संबंधित लेख


बिजवडी (ता. माण) : माण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकांच्या निमित्ताने राजकीय आखाडा रंगला आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या वरिष्ठ नेतेमंडळींच्या...
मंगळवार, 12 जानेवारी 2021
विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान, जयकुमार गोरे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर माण-खटाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले. आता युवा नेते रणजितसिंह देशमुख हे पुन्हा स्वगृही परतल्याने काँग्रेसची ताकद आणखी वाढणार आहे.
सातारा : माण-खटावचे जिल्हा परिषद माजी सदस्य आणि शिवसेनेचे युवा नेते रणजितसिंह देशमुख यांनी स्वगृही म्हणजेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे माण खटाव तालुक्यातील राजकिय समीकरणे बदलणार असून काँग्रेस पक्षाला बळ मिळणार आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान, जयकुमार गोरे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले होते. पण श्री. देशमुख यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद या मतदारसंघात वाढण्यास मदत होणार आहे.
रणजितसिंह देशमुखांवर आमच्याकडून अन्याय झाला, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे. रणजितसिंह हे अत्यंत तडफेने काम करणारे नेते आहेत. आपण तीन पक्ष सत्तेत आहोत, त्यातून पक्ष बळकट करायचा आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांचे हात बळकट करायचे आहेत, असं सूचक विधान श्री. चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
रणजितसिंह देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेत धाकधूक वाढली आहे. रणजितसिंह देशमुख यांच्या पक्ष प्रवेशामुळे माण-खटाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष, तसेच सातारा जिल्ह्यातही काँग्रेस पक्ष उभारी घेईल, असा विश्वास जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमधून उमटत आहे. काही दिवसांपूर्वी कऱ्हाडात देखील आपापसातील मतभेद विसरुन विलासकाका उंडाळकारही स्वगृही परतल्याने कऱ्हाडात देखील काँग्रेसची ताकद वाढणार असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाला बळ मिळणार आहे.