सांगलीत जयंत पाटलांचे प्रेम नक्की कोणावर..?

बऱ्याच दिवसानंतर सांगलीचे राजकारण पुन्हा पेटू लागले आहे. जयंत पाटील पालकमंत्री झाल्यानंतर "ये तो होनाही था'. जयंतरावांचे वसाहतवादाचे (गट विस्तार) धोरण पूर्वीपासून आहे. सध्या काँग्रेस आणि भाजप दोन्ही त्यांच्या निशाण्यावर आहेत.
MCP Minister Jayant Patil
MCP Minister Jayant Patil

सांगली : जयंतरावांनी सांगलीत 2008 मध्ये केलेल्या नव्या प्रयोगाची आठवण सर्वांना आहे. महापालिकेत भाजपला सोबत घेऊन त्यांनी आपली सत्ता आणली, पण त्यानंतर भाजपला सोडून त्यांना सत्ता आणता आली नाही, हे वास्तव आहे. पण जयंतरावांच्या आधाराने वाढलेली भाजप एवढी जिल्ह्यात विस्तारेल, याचा अंदाज त्यांना आला नाही. त्याचा धक्का त्यांना घरच्या मैदानात, इस्लामपूरातही बसला. पण ते आता पूर्वीचे सर्व हिशेब चुकते करण्यासाठी संधी शोधत आहेत. 

जयंतराव जे बोलतात त्यामध्येसुध्दा "बिटविन द लाईन' असतात. त्या अनेकांना लक्षात येत नाहीत. भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे व नगरसेवक शेखर इनामदार या दोघांवर माझे खूप प्रेम आहे, असे ते एका कार्यक्रमात म्हणाले. त्यावरून भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
 
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत भाजपची सत्ता आहे. येथील महापौरांनी जयंतरावांना महापालिकेला भेट देण्याचे निमंत्रण दिले, मात्र जयंतराव त्यांना म्हणाले, "देशपांडे, इनामदार असतील तरच मी येईन.'' 
जयंतरावांच्या या तिरकस चालीचा अर्थ आता कुठे भाजपला लागला आहे. कारण तसे भाजपमध्ये असलेल्या संभाजी पवार, दिनकर पाटील यांच्यावर आधी प्रेम होतं.

खासदार संजयकाका पाटील यांच्या पासून विलासराव जगतापर्यंत सर्वांवर जयंतरावांचे विशेष प्रेम आहे, ते जग जाहीर आहे. सांगलीत त्यांचे कोणावर खरे प्रेम आहे, या चर्चेला आता उधाण आले आहे. भाजपमधील या दोघांवर विशेष प्रेम म्हणजे? यातील विशेष शब्द महत्त्वाचा आहे. त्यांचे "निगाहे' आणि "निशाना' आता थोड्याच दिवसात समजेल. 

महाआघाडी सत्तेवर आल्यावर जयंतरावांचे जे पहिले प्रधान मंडळ होते. ते आजही चर्चेत आहे.  खरेतर सांगली महापालिका आता बावीस वर्षाची
झाली. पण इथल्या विकासाचा पाळणा खऱ्या अर्थाने अजून हलला नाही. नुसती एकमेकाची खेचाखेची आणि लुटालूट हा इथला मोठा दोष आहे. दोन्ही कॉंग्रेसला वैतागलेल्या सांगलीकरांनी या महापालिकेत कमळ फुलवले. पण भाजपची सत्ता असून नसल्यासारखी झाली आहे. सध्या आयुक्तच त्यांचे ऐकत नाहीत. यामुळे

भाजप नेते चिंतेत आहेत. भाजपला फाट्यावर बसून कारभार करणाऱ्या आयुक्तांना कोणाचे पाठबळ आहे, हा विषय जनतेला कळलेला आहे. पण भाजप नेते अज्ञानात सुख मानत आहेत.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनादेखील धक्का बसला म्हणे! आपले स्पष्ट बहुमत असताना धाकधुक का लागते, असा सवाल त्यांनी आपल्या येथील नेत्यांना केला आहे. 

नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभापती निवडीत मंगेश चव्हाण यांनी भाजपला घाम फोडला होता. यामागे ताकद जयंत पाटलांनी लावली होती, अशी चर्चा आहे. पण चंद्रकांतदादांनी स्थायी समिती राखण्यात आणि येथे ओरीजनल भाजप कार्यकर्त्याला पद देण्यात यश मिळविले. दोन महिन्यानंतर फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महापौर निवडीवेळी भाजपची सत्ता वाचवण्यासाठी फार मोठी कसोटी असेल.

याच पार्श्वभूमीवर भाजपच्या महापौर गीता सुतार यांनी जयंतरावांना आपल्या डोक्‍यावर हात ठेवा, असे आवाहन केल्याने भाजप नेते अवाक झाले आहेत.  भाजपची सत्ता येथे केवळ नाममात्र उरली असल्याचे वाटू लागले आहे. कारण आयुक्त नितीन कापडणीस हे सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात काम करत आहेत. भाजपची राज्यात सत्ता होती, तेव्हा भाजपने काँग्रेसला खिंडीत गाठण्यासाठी असा प्रयोग केला होता. तोच खेळ आता जयंतरावाकडून सुरू आहे. 

आता तर जयंतरावांना फारसा कोणी विरोधकच उरलेला नाही. वाळव्यातच जयंतरावांचे विरोधक आता थंड झालेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या सर्वांना बळ मिळाले होते. आता सदाभाऊबरोबरच वैभव नायकवडीही सावधपणे सर्व पाहताहेत. यापूर्वीसुध्दा जयंतरावांनी भाजपचे राज्यातील बडे नेते असलेले अण्णा डांगे यांना राष्ट्रवादीत आणले आणि आपल्या तालुक्‍यातील विरोधक कमी करण्यात यश मिळविले होते.

पण निशिकांत पाटील यांच्या रुपाने असा विरोधक उभा राहिला की थेट नगराध्यक्ष निवडणुकीत जयंतरावांना आपल्याच तालुक्‍यात मोठा पराभव पहायाला मिळाला होता. तो त्यांच्या खूप जिव्हारी लागला. जयंतराव म्हणजे अन्य नेत्यांपेक्षा वेगळे आहेत. सर्वांचे हिशेब ठेवतात आणि वेळ आली की त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर "कार्यक्रम' करतात.

आता मोदी लाट वगैरे असली तरी तसा त्यांनी कॉंग्रेसचा कार्यक्रम येथे केल्यानेच भाजप वाढली, हे मान्यच करावे लागेल. मध्यंतरी मदन पाटील यांचा संपूर्ण गटच राष्ट्रवादीत जाणार अशी हवा तयार झाली होती. पण कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांनी शिष्ठाई करून जयश्रीताईंचे मन वळविल्याने जिल्ह्यातील कॉंग्रेसचा एक मोठा सांगली-मिरजेतील गट वाचला आहे.

परवा विश्वजीत यांनी राष्ट्रवादीच्या वसाहतवादाला विरोध देखील केला आहे. पण जयंतरावांची यापूर्वीची अस्वस्था अनेकदा समोर आली आहे. सांगली महापलिका ताब्यात घेवून मदन पाटलांशी त्यांनी हिशेब चुकता केला होता. पण त्यानंतर ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्यांच्या जिल्ह्यातूनच राष्ट्रवादीची वजाबाकी खूप मोठी झाली होती. संजयकाका आधीच गेले होते.

राष्ट्रवादीत राहूनच विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, राजेंद्रअण्णा देशमुख, पृथ्वीराज देशमुख या सर्वांनी संजयकाकांना मदत करून या जिल्ह्यात पहिल्यादांच काँग्रेसचा मोठा पराभव घडविला होता. हा सारा इतिहास सांगलीच्या जनतेला पाठ आहे. मग राष्ट्रवादीचे आमदार कमी झाले, जिल्हा परिषद ताब्यातून गेली.

इस्लामपूरसह तासगावसारखी मोठी नगरपालिका ताब्यातून गेली. त्यामुळे नुसते कॉंग्रेसचेच नाही तर राष्ट्रवादीलाही मोठा फटका मोदीलाटेचा आणि दोन्ही काँग्रेसच्या निष्क्रियतेचा बसला.  एक काळ जयंतराव 15 वर्षे मंत्री राहिले, पण त्याकाळात एकदाही या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळू शकले नाही. ते त्यांना मिळू नये यासाठी पतंगरावांनी कधीच आपली पकड ढिली होऊ दिली नाही. 

भले काँग्रेसमध्ये दादा आणि कदम गट असा मोठा संघर्ष राहूनसुध्दा राष्ट्रवादी पतंगरावांना टरकून होती.कारण 2012 मध्ये राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांचे राज्यात आघाडी सरकार असताना आणि हे तिघेही मंत्री असतानाही पतंगरावांनी राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या जिल्हा बॅंकेत प्रशासक आणला होता. पतंगरावांनी राष्ट्रवादीला फार शिरजोर होऊन दिले नव्हते. आता ना मदन पाटील आहेत ना पतंगराव... दोघेही नसल्याने जयंतरावांना जिल्ह्यात तुल्यबळ असा समर्थ नेताच दुर्दैवाने सध्या नाही.

त्यात राज्यात आलेली सत्ता, पक्षाचे अध्यक्षपद आणि पालकमंत्रीपद अशी सर्व आयुधे मिळाल्याने आणि मुळात जयंतरावांमध्ये प्रचंड महत्वकांक्षी नेता सुप्त अवस्थेत पहिल्यापासूनच असल्याने ते मिळालेल्या या संधीत भाजपचा कार्यक्रम करण्याची रणनीती आखत आहेत. किंबहुना सर्व प्लॅन तयार देखील आहे, अशी चर्चा आहे.  

फेब्रुवारी 2021 मध्ये महापौर निवड आहे. हे पद यावेळी खुल्या गटासाठी असल्याने भाजपमध्ये मोठी स्पर्धा असणार आहे. महापौर निवडीची धाकधुक भाजपसाठी मोठी असेल. आता त्यांच्या नेत्यांनीच स्वत: येथे मान्य केले आहे. महापालिकेची सत्ता ही भल्याभल्यांना पेलवलेली नाही.

संभाजी पवारांचा गट फुटला, मदन पाटलांचे कारभारीही फोडले आणि जयंतरावांनी केलेली महाआघाडी देखील अखेर फुटली. त्यामुळे महापालिकेच्या सत्तेला विरोधकांकडून फुटीचे असलेले भय इथले कधीच संपलेले नाही. जयंतराव परत हिशेब चुकता करण्याचा प्रयत्न करू शकतात, देशपांडे, इनामदारांच्या वरचं प्रेम म्हणजे कहीपे निगाहे कहीपे इशारा आहे हे मात्र नक्की ! 

पॉलिसी.. जयंतरावांची अन्‌ त्यांचीही 

जयंत पाटील यांनी सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्यासह बाजार समितीच्या नऊ संचालकांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला. त्यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी आधी नाराजी व्यक्त केली आणि नंतर विश्‍वजीत कदम हेही बोलले. वास्तविक, जयंतराव राजकारणात लोकांना वापरून घेतात तसे दुसऱ्या फळीतील नेतेही वरिष्ठ नेत्यांचा सोयीनुसार वापर करतात, हे बाजार समितीतील प्रवेश नाट्याच्या निमित्ताने स्पष्ट झाले. दिनकर पाटील हे मदनभाऊ गटाचे. भाऊंच्या पश्‍चात ते संजयकाका समर्थक झाले.

संजयकाकांची राज्याच्या राजकारणातील ताकद कमी झाल्यावर आता जयंतरावांचे बोट धरले. हे करताना ते फुकटात आले नाहीत, त्यांनी बाजार समिती संचालक मंडळाला मुदतवाढ घेतली. बाजार समितीत देवघेवीचा बाजार झाला. अर्थातच, जयंतराव त्याची फिकीर करणारे नाहीत. ते बेरिज जितक्‍या झटपट करतात, तितक्‍याच झटपट वजाबाकीलाही तयार असतात. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com