सत्ता गेल्यावर भास्कर पेरे म्हणतात, सरपंच हौशी आणि गावाचं डोक ठिकाणावर असलं पाहिजे.. - After louse the power, Bhaskar Pere says, the head of the village should be in place | Politics Marathi News - Sarkarnama

सत्ता गेल्यावर भास्कर पेरे म्हणतात, सरपंच हौशी आणि गावाचं डोक ठिकाणावर असलं पाहिजे..

जलील पठाण
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

गावाचे सरपंच आणि सदस्य हे त्या गावाचे विठ्ठल रुक्मिणी असतात, तर गाव त्यांचे पंढरपूर. विरोधकाकडे लक्ष देण्यापेक्षा गावाच्या विकासासाठी झटले तर गावाचा काया पालट नक्की होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

औसा ः गावाचा विकास करण्याचा ध्यास सरपंचात असला पाहिजे आणि त्याला साथ देण्यासाठी गावातल्या लोकांचे डोके शांत असायला हवे, असा मोलाचा सल्ला आदर्श गाव पाटोद्याचे शिल्पकार माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना दिला, सरपंच गावाच्या विकासासाठी नवे कायदे करू शकतो असेही ते म्हणाले.

नुकत्याच झालेल्या राज्यातील साडेचौदा हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती औरंगाबाद तालुक्यातील आदर्श गाव पाटोदाच्या निवडणुकीची. गेली वीस पंचवीस वर्ष एकहाती कारभार सांभाळत तत्कालीन सरपंच व सदस्य राहिलेल्या भास्कर पेरे पाटील यांनी पाटोदा गावाला देश आणि राज्य पातळीवर नेऊन ठेवले.

गावातील विकास पाहण्यासाठी लोक गावांत येत असत. अनेक राज्य व केंद्र सरकारचे पुरस्कार देखील या गावाने पटकावले. पण राजकारण वाईट म्हणतात याची प्रचिती यंदाच्या निवडणुकीत आली. भास्कर पेरे व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध निवडणूक लढवण्याचा निर्णय गावातील काही तरूण मंडळींनी घेतला आणि पेरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. ११ पैकी ८ सदस्य बिनविरोध झाले तर तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पेरे यांच्या मुलीचा देखील पराभव झाला.

झालं गेलं सगळं विसरून भास्कर पेरे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे ते सध्या महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये जाऊ मार्गदर्शन करत आहेत. औसा तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून नवनिर्वाचित सदस्यांना चांगले सल्ले व चिमटेही काढले.

पेरे पाटील म्हणाले, गावाचा विकास करण्याचा ध्यास सरपंचात असावा आणि त्याला साथ देण्यासाठी ग्रामस्थांचे डोके शांत असायला हवे. गावाच्या विकासासाठी सरपंच नवीन कायदे करू शकतो. फक्त त्यामध्ये खाजगी स्वार्थ नको. ग्रामसभेने जर चांगले निर्णय घेतले तर तुमचेही गाव पाटोदाहुन चांगले आणि विकसित बनू शकते.

गावाचे सरपंच आणि सदस्य हे त्या गावाचे विठ्ठल रुक्मिणी असतात, तर गाव त्यांचे पंढरपूर. विरोधकाकडे लक्ष देण्यापेक्षा गावाच्या विकासासाठी झटले तर गावाचा काया पालट नक्की होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख