औरंगाबादचे संभाजीनगर झालेच पाहिजे, खैरेंची गाडी अडवत मनसेने भिरकावली पत्रके.. - Aurangabad must be Sambhajinagar, MNS threw leaflets Khaire's car | Politics Marathi News - Sarkarnama

औरंगाबादचे संभाजीनगर झालेच पाहिजे, खैरेंची गाडी अडवत मनसेने भिरकावली पत्रके..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे, त्यांना इतक्या वर्षात या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करता आले नाही, याचा जाब विचारण्यासाठी आम्ही शिवसेना नेते खैरे यांची गाडी अडवली. उद्या मुख्यमंत्र्यांची देखील गाडी अडवू, असा  इशारा दाशरथे यांनी यावेळी दिला.

औरंगाबाद ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उद्या होणाऱ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने पुन्हा एकदा संभाजीनगरची मागणी रेटली आहे. क्रांतीचौकात जोरदार निदर्शने करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची गाडी आडवत त्यांच्यावर औरंगाबादचे संभाजीनगर झालेच पाहिजे, अशी मागणी करणारे पत्रकं भिरकावली. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी यावेळी केला, तर खैरेंनी ही मनसेची नौंटकी असल्याचे म्हटले आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर करा, अन्यथा.. असा इशारा देणारी पोस्टरबाजी मनसेच्या वतीने शहरात करण्यात आली होती. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाची डेडलाईन हुकल्यांनतर पुन्हा आता संभाजीनगर मनसेच करणार, मनसे धमाका करणारा, अशा प्रकारच्या पोस्ट मनसेच्या वतीने सोशल मिडियावर फिरवण्यात आल्या होत्या. त्यामुळे संभाजीनगरच्या मागणीसाठी मनसे नेमकं कुठलं पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

सायंकाळी साडेचारच्या सुमारास मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांच्यासह काही पदाधिकारी, कार्यकर्ते क्रांतीचौकात जमले होते. यावेळी औरंगाबादचे संभाजीनगर झालेच पाहिजे अशा घोषणा देतांनाच शिवसेना व सरकारचा निषेध मनसेच्या वतीने करण्यात येत होता. तेवढ्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची गाडी क्रांतीचौकाच्या दिशेने येत होती. सुहास दाशरथे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुढे सरसावत ती रोखली आणि औरंगाबादचे संभाजीनगर झालेच पाहिजे, अशी मागणी करणारे पत्रक गाडीवर भिरकावले.

काही वेळातच खैरे गाडीतून खाली उतरले आणि दाशरथे व खैरे यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी गराडा घातला. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे, त्यांना इतक्या वर्षात या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करता आले नाही, याचा जाब विचारण्यासाठी आम्ही शिवसेना नेते खैरे यांची गाडी अडवली. उद्या मुख्यमंत्र्यांची देखील गाडी अडवू, असा  इशारा दाशरथे यांनी यावेळी दिला.

तीन्ही पक्षाच्या संमतीने संभाजीनगर होणार..

चंद्रकांत खैरे यांनी मात्र मनसेची ही नौटंकी असल्याचे सांगत महाविकास आघाडी सरकारमधील तीन्ही पक्षांच्या सहमतीने लवकरच शहराचे नामकरण संभाजीनगर असे होणार असल्याचा दावा केला. मनसेने माझ्या गाडीवर पत्रके टाकण्याचा प्रयत्न केला, पण तीच पत्रक मी त्यांच्या डोक्यावर टाकली, असेही खैरे म्हणाले.

दरम्यान, मनसेचे आंदोलन सुरू असतांनाच अगदी त्याचवेळी चंद्रकांत खैरे यांची गाडी क्रांतीचौकात कशी आली? हा निव्वळ योगायोग होता की आणखी काही? याबद्दल देखील आंदोलनस्थळी कुजबुज सुरू होती.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख