भगीरथ भालके की अवताडे? : कोणीही विजयी झाला तरी मतांचा फरक किती राहणार यावर सहमती!

राज्यातील सत्तेची समीकरणे बदलणार की तशीच राहणार याचाही मिळणार कौल
bhagirath bhalake-avtade
bhagirath bhalake-avtade

पंढरपूर : अत्यंत चुरशीने  पार पडलेल्या पंढरपूर-  मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (ता. 2 मे) सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. एकूण 14 टेबलवरून 38 फेऱ्यांद्वारे मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे अंतिम निकालासाठी उशिर लागण्याची शक्यता आहे. येथील शासकीय धान्य गोदामात पोलिस बंदोबस्तात ही सारी प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्यांदा टपाली मतांची मोजणी केली जाणार आहे. 

यासाठीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी आज दिली. या निवडणुकीत एकूण  2 लाख 34 हजार मतदारांनी 17 एप्रिल रोजी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीसाठी 160 कर्मचाऱ्यांची नियुक्ति केली आहे. मतमोजणी केंद्रात येणार्या मतमोजणी प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली आहे. शिवाय 50 टक्के मतमोजणी प्रतिनिधींसाठी पीपीई कीट देण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्राजवळ जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर 17 एप्रिल रोजी मतदान झाले. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना तर भाजपकडून उद्योगपती समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादी आणि भाजपकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. राष्ट्रवादी आपली जागा कायम राखणार की भाजपचे कमल फुलणार हे उद्या कळणार आहे. अवताडे आणि भालके समर्थकांनी विजयाचा दावा केला असला तरी दोन्ही उमेदवारांच्या मतांत फारसा फरक राहणार नाही, पाच ते दहा हजाराच्या मताधिक्याने उमेदवार विजयी होईल, असाही अंदाज दोन्ही बाजूंनी व्यक्त होत आहे. अवताडे यांच्यासाठी प्रशांत परिचारकांना जोरात काम केले. त्यामुळे पंढरपुरात त्यांना चांगली साथ मिळेल, असे सांगण्यात येते. तसेच राष्ट्रवादीला स्वाभिमानीच्या उमेदवारीचा फटका बसणार की सोय होणार, याबाबत दोन्ही बाजूंनी मते व्यक्त होत आहेत. स्वाभिमानीची मते भाजपला जाऊ नये यासाठी राजू शेट्टी यांनी उमेदवार उभा केला, असे राष्ट्रवादीचे समर्थक सांगतात तर स्वाभिमानीच्या पाठीशी काही जुने भालके समर्थकच आहेत. ती मते भालकेंचीच होती. त्यामुळे स्वाभिमानीच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी अडचणीत येऊ शकते, असेही मत व्यक्त होत आहे.

अवताडे यांचे चुलतबंधू सिद्धेश्वर हे मंगळवेढ्यातून किती मते खाणार, यावरही काही गणिते मांडत आहेत. ते पाच ते सात हजारांच्या पुढे मते घेणार नाहीत, असाही अंदाज व्यक्त होतोय. भारतनाना भालके यांना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात असल्याने त्यांच्या वारसदारालाच ते निवडून देतील. त्यामुळे हा मतदारसंघ भालके यांचाच राहण्याचा विश्वास राष्ट्रवादीतून व्यक्त होत आहे. भाजप समर्थक मंडळी हे अवताडेंच्या व्यवस्थेवर भर देत आहेत. पंढरपुरात अवताडेंनी चांगली फिल्डिंग लावल्याचा उपयोग होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच या मतमोजणीकडे राज्याचे लक्ष आहे. या निकालानंतर कोणाचा कार्यक्रम होणार, याची उत्सुकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com