गुन्हेगारांसोबतच्या व्हायरल फोटो नंतर, गृहमंत्र्यांना भेटायला येणाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणार.. - After the viral photos with the criminals, the background of those who come to meet the Home Minister will be checked | Politics Marathi News - Sarkarnama

गुन्हेगारांसोबतच्या व्हायरल फोटो नंतर, गृहमंत्र्यांना भेटायला येणाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणार..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

औरंगाबाद दौऱ्यात सुभेदारी विश्रामगृहावर मला सातशेहून अधिक लोक, पक्षाचे पदाधिकारी व नागरिक भेटले.त्यामुळे हे जे कुणी माझ्या सोबत फोटोमध्ये दिसत आहेत, ते कोण होते, त्यांची पार्श्वभूमी काय हे मला माहित असण्याचे कारण नाही. पण निश्चित यापुढे काळजी घेईन. मी तसे आदेशच पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

औरंगाबाद ः गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांसोबत गृहमंत्री अनिल देशमुख यांचे फोटोसेशन सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. गृहमंत्र्यांपर्यंत या गुन्हेगारांना कोण घेऊन गेले? पोलीसांनी याची माहिती का दिली नाही? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहे. खुद्द गृहमंत्र्यांनी देखील या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. यापुढे मला भेटायला येणाऱ्या अनोळखी व्यक्तींची पार्श्वभूमी तपासली जावी असे आदेश मी पोलीसांना दिले असल्याचे अनिल देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.

दोन दिवसांपुर्वी औरंगाबाद दौऱ्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुभेदारी विश्रामगृहात भेटायला आलेल्यापैकी तीन जण हे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेले होते. त्यांच्यासोबत गृहमंत्र्यांनी केलेले फोटो सेशन सध्या चांगलेच वादात सापडले आहे. गुटखा किंग, तडीपारीची कारवाई प्रस्तावित असलेले, बलात्कार आणि गाड्या चोरून त्याचे सुटे भाग विकणाऱ्या टोळीमध्ये समावेश असलेल्या गुन्हेगारांनीच थेट गृहमंत्र्यासोबत फोटो काढले. यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. यावर आता अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

प्रसार माध्यमाशी बोलतांना अनिल देशमुख म्हणाले, मी जिथे कुठे दौऱ्यावर जातो, तिथे मला भेटण्यासाठी, निवेदन देण्यासाठी हजारो लोक येत असतात. त्यांची निवेदनं मला स्वीकारावी लागतातं. अशावेळी निवेदन स्वीकारातांना फोटो काढण्याचा आग्रह केला जातो, फोटो काढले जातात. भेटायला आलेल्या व्यक्तीचा व्यवसाय काय? तो काय करतो याची माहिती मला असणे शक्य नाही.

औरंगाबाद दौऱ्यात सुभेदारी विश्रामगृहावर मला सातशेहून अधिक लोक, पक्षाचे पदाधिकारी व नागरिक भेटले.त्यामुळे हे जे कुणी माझ्या सोबत फोटोमध्ये दिसत आहेत, ते कोण होते, त्यांची पार्श्वभूमी काय हे मला माहित असण्याचे कारण नाही. पण निश्चित यापुढे काळजी घेईन. मी तसे आदेशच पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख