अत्याचाराची खोटी तक्रार करणाऱ्या महिलांवरही कारवाई होणार- अनिल देशमुख - Action will also be taken against women who make false allegations of atrocities: Anil Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

अत्याचाराची खोटी तक्रार करणाऱ्या महिलांवरही कारवाई होणार- अनिल देशमुख

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

शक्ती कायदा करतांना राज्यात मोठ्या प्रमाणात महिला अत्याचाराच्या खोट्या तक्रारी दाखल होतात याचा देखील गांभीर्याने विचार केला जाणार आहे. अनेक तक्रारींमध्ये २० ते ५० वर्षापुर्वी अमुक एखाद्या व्यक्तीने माझ्यावर अत्याचार, बलात्कार केल्याचे सांगितले जाते. अनेकदा या तक्रारी खोट्या असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. त्यामुळे यापुढे महिला अत्याचाराची तक्रार दाखल करून घेतांना ती किती जुनी असावी या संदर्भात काही ठोस निर्णय घेतले जाणार आहेत.

औरंगाबाद ः राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखून आरोपींवर जरब बसवण्यासाठी कठोरात कठोर शिक्षेची तरतूद नव्या शक्ती कायद्यात करण्यात येणार आहे. जेणेकरून महिलांवर अत्याचार करण्याची हिमंत कुणी करू शकणार नाही. या कायद्या अंतर्गत २१ दिवसांत प्रकरणाची चौकशी करण्याची तरतूद या कायद्यात केली जात असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तसेच अत्याचाराच्या खोट्या तक्रारी देणाऱ्या महिलांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

शक्ती समितीच्या बैठकीसाठी आनिल देशमुख व समितीचे सर्व सदस्य आज औरंगाबादेत आले होते. बैठक संपल्यानंतर अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांना या कायद्या विषयीची माहिती देतांनाच अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावेळी तसेच कोरोना लाॅकडाऊनच्या काळात दाखल झालेले गंभीर प्रकाराचे गुन्हे वगळत अन्य गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अनिल देशमुख म्हणाले,  महिलांना सुरक्षा देणारा आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोर शासन करण्यासाठी राज्य सरकार नवा शक्ती कायदा आणत आहे. या कायद्याचे प्रारूप ठरवण्यासाठी राज्यातील खंडपीठ असलेल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन शक्ती समिती महिला संघटना, पोलीस अधिकारी, वकील संघटनांशी चर्चा करून हा कायदा अधिक प्रभावी आणि महिलांना तातडीने न्याय देणार कसा होऊ शकेल याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

महिला अत्याचाराच्या घटनांचा तपास, दोषारोपपत्र दाखल करण्यासाठीचा कालावधी ४५ दिवसांपेक्षा अधिक असणार नाही. अशा प्रकरणांचा तपास करण्यासाठी डीसीपी स्तराच्या अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथक आणि स्वतंत्र कोर्ट प्रत्येक जिल्ह्यात नेमण्यात येणार आहे. कुठल्याही पिडीत महिलेवर अन्याय होणार नाही याची खबरदारी व काळजी शक्ती कायदा करतांना घेतली जाणार आहे.

खोट्या तक्रारींची गय नाही..

शक्ती कायदा करतांना राज्यात मोठ्या प्रमाणात महिला अत्याचाराच्या खोट्या तक्रारी दाखल होतात याचा देखील गांभीर्याने विचार केला जाणार आहे. अनेक तक्रारींमध्ये २० ते ५० वर्षापुर्वी अमुक एखाद्या व्यक्तीने माझ्यावर अत्याचार, बलात्कार केल्याचे सांगितले जाते. अनेकदा या तक्रारी खोट्या असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. त्यामुळे यापुढे महिला अत्याचाराची तक्रार दाखल करून घेतांना ती किती जुनी असावी या संदर्भात काही ठोस निर्णय घेतले जाणार आहेत.

शिवाय हेतूपुरस्पर किंवा त्रास देण्यासाठी अत्याचाराच्या खोट्या तक्रारी करणाऱ्या महिलांवर देखील कारवाई करण्या संदर्भात शक्ती कायद्यात तरतूद केली जाणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

प्रोजेक्ट ११२ राबवणार..

राज्यात महिलांवरील अत्याचार, अपघात, दुर्घटना अशा प्रसंगी पोलीसांची मदत संबंधित व्यक्तीला तात्काळ मिळावी यासाठी येत्या तीन चार महिन्यात राज्य सरकार प्रोजेक्ट ११२ हा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्यात राबवणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. सध्या रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची जशी सेवा पुरवली जाते त्या धरतीवरच ही सेवा असणार आहे. यासाठी दोन हजार चार चाकी व अडीच हजार दुचाकी खरेदी करण्यात येणार आहेत. यामध्ये जीपीआरएस यंत्रणा असणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख