनही नेते कधी हास्यविनोद तर कधी गंभीर चर्चा करतांना दिसले.

Edietd By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख