परळी नगर परिषदेत आघाडी धर्माचे पालन, शिवसेनेच्या एकमेव नगरसेविका झाल्या सभापती - Adherence to Aghadi Dharma in Parli Municipal Council, became the only Shiv Sena corporator | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

परळी नगर परिषदेत आघाडी धर्माचे पालन, शिवसेनेच्या एकमेव नगरसेविका झाल्या सभापती

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

परळी नगर परिषदेत एकूण ३२ निवडून आलेले व ३ स्वीकृत असे एकूण ३५ नगरसेवक आहेत. पैकी ३० नगरसेवक एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तर गंगासागर शिंदे या एकमेव शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. 

परळी : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी नगर परिषदेच्या सभापती निवडींमध्ये महाविकास आघाडी धर्म पाळला. राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असूनही शिवसेनेच्या एकमेव नगरसेविकेला सभापती पद बहाल केले. राज्यात महाविकास आघाडी असल्यामुळे मुंडे यांनी आपल्या नगर परिषदेत देखील सर्व-जाती धर्मांना प्रतिनिधित्व मिळावे अशी भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेनेच्या एकमेव नगरसेविकेच्या गळ्यात देखील सभापती पदाची माळ पडली.

परळी नगर परिषदेच्या विषय समित्यांची आज फेरनिवड संपन्न झाली. या फेरनिवडीमध्ये धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडी धर्माचेही पालन केल्याचे दिसून आले. परळी नगर परिषदेत एकूण ३२ निवडून आलेले व ३ स्वीकृत असे एकूण ३५ नगरसेवक आहेत. पैकी ३० नगरसेवक एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तर गंगासागर शिंदे या एकमेव शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. 

विषय समित्यांच्या फेरनिवडणुकीत शिवसेनेच्या एकमात्र नगरसेविका गंगासागर बाबुराव शिंदे यांना महिला व बालविकास सभापती पद देण्यात आले. याशिवाय अन्नपूर्णा आडेपवार यांना बांधकाम, उर्मिला गोविंद मुंडे यांना पाणीपुरवठा, शेख अन्वरलाल यांना स्वच्छता समिती, गोपाळकृष्ण आंधळे यांना शिक्षण समिती सभापती पद, तर  स्थायी समितीवर बाजीराव धर्माधिकारी, शहाजहान बेगम समीउल्ला खान व रेश्मा बळवंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

यावेळी नगराध्यक्षा सरोजनी हालगे, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, न.प. मुख्याधिकारी अरविंद मुंडे तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी या प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. 

दरम्यान एकीकडे आपल्यावर झालेल्या आरोपांचा सामना करत असताना धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले. त्यापाठोपाठ आता नगर परिषद विषय समित्यांच्या निवडींमध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळत सर्व जाती धर्मांना समान न्याय देण्याची भूमिका घेतली.  या माध्यमातून मुंडे यांनी सोशल इंजिनिअरिंगसह पॉलिटिकल इंजिनिअरिंगचेही दर्शन घडवल्याचे बोलले जाते. 

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख