भाजपचे आमदार म्हणून शिवेंद्रसिंहराजेंची राष्ट्रवादीच्या दिग्गजांशी पहिली मॅच ठरली...  - As a BJP MLA, Shivendraraje's first match was with NCP veterans ... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

भाजपचे आमदार म्हणून शिवेंद्रसिंहराजेंची राष्ट्रवादीच्या दिग्गजांशी पहिली मॅच ठरली... 

उमेश बांबरे
शनिवार, 16 जानेवारी 2021

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही कानमंत्र मिळणार आहे. पण, या सर्वांना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची साथ मिळणार का ? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलच्या विरोधात पॅनेल टाकण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतला आहे. यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले आणि अतुल भोसले यांनी पुढाकार घेतलेला आहे.

बॅंकेतील ठरावाची प्रक्रिया लक्षात घेता राष्ट्रवादीच्या नेत्यांवर दबाव वाढवून बॅंकेत प्रवेश करण्याची ही भाजपची रणनीती दिसते आहे. यासाठी सर्वाधिक मते असलेले आमदार व बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ते भाजपसोबत राहणार, की राष्ट्रवादीच्या नेत्यांना साथ देऊन सर्वसमावेशकचा पर्याय निवडणार, यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे. 

सहकारी संस्थांच्या निवडणुकीत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सध्या या निवडणुकीसाठी ठराव करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये निवडणूक होणार आहे. मार्च 2019 मध्ये ठरावाची प्रक्रिया निम्म्यावर असताना बॅंकेच्या निवडणुकीला कोरोनामुळे स्थगिती मिळाली. परिणामी संचालकांना दोन टप्प्यात तीन-तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती.

मार्चमध्ये निवडणूक कार्यक्रम होत असताना निम्मे ठराव झाल्यावर प्रक्रिया थांबलेली होती. आता ही प्रक्रिया तेथून पुढे सुरू होत आहे. त्यामुळे उरलेले ठराव होणार आहेत. त्यासाठी विभागीय सहनिबंधकांनी 25 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. जिल्हा बॅंकेत संचालक होण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी ठराव करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत यावेळेस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. बॅंकेमध्ये सध्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे संस्थांची सर्वाधिक मते आहेत. परिणामी मागील वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, (कै.) लक्ष्मणराव पाटील आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एकत्र बसून निर्णय घेतला होता.

त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून काही महत्त्वाचे बदल व सूचना केली होती. आता यावेळेस निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपचे आमदार आहेत. तसेच आमदार जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले हे संचालकही भाजपमध्ये आहेत. त्यामुळे या दिग्गज नेत्यांच्या माध्यमातून भाजप जिल्हा बॅंकेत पॅनेल टाकण्याची तयारी करत आहे.

यामध्ये माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे व कऱ्हाडचे अतुल भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून पॅनेल टाकण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही कानमंत्र मिळणार आहे. पण, या सर्वांना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची साथ मिळणार का ? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

केवळ दबावाची रणनीती अवलंबून भाजपचे नेत्यांचा जिल्हा बॅंकेत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्नदेखील असू शकतो. सध्यातरी राष्ट्रवादीचे सर्व संचालक येत्या दोन दिवसांत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करून निवडणुकीची आखणी करणार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वसमावेश पॅनेल होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या सर्व घडामोडींत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि आमदार व विद्यमान अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भूमिका या निवडणुकीला कलाटणी देणारी ठरणार आहे. 

"सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलच्या विरोधात आम्ही भाजपचे पॅनेल उभे करणार आहोत. त्यासाठी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, अतुल भोसले यांच्या माध्यमातून रणनीती आखली जाणार आहे. भाजपच्या पक्षपातळीवरील नेत्यांकडून यासंदर्भात येणाऱ्या सूचनांचे पालन केले जाणार आहे.'' 

- रणजितसिंह नाईक-निंबाळकर (भाजपचे खासदार, माढा लोकसभा मतदारसंघ)
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख