`शिवपार्क` नंतर आता `भीमपार्क`, उभारणार; सत्तार यांच्याकडून सोशल इंजिनिअरिंग... - After 'Shiva Park', now 'Bhimpark' will be built; Social Engineering from Sattar | Politics Marathi News - Sarkarnama

`शिवपार्क` नंतर आता `भीमपार्क`, उभारणार; सत्तार यांच्याकडून सोशल इंजिनिअरिंग...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 31 जानेवारी 2021

मतदारसंघात कुणी मागणी केलेली नसतांना देखील सत्तार यांनी हे दोन्ही प्रकल्प आणून मतदारसंघात सोशल इंजिनिअरिंग साधले आहे. अजिंठा लेणी जवळ शिवपार्क व भीमपार्क उभारण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत त्यांनी भीमपार्कची देखील घोषणा केली आहे. 

औरंगाबाद ः राज्याचे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे आपल्या सोशल इंजिनिअरिंगसाठी चांगलेच ओळखले जातात. मतदारसंघावर गेल्या वीस-पंचवीस वर्षापासून त्यांची असलेली पकड याचे गमकच त्यांच्या सोशल इंजिनिअरिंगमध्ये असल्याचे नेहमी बोलले जाते. नुकताच त्यांनी कोट्यावधी रुपये खर्चून आपल्या सिल्लाेड-सोयगांव मतदारसंघातील अजिंठ्याच्या पायथ्याशी भव्य असे शिवस्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. आता फर्दापूर येथे दहा एकर जागेवर भीमपार्क उभारण्याचे त्यांनी ठरवले आहे. यासाठी त्यांनी पाठपुरावा देखील सुरू केला आहे.

मुंबईत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनात या संदर्भात नुकतीच बैठक पार पडली. यावेळी प्रकल्पासाठीचा सविस्तर प्रस्ताव मान्यतेसाठी सादर ककरण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकारऱ्यांनी दिल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनीच आपल्या फेसबुक पेजवरून दिली आहे. जगप्रसिध्द अजिंठा लेणीच्या पायथ्याशीच असलेल्या फर्दापूर जवळ दहा एकर जागेत हे भव्य भीमपार्क उभारण्यात येणार आहे.

अब्दुल सत्तार यांचा राजकीय प्रवास हा थक्क करणारा असाच राहिला आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात उडी घेतली  आणि आमदार, ते मंत्रीपदापर्यंत त्यांनी मजल मारली. अल्पसंख्याक समाजातून पुढे आलेले असतांना त्यांनी सिल्लाेड-सोयगांव सारख्या बहुजनांची सर्वाधिक संख्या असलेल्या मतदारसंघात सातत्याने यश मिळवले. यामागे त्यांचे सोशल इंजिनिअरिंग व सर्व धर्मीय लोकांना आपलेसे करून घेण्याची कला याचा मोठा वाटा असल्याचे दिसून आले आहे.

मतदारसंघावर त्यांची घट्ट पकड असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. त्यामुळेच २०१९ मध्ये झालेल्या जालना लोकसभा मतदारसंघात त्यांच्या सांगण्यावरून तब्बल २५ हजार मतदारांनी नकारत्मक मतदान केल्याची देखील चर्चा त्यावेळी होती. विधानसभा निवडणुकीच्या पुर्वी भाजपात जाताजाता ते शिवसेनेत आले आणि त्यांचा हा निर्णय किती योग्य होता हे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर दिसून आले.

सत्तार यांची सिल्लोृड-सोयगांव नगरपालिकेवर असलेलील वर्षानुवर्षाची सत्ता याचा फायदा या मतदारसंघात शिवसेना वाढीसाठी करून घेण्याचा दृष्टीकोन ठेवत सेनेने देखील सत्तार यांच्या हातावर शिवबंधन बांधले. तीन पक्षांचे आघाडी सरकार असतांना देखील सत्तार यांना राज्यमंत्री करत शिवसेनेने त्यांचे महत्व अधोरेखित केले. आता यापुढे देखील मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम राहावे, यासाठी सत्तार हे आपल्या मंत्रीपदाचा पुरेपूर उपयोग करून घेतांना दिसत आहेत.

शिवपार्क आणि भीमपार्क हा त्याचा भाग असल्याचे बोलले जाते, मतदारसंघात कुणी मागणी केलेली नसतांना देखील सत्तार यांनी हे दोन्ही प्रकल्प आणून मतदारसंघात सोशल इंजिनिअरिंग साधले आहे. अजिंठा लेणी जवळ शिवपार्क व भीमपार्क उभारण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत त्यांनी भीमपार्कची देखील घोषणा केली आहे. 

शिवपार्कला यापूर्वीच मंजुरी मिळालेली आहे. आता फर्दापूर येथे दहा एकर जागेवर भीमपार्क उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातुन हा प्रकल्प उभा राहावा, यासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात बैठक देखील घेण्यात आली. 

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख