कापूस प्रक्रिया केंद्र उभारल्यास परभणीला `ॲडव्हान्टेज` : खासदार जाधव - 'Advantage' to Parbhani if cotton processing center is set up: MP Jadhav | Politics Marathi News - Sarkarnama

कापूस प्रक्रिया केंद्र उभारल्यास परभणीला `ॲडव्हान्टेज` : खासदार जाधव

गणेश पांडे
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

ज्या उद्देशाने एकाधिकार योजना आणली तो उद्देश काही ‘सफल’ झाला नाही. आज तो कायदाच विकासाच्या आड येऊ घातला आहे. योजना गुंडाळली पण कायद्याचे भूत अद्यापही मानगुटीवर बसले आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात किमान कापुस प्रक्रीया उद्योग उभारावा, अशी मागणी जाधव यांनी लावुन धरली.

परभणी : जिल्ह्यातील प्रमुख व नगदी पिक म्हणुन समजल्या जाणार्‍या कापुस पीकावर प्रक्रीया करणारे उद्योग उभारण्याची मागणी करत परभणीसाठी कापुस प्रक्रिया केंद्र उभारावे अशी, मागणी  शिवसेना खासदार संजय जाधव यांनी संसदेत केली. 

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यावेळी सभागृहात खासदार जाधव यांनी कापूस प्रक्रिया उद्योगा संदर्भात सविस्तर भूमिका मांडली. जाधव म्हणाले, परभणी जिल्ह्यात बहुतांश शेतकर्‍यांचा उदरनिर्वाह हा कापुस पीकावर अवलंबुन आहे. परंतु परभणी लोकसभा मतदार संघात औद्योगिक उदासिनता असल्याने शेतकर्‍यांना कापुस निर्मिती साठी परराज्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

दरम्यान कापसाच्या एका गाठीत ३० लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार देण्याची क्षमता आहे. परभणी लोकसभा मतदार संघात अशा हजारो गाठींची निर्मिती होते. त्या कापसावर याच ठिकाणी  प्रक्रिया झाली तर अनेकांना रोजगार मिळू शकतो. कापसाचे इतके पांढरे शुभ्र अर्थकारण झाकोळले जात आहे. ‘अ‍ॅडव्हान्टेज’ परभणीच्या निमित्ताने ते समोर यावे, कापूस प्रक्रिया उद्योग उभे राहावेत तरच परभणीच्या पदरात ‘अ‍ॅडव्हान्टेज’ पडू शकेल.

कापूस हे परभणी लोकसभा क्षेत्रातील  महत्त्वाचे पीक आहे. मराठवाड्याची  ‘इकॉनॉमी’ त्यावरच आधारित आहे. कापूस एकाधिकार योजना लागू झाल्यानंतर काहीकाळ त्यातून फायदा मिळाला. परंतु, खुले आर्थिक धोरण आणि जागतिकीकरणाच्या वादळापुढे एकाधिकार योजना कोलमडून पडली. शेतकर्‍यांना बाजारपेठेत अधिक दर मिळू लागले. कधी जागतिक मंदीचा फटकाही सहन करावा लागला. त्याच कालावधीत ‘कापूस ते कापड’ ही योजना अंमलात आणली असती तर जागतिक मंदीच्या फटक्यातून  शेतकरी सावरला असता.

परंतु, ज्या उद्देशाने एकाधिकार योजना आणली तो उद्देश काही ‘सफल’ झाला नाही. आज तो कायदाच विकासाच्या आड येऊ घातला आहे. योजना गुंडाळली पण कायद्याचे भूत अद्यापही मानगुटीवर बसले आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात किमान कापुस प्रक्रीया उद्योग उभारावा, अशी मागणी जाधव यांनी लावुन धरली. 

परभणी जिल्ह्यातील कापुस उत्पादक शेतकरी हे कापुस पीकावर आपल्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहासोबतच शैक्षणिक गरजाही पुर्ण करतात. कापसासाठी परभणीकरांना तामिलनाडूसह इतर राज्यातील उद्योग प्रक्रीयेवर अवलंबुन राहावे लागते. परभणी मतदारसंघात कापुस प्रक्रीया उद्योग उभारला, तर शेतकरी व बेरोजगारांचा प्रश्न कायमचा मिटेल, याकडेही जाधव यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख