शिवेंद्रराजेंपुढे दोनच पर्याय : राष्ट्रवादीशी दोन हात नाही तर हातावर घड्याळ! - Shivendrasinharaje have two options either join ncp or fight with ncp | Politics Marathi News - Sarkarnama

शिवेंद्रराजेंपुढे दोनच पर्याय : राष्ट्रवादीशी दोन हात नाही तर हातावर घड्याळ!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने या मतदारसंघात उतरली, तर शिवेंद्रसिंहराजेंना सातारा पालिकेच्या निवडणुकीसह आगामी जिल्हा बॅंक, साखर कारखाना, बाजार समिती आदी निवडणुकांतही राष्ट्रवादीशी दोन हात करावे लागतील. त्यामुळे पुढची सर्व गणिते अवघड होण्याची शक्‍यता असल्यानेच शिवेंद्रसिंहराजे आक्रमक झाले आहेत.

सातारा : विकासकामांच्या मुद्द्यावर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आता अडचण होऊ लागली आहे. शिवेंद्रसिंहराजेंची उपमुख्यमंत्री अजित पवारांशी जरी जवळीक असली, तरी ते भाजपमध्ये असल्याने राष्ट्रवादीने या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून रणनीती राबविण्यास सुरवात केली आहे. यातूनच आता शिवेंद्रसिंहराजे व शशिकांत शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. या वादाला शशिकांत शिंदेंच्या कोरेगावातील पराभवाची किनारही आहे. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघातील विकासकामांचा मुद्दा पुढे करून शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला; पण राज्यात भाजपऐवजी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. त्यामुळे दोन्ही राजेंच्या अपेक्षा अखेर फोल ठरल्या; पण सत्ता कोणाचीही असो विकासकामांसाठी मंत्र्यांशी संपर्क ठेवावाच लागतो. या उद्देशाने शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये असले तरी त्यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चांगली जवळीक राहिलेली आहे.

त्यांनी अनेक विकासकामे त्यांच्या माध्यमातून मार्गी लावली आहेत. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे आगामी काळात राष्ट्रवादीमध्ये येतील, अशी आशा सातारकरांना आहे; पण शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये असल्याने राष्ट्रवादीचा हक्काचा मतदारसंघ सातारा- जावळीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासोबतच पक्ष संघटना बांधणेही गरजेचे होते. त्यासाठी शशिकांत शिंदे यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांच्यावर पक्ष संघटना बांधणीची जबाबदारी दिली गेली.

त्यानुसार त्यांनी आता जावळी व सातारा तालुक्‍यांत लक्ष घातलेले आहे. परिणामी श्री. शिंदे यांचा हा हस्तक्षेप शिवेंद्रसिंहराजेंना त्रासदायक ठरू लागला आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीला मतदान केले म्हणून काही कार्यकर्त्यांचा ऊस तोडला जात नाही, याबाबतच्या तक्रारी आमदार शिंदे यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.

या सर्व पार्श्‍वभूमीवर शिवेंद्रसिंहराजेंनी कुडाळ येथील शेतकरी मेळाव्यात "माझी वाट लावण्याचा प्रयत्न केल्यास मी समोरच्याची वाट लावल्याशिवाय गप्प बसणार नाही', असा सज्जड दम आमदार शशिकांत शिंदे यांना भरला आहे. त्यावरून सध्या शिवेंद्रसिंहराजे-शशिकांत शिंदे यांच्यात वादाची ठिगणी पडली आहे, तर शशिकांत शिंदेंनीही याला प्रतिउत्तर देत पक्ष म्हणून माझा विरोध राहणार असून, मला पक्षाने सातारा- जावळीतून उभे राहावे, अशी सूचना केली आहे.

त्यामुळे या मतदारसंघात पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणारच. त्यासाठी कोणतेही आव्हान स्वीकारण्याची माझी तयारी आहे, असे प्रतिउत्तर दिले आहे.  शशिकांत शिंदे यांच्या कोरेगाव मतदारसंघातील पराभवास खासदार उदयनराजे भोसले कारणीभूत आहेत, तेवढेच आमदार शिवेंद्रसिंहराजेही असल्याची भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत आहे. हा आरोप शिवेंद्रसिंहराजेंना मान्य नाही, तर राष्ट्रवादीने शशिकांत शिंदे यांना सातारा-  जावळीत उतरविले, तर शिवेंद्रसिंहराजेंची अडचण होऊ शकते. शिवेंद्रसिंहराजेंची जावळी व साताऱ्यात ताकद आहे; परंतु यातील काही राष्ट्रवादीला मानणारे पदाधिकारी व कार्यकर्तेही आहेत.

राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने या मतदारसंघात उतरली, तर शिवेंद्रसिंहराजेंना सातारा पालिकेच्या निवडणुकीसह आगामी जिल्हा बॅंक, साखर कारखाना, बाजार समिती आदी निवडणुकांतही राष्ट्रवादीशी दोन हात करावे लागतील. त्यामुळे पुढची सर्व गणिते अवघड होण्याची शक्‍यता असल्यानेच शिवेंद्रसिंहराजे आक्रमक झाले आहेत. त्यांच्यापुढे आता एकच पर्याय उरला आहे. एकतर राष्ट्रवादीत प्रवेश करणे अथवा राष्ट्रवादी विरोधात दोन हात करणे!

त्यासाठी त्यांना खासदार उदयनराजे भोसले यांची साथ मिळणार का, हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. शिवेंद्रसिंहराजेंच्यासोबत असलेल्यांना आजपर्यंत मिळालेली विविध राजकीय पदे ही राष्ट्रवादीच्या ताकदीच्या जोरावर मिळाली होती. आता या सर्व संस्थांत राष्ट्रवादीने लक्ष घातल्यास शिवेंद्रसिंहराजेंना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागेल. त्यासाठी भाजपकडून त्यांना साथ मिळणे गरजेचे आहे. 

 

शिवेंद्रसिंहराजेंना उदयनराजेंची साथ मिळणार? 

सातारा- जावळी मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले यांचीही ताकद आहे; पण सध्या दोन्ही राजे भाजपमध्ये असूनही त्यांच्यात मनोमिलन दिसत नाही. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंनी राष्ट्रवादीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यास त्यांना आगामी काळात उदयनराजेंची साथ मिळणार का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. उदयनराजेंनी त्यांना साथ न दिल्यास शिवेंद्रसिंहराजेंना सर्वच निवडणूका एकतर्फी लढाव्या लागतील. त्यामुळे राष्ट्रवादीशी पंगा घेणे शिवेंद्रसिंहराजेंना सध्यातरी सोपे राहणार नाही. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख