नागपूर ः मनसेने काय आरोप केलेत मला माहित नाही, त्यावर मी बोलणारही नाही. पण खंडणीखोरीचे आरोप शिवसेनेवर आधी देखील झाले आहेत, त्यांच्यासाठी हे नवीन नाही, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. नागपूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबईतील फेरीवाल्यांकडून शिवसेना खंडणी उकळत असल्याचा खळबळजनक आरोप केला. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे फोटो असलेल्या पावत्याच त्यांनी पुराव्या दाखल पत्रकार परिषदेत सादर केल्या. यावरून शिवसेनेवर टीकेची झोड उठत असतांनाच देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेनेवर निशाणा साधला.
मनसेच्या या आरोप संदर्भात प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, मनसेने काय आरोप केला हे मला माहित नाही, त्यावर मी बोलणार देखील नाही, पण शिवसेनेवर खंडणीखोरीचे आरोप आधी देखील झाले आहे, त्यात काही नवीन आहे असं मला वाटतं नाही. राज्यात सध्या अनागोंदी सुरू आहे.अवैध धंद्याना ऊत आला आहे. गुटखा बंदी असतांना सर्रास गुटख्याची विक्री होत आहे. हीच परिस्थीती दारूच्या बाबतीत देखील आहे.
विदर्भातील ज्या जिल्ह्यात दारूबंदी आहे तिथे देखील दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप करत फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही टीका केली. गृहमंत्र्यांचे पुतणे आशिष देशमुख यांनी केलेल्या विधानबद्दल त्यांना छेडले असता, ते काय बोलले हे मला माहित नाही, असे म्हणत केवळ नागपूर, विदर्भातच नाही, तर राज्यभरात सरकार आणि पोलीसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे, गुटखा, दारू विक्री खुलेआम सुरू असल्याचा आरोप फडणवीसांनी केला.
महाराष्ट्रात मोगलाई?
अतिवृष्टी, कोरोना, लाॅकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. अशावेळी राज्यातील ७८ लाख वीज कनेक्शन तोडण्याच्या नोटीसेस सरकारकडून शेतकऱ्यांना पाठवल्या जात आहेत. या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत, जोपर्यंत हा अन्याय थांबणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा देखील फडणवीस यांनी यावेळी दिला.
Edited By : Jagdish Pansare

