वीस वर्षांत कराडात खपल्या 50 लाखांच्या बनावट नोटा - 50 lakh counterfeit notes in Karad in twenty years | Politics Marathi News - Sarkarnama

वीस वर्षांत कराडात खपल्या 50 लाखांच्या बनावट नोटा

सचिन शिंदे 
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

सुमारे 20 वर्षांपूर्वी दोन लाखांच्या बनावट नोटांसह नऊ संशयित अटक झाले. त्यातील दोन कऱ्हाडचे, तर अन्य तिघे सांगली व दोघे कर्नाटकातील होते. 2003 मध्ये 13 जणांना अटक करून त्यांच्याकडून सात लाख 50 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

कऱ्हाड : सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड ही सर्वात मोठी उलाढालीची बाजारपेठ असून, या बाजरपेठेत 20 वर्षांत तब्बल 50 लाखांच्या बनावट नोटा खपवण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी प्रत्येक वेळी हे प्रयत्न हाणून पाडत बनावट नोटा विकणाऱ्या 25 संशयितांना गजाआड केले आहे. त्यात सांगली जिल्ह्यासह इचलकरंजी, रेंदाळचे कनेक्‍शन असून त्याद्वारे कर्नाटकपर्यंतही धागेदोरे जातात. त्यामुळे गजाआड होणाऱ्या टोळीच्या तपासाचे पोलिसांपुढे आव्हान आहे. 

सुमारे 20 वर्षांपूर्वी दोन लाखांच्या बनावट नोटांसह नऊ संशयित अटक झाले. त्यातील दोन कऱ्हाडचे, तर अन्य तिघे सांगली व दोघे कर्नाटकातील होते. 2003 मध्ये 13 जणांना अटक करून त्यांच्याकडून सात लाख 50 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

त्यावेळी एका युवा नेत्यासह दोन महिलांनाही अटक झाली होती. 2005 मध्ये नऊ जणांना अटक करत त्यांच्याकडून दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त झाल्या. 2003 व 2005 मध्ये अटक झालेल्यांचा टोळ्यांचा सूत्रधार एकच होता. जामिनावर बाहेर आल्यावर तो पुन्हा बनावट नोटात सक्रिय होत त्याने नवीन टोळी केली होती. महात्मा गांधीं यांचा नोटात वापरल्या जाणाऱ्या फोटोचा संशयितांनी केलेल्या "वॉटर मार्क'ने पोलिसही चक्रावले होते.

त्यामुळे त्यातील तपासाचे आव्हान पोलिसांसमोर होते. सर्वात मोठी कारवाई 2014 मध्ये झाली. त्यातही 2003 व 205 मधील संशयिताला तब्बल 29 लाखांच्या बनावट नोटांसह अटक झाली. त्या दोघांनीच त्या नोटा तयार केल्याची कबुली दिली होती. त्यामुळे तो तपास पुढे सरकला नाही. त्यापूवी 2012 मध्ये वेगवेगळ्या कारवायांत तब्बल दोन लाख 50 हजारांच्या बनावट नोटा जप्त झाल्या होत्या. त्यात चौघांना अटक होती.

त्यानंतर अंबवडे येथे नुकत्याच एलसीबीने केलेल्या कारवाई दोन लाख 94 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. 20 वर्षांत कारवाई करताना पोलिसांनी तब्बल 50 लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. मात्र, त्या टोळ्यांनी तितक्‍याच नोटा अटक होण्यापूर्वी खपवल्याचीही भीती व्यक्त होते आहे. टोळी असते मात्र एकमेकांची ओळख नसते, त्यामुळे त्याची खरी अडचण पोलिसांपुढे येते आहे. 

मिळतात दुप्पट किमतीच्या नोटा...

बनावट नोटा खपविणारे खऱ्या नोटा जेवढ्या देतील त्याच्या दुप्पट बनावट नोटा त्यांना दिल्या जातात. म्हणजे 50 हजार दिले, की एक लाखाच्या बनावट नोटा खपविण्यासाठी दिल्या जातात. हा व्यवहार रूढ आहे. दुप्पट पैसे मिळवण्यासाठी नोटा खपविण्याच्या व्यवसायाकडे युवक वळत आहे. आतापर्यंत अटक झालेले संशयित चाळीशीतील आहेत. त्यामुळे "शॉर्टकट'चा मोह त्यांना धोक्‍याचा ठरतो आहे. त्याशिवाय सांगली, इचलकरंजी, ते थेट कर्नाटक कनेक्‍शनही तोडण्याचे आव्हान पोलिसांना पेलवले जात नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख