विलासकाकांची किमया : तुळशीच्या लग्नाला ऊस मिळत नव्हता तेथे हजारो टन आता उत्पादन - Vilasrao Undalkar's Alchemy: Thousands of Tons of Sugarcane Produced Now | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

विलासकाकांची किमया : तुळशीच्या लग्नाला ऊस मिळत नव्हता तेथे हजारो टन आता उत्पादन

बाबूराव शिंदे 
मंगळवार, 5 जानेवारी 2021

शिवार हिरवेगार असेल, तर बाजारपेठही गजबजते. हे ओळखून त्यांनी देशातील पहिला महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्प हाती घेतला. वारणा नदीचे पाणी कृष्णेत आणून त्यांनी कऱ्हाड तालुक्‍यातील सुमारे पाच हजार एकराला पाणी आणले. जिथे कधी तुळशीच्या लग्नाला ऊस मिळणे दुरापास्त होते, त्या गावात आज हजारो टन ऊस पिकत आहे.

विलासकाका केवळ स्वातंत्र्यसैनिकांचे सुपुत्र नव्हते, तर देशासाठी लढलेल्या, तुरुंगवास भोगलेल्या शामराव पाटील या स्वातंत्र्यसैनिकाचे बंधूही होते. त्यामुळे या देशाला मिळालेले स्वातंत्र्य काय किंमत चुकवून मिळवले आणि ते काय किंमत चुकवून टिकवून ठेवायचे, हे ते जाणत होते. त्यासाठीचाच निरंतर ध्यास त्यांना लागलेला होता. गेल्या 50 वर्षांच्या राजकारणात जात्यंध- धर्मांध आणि धनदांडग्या शक्‍ती त्यांच्या "हिटलिस्ट'वर राहिल्या. आज एकप्रकारे लोकशाहीतील गुणात्मकता आणि नैतिकता हरवत चालली आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी विकासनीतीवर आधारित राजकारण केले.

त्यांच्या या राजकारणाला दक्षिण कऱ्हाडमधील जनतेने दीर्घकाळ दिलेला पाठिंबा म्हणूनच अभूतपूर्व म्हणावा लागेल... महाराष्ट्राचा- विशेषत: सातारा जिल्ह्याच्या विसाव्या शतकातील साठोत्तरी राजकारणाचा इतिहास जेव्हा कधी लिहिला जाईल, तेव्हा राजकीय अभ्यासकांना काकांच्या नावाशिवाय हा इतिहास पूर्ण करता येणार नाही... 

विलासकाकांचे वडील बाळकृष्ण पाटील ऊर्फ दादा उंडाळकर. दादांनी आपली शेती आणि जोडधंदा सांभाळत असताना समाजाप्रती आपले कर्तव्य निभावण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला. देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या चळवळीत हिरिरीने सहभागी होताना 9 ऑगस्ट 1942 ला कऱ्हाडला इंग्रज सरकारविरुद्ध निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व केले. अशा प्रखर देशभक्‍ताचे विलासकाका हे सुपुत्र. आपल्या मुलांनी ही देशभक्‍तीची- समाज बांधिलकीची परंपरा पुढे चालवावी, असे या पित्याला तीव्रतेने वाटत होते.

पदवीधर झाल्यानंतर काकांनी वकिलीचे शिक्षण घेतले. उदरनिर्वाहासाठी ते वकिली व्यवसायास सुरवात करणार होते. दादांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्याकडे जनतेची वकिली करण्यासाठी काकांना सुपूर्द केले. तिथपासून आजतागायत विलासकाकांचा हा लोकसेवेचा यज्ञ अखंडपणे धगधगत राहिला. 

काकांची सुरवात झाली ती जिल्हा परिषदेत उंडाळे परिसरातील प्रतिनिधित्व करण्यापासून. तिथे त्यांना लगेच पदाधिकारीही निश्‍चितपणे होता आले असते; पण वडिलांनी पक्ष संघटनेच्या आणि राष्ट्रीय विचारधारेच्या प्रसारासाठी त्यांना कार्यरत राहण्यास सांगितले होते. त्या वेळी जिल्हा कॉंग्रेस समितीचे उपाध्यक्ष आणि पुढे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. याच काळाच यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांच्या सान्निध्यात- सहवासात त्यांच्यातील कार्यकर्ता घडत गेला.

थोरामोठ्यांची विचार मौक्तिके कानावर पडत गेली. राष्ट्रीय विचारांच्या बैठकीवर कार्यकर्ता म्हणून त्यांचा पाया भक्‍कम होत गेला. कॉंग्रेस पक्षाने त्या वेळी त्यांना तत्कालीन कऱ्हाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा बहुमान दिला. नंतर लगेचच दक्षिण कऱ्हाड मतदारसंघातून ते विधानसभेचे प्रतिनिधी ठरले. सन 1979 ते 2014 पर्यंत सलग सात वेळा तब्बल 35 वर्षे ते मतदारसंघाचे आमदार राहिले.

दक्षिण कऱ्हाडसारख्या महाराष्ट्रातील एका जागरूक मतदारसंघाचे दीर्घकाळ यशस्वीपणे प्रतिनिधित्व करताना त्यांची अनेक राजकीय गुणवैशिष्ट्ये झळाळून निघाली. लोकप्रतिनिधींचे नेमके काय काम आणि सामान्यांच्या व्यक्‍तिगत सुख-दु:खात सहभागी होताना त्याच्याशी पिढ्यान्‌पिढ्यांचे नाते कसे निर्माण करायचे; याचा एक मानदंड त्यानी महाराष्ट्रापुढे उभा केला. 
विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.

तयार केलेला रस्ता कधीतरी उखडतोच. तो पुन्हा तयार करावा लागतो; पण काही कामे अशी असतात, जिथे नेतृत्वाचा आणि त्याच्या ठायी असणाऱ्या विकासविषयक दृष्टीचा कस लागतो. यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत असणारा कृषी- औद्योगिक विकास आणि त्या विकासाचे प्रारूप त्यांना सदोदित खुणावत आले. शेती उत्पादनाला पूरक ठरणाऱ्या अनेक संस्था त्यांनी स्थापन केल्या- विकसित केल्या.

मग ती कऱ्हाड कृषी उत्पन्न बाजार समिती असो, कोयना सहकारी दूध संघ असो, खरेदी- विक्री संघ असो, की कोयना सहकारी बॅंक असो... आज या संस्थांचा कारभार केवळ जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रापुढे आदर्श म्हणून उभा आहे. चव्हाणसाहेबांना हे असे संस्थात्मक- रचनात्मक काम अपेक्षित होते. ते काकांकडून अत्यंत गुणात्मक निकषावर उभे राहिलेले पाहताना, चव्हाण साहेबांच्या विचार संपत्तीचे तेच खरेखुरे वारसदार ठरतात.

शेतीला पाणी मिळाल्याशिवाय अपेक्षित कृषी- औद्योगिक विकास- समाज रचना आकाराला येणार नाही. शिवार हिरवेगार असेल, तर बाजारपेठही गजबजते. हे ओळखून त्यांनी देशातील पहिला महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्प हाती घेतला. वारणा नदीचे पाणी कृष्णेत आणून त्यांनी कऱ्हाड तालुक्‍यातील सुमारे पाच हजार एकराला पाणी आणले. जिथे कधी तुळशीच्या लग्नाला ऊस मिळणे दुरापास्त होते, त्या गावात आज हजारो टन ऊस पिकत आहे.

शिवाराला पाणी आणत असताना, त्यांचे मन रयत सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत मग्न होते. शिवरायांनी स्थापन केलेले रयतेचे स्वराज्य, कर्मवीर भाऊराव पाटीलांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी सुरू केलेली रयत शिक्षण संस्था... आणि त्याच विचारांना वाट पुसत त्यांनी रयत सहकारी साखर कारखाना आणि रयत संघटना स्थापन केली. त्यांची रयत संघटना म्हणजे राष्ट्रीय चारित्र्य घडविणाऱ्या कार्यकर्त्यांची पाठशाळा ठरली. 

काकांनी सार्वजनिक जीवनात केवळ सत्तेचे- पक्ष संघटनेचेच राजकारण केले नाही. ते तर त्यांनी केलेच, त्यासाठी त्यांनी प्रसंगी आप्त- स्वकीयांशी लढा दिला. स्वत:चे राजकारण प्राधान्याने सुरक्षित ठेवताना त्यांनी मुत्सुदेगिरीही दाखवली; पण त्यांचा अधिकांश ध्यास राहिला तो सर्वांगीण समाज परिवर्तनाचा आणि लोकशाहीच्या गुणात्मक वाढीचा..! आपला समाज केवळ "पैसेवाला' बनून चालणार नाही.

तो अभिरुचीने आणि व्यापक विचारांनी समृद्ध असला पाहिजे. आपल्याला जे मिळाले, ते देण्यात पूर्वजांचा वाटा मोठा आहे. या पूर्वजांविषयी समाजमनात कृतज्ञतेचा भाव सतत तेवत राहिला पाहिजे. त्यांची ही कळकळ त्यांनी अनेकविध उपक्रमांतून समाजापर्यंत पोचवली. आपल्या मायपांढरीत- उंडाळे येथे जवळपास पन्नास वर्षे सुरू असलेले स्वातंत्र्यसैनिक संग्राम अधिवेशन हा केवळ महाराष्ट्रातील नव्हे, देशातील नव्हे, तर जगातील एकमेव उपक्रम असावा.

 जिथे आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील सर्वसाथींना एकत्र बोलावले जाते, त्यांच्या समक्ष देशाच्या वाटचालीचे सिंहावलोकन केले जाते. याच व्यासपीठावरून आजवर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी जे मार्गदर्शन केले, त्याची शिदोरी घेऊन त्यांचे अनेक कार्यकर्ते- अनुयायी समाजजीवनात आज कार्यरत आहेत. आजही कुठल्याही गावचा स्वातंत्र्यसैनिक असो, त्याच्याप्रती काकांनी जपलेली इतकी आत्मियता दुसऱ्या कुणात दिसली नाही.

केवळ काकांमुळेच वडूजच्या त्या ऐतिहासिक मोर्चाचे स्मारक उभे राहिले आणि हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या स्मृती चिरंतन झाल्या.  समाजवादाला समांतर व्यवस्था म्हणून सहकारी चळवळीकडे पाहिले जाते. सहकारात आदर्श- शिस्त आणि निरपेक्ष भाव ज्यांना कुणाला पाहायचा असेल, त्यांनी केवळ काकांकडेच बघावे, अशी त्यांची प्रतिमा सहकार क्षेत्रातील कामातून उभी राहिली.

आज संबंध देशात सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे काम आदर्श मानले जाते. बॅंकेच्या या वाटचालीत बाळासाहेब देसाई, आर. डी. पाटील, किसन वीर यांच्या नामावलीत काकांचेही नाव आता घ्यावे लागेल. जिल्हा बॅंकेच्या कारभारावर त्यांची अखेरपर्यंत करडी नजर होती. किंबहुना गेल्या 50 वर्षांत त्यांच्या या करड्या आर्थिक शिस्तीमुळे बॅंकेने हे यश मिळवले आणि टिकवलेही. 

कधी कधी प्रश्‍न पडायचा, की काका डावे, की उजवे...? आम्हाला वाटते काका डाव्या- उजव्याच्या नेहमीच मध्यभागी राहिले. डाव्यांमधला कर्कशपणा टाळला; पण अन्यायाविरुद्ध आणि शोषणकर्त्या- भ्रष्ट जमातीविरुद्ध लढण्याची चळवळी जिद्द त्यांनी याच विचारातून घेतली. उजव्यांमधली राष्ट्रीय विचारधारा उत्कटपणे स्वीकारत असताना सवंग लोकानुनय त्यांनी कटाक्षाने टाळला.

अशा डाव्या- उजव्यातल्या चांगल्या विचारगुणांचा समुच्चय आम्हाला त्यांच्या नेतृत्वाच्या ठायी दिसला, नव्हे..नव्हे.. याच विचारधारेच्या बळावर ते मूलतत्त्ववादी- फॅसिस्ट प्रवृत्तींच्या विरोधात लढत राहिले. राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहात असताना, महात्मा गांधींना अभिप्रेत असणाऱ्या शेवटच्या माणसाचं कल्याण पाहिलं आणि त्यातच धोरणात्मक निर्णयाच्या अंमलबजावणीतील यशही पाहिले. 

ते केवळ स्वातंत्र्यसैनिकाचे सुपुत्र नव्हते, तर देशासाठी लढलेल्या, तुरुंगवास भोगलेल्या शामराव पाटील या स्वातंत्र्यसैनिकाचे बंधूही होते. त्यामुळे या देशाला मिळालेले स्वातंत्र्य काय किंमत चुकवून मिळवले आणि ते काय किंमत चुकवून टिकवून ठेवायचे, हे ते जाणत होते. त्यासाठीचाच निरंतर ध्यास त्यांना लागलेला होता.

हा स्वतंत्र झालेला देश आणि त्याचे झालेले सुराज्य पुन्हा- पुन्हा संकुचित विचारांची दृष्ट लागून धोक्‍यात येऊ नये, म्हणून ते नेहमीच जागरूक राहिले आणि इतरांनाही जागे करीत राहिले. गेल्या 50 वर्षांच्या राजकारणात जात्यंध- धर्मांध आणि धनदांडग्या शक्‍ती त्यांच्या "हिटलिस्ट'वर राहिल्या. आम्हालाही आताशा कळू लागले आहे, की ते किती योग्य दिशेने चालत होते आणि त्यांनाच हा धोका कळालेला होता.

आज राजकारणात यशस्वी होण्यासाठी सत्तेवर चढाई करण्यासाठी जातीचा- धर्माचा आधार घेण्याचा अनेकांचा अश्‍लाघ्य प्रयत्न सुरू आहे, तर पैशाच्या जीवावर अनेक विचारहीन सुमार माणसं सत्तेत आली आहेत. एकप्रकारे लोकशाहीतील गुणात्मकता आणि नैतिकता हरवत चालली आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी विकासनीतीवर आधारित राजकारण केले आणि त्यांच्या या राजकारणाला दक्षिण कऱ्हाडमधील जनतेने दिलेला पाठिंबा म्हणूनच अभूतपूर्वच म्हणावा लागेल. 

सार्वजनिक जीवनाची पन्नास वर्षे पूर्ण करत असताना आम्हाला अनेक स्थित्यंतरातून- संघर्षातून समाजाभिमुख- विकासाभिमुख राजकारण करीत उभा राहिलेला लोकनेता काकांच्या रूपात दिसला. त्यांच्या चरित्रातून- चारित्र्यातून संदेश घ्यावा, जात- धर्मापलीकडे जाऊन मानवतेच्या भूमिकेतून राजकारण करताना निरपेक्ष भाव मनात जागता ठेवावा... स्वीकारलेला विचार घट्टपणे समाजात रुजवावा आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीत स्वत:लाही सातत्याने तपासत जावे... काकांची ही शिकवण आमची पिढी नेहमीच शिकत राहील... 

महाराष्ट्राचा- विशेषत: सातारा जिल्ह्याच्या विसाव्या शतकातील साठोत्तरी राजकारणाचा इतिहास जेव्हा कधी लिहिला जाईल, तेव्हा या राजकीय अभ्यासकांना त्यांच्या नावाशिवाय हा इतिहास पूर्ण करता येणार नाही. 
चव्हाण साहेबांच्या "यशवंत' नीतीनंतर आपल्या स्वत:ची "विलासकाका' नीतीची या पाच- सहा दशकांच्या राजकारणावर उमटलेली मुद्रा सदैव अम्लान राहणारी आहे. काकांच्या व्यक्‍तिगत जीवनात अनेक चढउतार आले.

त्या वेळी कष्टी झालेल्या मनाला एक औषध लागू पडले ते म्हणजे माणसं आणि जीवाभावाचे कार्यकर्ते..! त्यामुळे ते घरात- कुटुंबात कमी आणि लोकांत जास्त.. नव्हे.. नव्हे.. अवघा मतदारसंघच त्यांचा कुटुंब बनले. ते सदैव लोकांत रमले आणि हे लोकच त्यांचा श्‍वास बनले. या लोकांच्या बळावर त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेलं जग सुंदर- समृद्ध केले.

काकांनी आमच्या पिढीला केवळ राजकारणच नव्हे, तर समाजकारण, विकासकारण शिकवले, सहकार शिकवला.. शिकवलं जात-धर्माच्या पलीकडं जाऊन माणूस म्हणून जगायला. स्वाभिमानाने आत्मनिर्भर व्हायला. संकुचित विचारांचा वारा लागून मनांत तेवणारी राष्ट्रीय विचारांची ज्योत विझू नये म्हणून त्यांनी सदोदित प्रबोधनाचा पदर सुरक्षा भिंतीसारखा धरला. 

काकांनी विकासाची फळं दिली.. मानवतावादी विचारांची सावली दिली.. त्यांच्याविषयी मला वाटणारी कृतज्ञता ही शब्दातीत आहे... केवळ त्यांच्या कुटुंबीयांनी, अनुयायांनीच नव्हे, तर अवघ्या समाजाने पिढ्यानंपिढ्या मस्तकी धारण करावा आणि उजळ माथ्याने मिरवावा, असा वारसा निर्माण करून ते गेले आहेत... 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख