जीवे मारण्याची सुपारी ते जमीन हडपल्याचा आरोप; खासदार संजय जाधव का ठरतायेत वादग्रस्त..

आता जमीन बळकावल्याचा आरोप आणि यात झालेला व्यवहार किती खरा, पारदर्शक आहे याच्याकडे देखील परभणीकरांचे लक्ष लागले आहे. आता यातील सत्यता तरी बाहेर येणार? की मग राजीनामा, जीवे मारण्याची धमकी याची चौकशी जशी गुंडाळली गेली, तसेच हे प्रकरण देखील बासनात जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
mp sanjay jadhav news parbhani
mp sanjay jadhav news parbhani

औरंगाबाद ः परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव सध्या चर्चेत आहेत, ते त्यांच्यावर एका शिवसैनिक कुटुंबाने जमीन हडपल्याचे आरोप केल्यामुळे. या संदर्भात संजय जाधव यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेऊन हे आरोप फेटाळत व्यवहार पारदर्श असल्याचा दावा आणि पुरावे समोर ठेवले होते. त्यानंतर देखील संंबंधित कुटुंबाने जाधव यांच्या विरोधात थेट मातोश्रीवर जाऊन उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. काही महिन्यांपुर्वी सजंय जाधवा यांनी आपल्या जीवे मारण्याासाठी १ कोटी रुपयांची सुपारी दिल्याची तक्रार देखील पोलीसांत केली होती. जीवे मारण्याची धमकी ते जमीन हडपल्याचा आरोप यामुळे जाधव सध्या चर्चेत आणि वादात सापडले आहेत.

परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. लोकसभा निवडणुकीत शिवसेने इथे सातत्याने यश मिळवलेले आहे. परभणीला गद्दारीचा शाप असल्याचे देखील बोलले जाते. तशी उदाहरणे देखील इथल्या राजकीय इतिहासात पाहायला मिळतात. पण येथील मतदार मात्र कायमच शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहत आला आहे. परभणीचे विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव सध्या एका वादात अडकले आहेत. पत्नीच्या नावे घेतलेल्या जमीनीवरून त्यांच्यावर आरोप होत आहेत. अर्थात या आरोपांना जाधव यांनी उत्तरे देत व्यवहार पारदर्शक आणि ठरल्याप्रमाणे झाल्याचे सागंत काही पुरावे समोर ठेवले आहेत.

परंतु त्यानंतरही ज्या कुटुंबाची जमीन जाधव यांनी घेतली, त्या कुटुंबाने हे प्रकरण थेट मातोश्रीवर नेण्याचा इशारा व तिथेच उपोषण करण्याचे जाहीर केले होते. हे प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न सध्या युुद्धपातळीवर सुरू आहेत. खासदार जाधव हे कट्टर शिवसैनिक आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. पण गेल्या काही महिन्यातील त्यांच्या राजकीय आयुष्यात काही घटना घडल्या, ज्यांची चर्चा राज्यपातळीवर देखील झाली.

मग महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निमित्ताने झालेले वाद, त्यातून खासदारकीचा राजीनामा पक्षप्रमुखांकडे पाठण्याचे त्यांनी उचललेले टोकाचे पाऊल, जीवे मारण्यासाठी परभणीतील कुणी तरी नांदेडच्या गॅंगला एक कोटी रुपयांची दिलेली सुपारी आणि आता जमीन हडपल्याचा आरोप. या सगळ्या प्रकरणांची राज्यभरात चर्चा तर झाली पण यातून काहीच साध्य झाले नाही हे तितकचे खरे. मग या घटना, आरोप, तक्रारी खऱ्या होत्या की मग राजकीय स्टटंबाजी  असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

सुपारीचे काय झाले?

साधरणतः सहा-सात महिन्यांपुर्वी खासदार जाधव यांनी परभणी पोलीसामध्ये आपल्याला जीवे मारण्याचे धमकीचे फोन येत असून त्यासाठी १ कोटी रुपयांची सुपारी दिल्याची तक्रार दिली होती. लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे फोनवरून थेट जीवे मारण्याची धमकी आल्याने पोलीसांनी देखील हे प्रकरण गांभीर्याने घेतले. स्वतः जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांना फ्री हॅन्ड देण्याची विनंती केली होती.

नांदेड पोलीसांनी देखील विशेष पथक स्थापन करून काही संशयितांना अटक केली. पण पुढे या प्रकरणाची चर्चाच बंद झाली. स्वतः जाधव आणि नांदेड, परभणी पोलीसांनी देखील या प्रकरणावर काहीच भाष्य किंवा माहिती दिली नाही. मग नेमंक या सुपारी प्रकरणाचे काय झाले? याचा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजाणी दुर्राणी यांच्यासोबत पाथरी, गंगाखेड, जिंतूर व अन्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवेळी देखील खासदार जाधव यांचा वाद झाला होता. हा वाद देखील ठाकरे यांच्या दरबारी गेला, तिथे जाधव यांनी राजीनामा अस्त्र बाहेर काढत टोकाचे पाऊल उचलले होते. पुढे दुर्राणी- जाधव यांच्यात समेट झाली आणि जाधवांचे राजीनामा पत्र पुन्हा खिशात गेले.

आता जमीन बळकावल्याचा आरोप आणि यात झालेला व्यवहार किती खरा, पारदर्शक आहे याच्याकडे देखील परभणीकरांचे लक्ष लागले आहे. आता यातील सत्यता तरी बाहेर येणार? की मग राजीनामा, जीवे मारण्याची धमकी याची चौकशी जशी गुंडाळली गेली, तसेच हे प्रकरण देखील बासनात जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com