शरद पवारांच्या भेटीने खैरेंच्या पुनर्वसनाचा चमत्कार घडेल का?

राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील हे पवारांना हॉटेलवर घेऊन आले. त्याआधीच चंद्रकांत खैरे तिथे हजर होते. चंद्रकांत खैरे आणि शरद पवार यांच्यात एक वेगळेच नाते असल्याचे अनेकदा दिसून आले. वेगवेगळ्या पक्षात असले तरी खैरेंची शरद पवारांवर श्रध्दा आणि पवारांचे खैरेंवरचे प्रेम आजही कायम आहे.
sharad pawar chandrakant khaire meet news
sharad pawar chandrakant khaire meet news

औरंगाबाद ः कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे राज्यातील काही जिल्ह्यांच्या दौऱ्यावर निघाले आहेत. सोलापूर, नाशिकचा दौरा केल्यानंतर आज औरंगाबादेत ते आढावा घेणार आहेत. या बैठकीसाठी शरद पवार रात्रीच शहरात दाखल झाले. पवारांच्या गाड्यांचा ताफा हॉटेलात दाखल होत नाही तोच शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे नेहमीप्रमाणे हातात पुष्पगुच्छ आणि भगवी शाल घेऊन त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. खैरेंना तिथे पाहून शरद पवारांनी स्मित हास्य केले आणि त्यांच्या स्वागताचा स्वीकारही केला.

यावेळी हॉटेलच्या लॉबीमध्येच या दोन नेत्यामध्ये काहीकाळ चर्चा देखील झाली. महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांची खैरे यांनी घेतलेली भेट ही कोरोना आणि एकंदरितच त्यांच्या राजकीय वाटचालीच्या दृष्टीने महत्वाची मानली जाते.

राज्यातील कोरोना संकट दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. महाविकास आघाडी सरकारला या मुद्द्यावरूनच घेरण्याचे प्रयत्न विरोधी पक्ष भाजपने सुरू केल आहे. आतापर्यंत राज्य सरकार, आरोग्य विभाग आणि प्रशासकीय यंत्रणांनी केलेले प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी ठरले असले तरी तेवढे पुरेसे नाही. नेमके चुकते कुठे हे जाणून घेण्यासाठी आता थेट शरद पवारच मैदानात उतरल्याचे चित्र आहे.

नाशिकचा दौरा आटोपून शरद पवार रात्री दहाच्या सुमारास शहरात दाखल झाले. राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील हे पवारांना हॉटेलवर घेऊन आले. त्याआधीच चंद्रकांत खैरे तिथे हजर होते. चंद्रकांत खैरे आणि शरद पवार यांच्यात एक वेगळेच नाते असल्याचे अनेकदा दिसून आले. वेगवेगळ्या पक्षात असले तरी खैरेंची शरद पवारांवर श्रध्दा आणि पवारांचे खैरेंवरचे प्रेम आजही कायम आहे.

शिवसेना कधीही जात पात मानत नाही हे पटवून सांगतांना शरद पवार आपल्या मुलखती किंवा भाषणातून अनेकदा चंद्रकांत खैरे यांचे उदाहरण देतात. तर दोनवेळा आमदार आणि सलग चारवेळा खासदार म्हणून दिल्लीत काम केलेले चंद्रकांत खैरे हे देखील शरद पवार हे आमचे मार्गदर्शक आणि दिल्लीतील हक्काचे नेते असल्याचे वारंवार सांगतात.

चंद्रकांत खैरे यांच्यातील चांगले गुण ओळखूनच ज्यांच्या समाजाची मुठभर मतेही नाही अशा खैरेंना बाळासाहेब ठाकरेनी मोठ्या पदावर बसवले याचा उल्लेख शरद पवारांनी अनेकदा केला. त्यामुळे खैरे बाळासाहेबानंतर शरद पवार यांनाच आपले गुरू आणि पितृतुल्य मानातात हे त्यांना अनेकदा स्पष्ट केले. तेव्हा शरद पवार औरंगाबादेत आले आणि खैरे त्यांच्या स्वागताला पोहचले नाही असे शक्यच नाही.

गेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा थोडक्यात पराभव झाला आणि तेव्हापासून ते काहीसे मागे पडल्याचे चित्र आहे. ३०-३५ वर्षांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव, शिवसेना व ठाकरे घराण्याशी एकनिष्ठता बाळगून असलेल्या खैरेंवर एका पराभवानंतर त्यांचे राजकारण आता संपले अशी चर्चा सुरू झाली. निवडणुकीतील पराभवानंतर खैरे थांबले नाही, तर अधिक जोमाने त्यांनी स्वःतला संघटनेच्या कामात जुंपून घेतले. अगदी कोरोनाच्या संकटात अन्नधान्य, किराणा सामान व इतर मदतीच्या कामात वयाच्या ६८ व्या वर्षातही खैरै यांनी झोकून देऊन काम केले आणि करत आहेत. 

पुनर्वसनाचा चमत्कार घडेल का?

शिवसेनेकेडून आपले पुनर्वसन केले जाईल अशी अपेक्षा खैरे यांना होती. विधान परिषद किंवा राज्य सभेवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा संधी देतील असा विश्वास असतांना शिवसेनेने महिला प्रतिनिधी म्हणून प्रियंका चतुर्वेदी यांनी संधी दिली. कधी नव्हे ते खैरेंचा संयम सुटला आणि त्यांनी ठाकरे घराण्यावरच टिका करत रोष ओढवून घेतला. नंतर दिलगिरी व्यक्त करत आपण भावनेच्या भरात बोलल्याचे सांगत त्यांनी माफीही मागितली. पण त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही.

मुख्यमंत्री सहायता निधीला एका वर्षाची खासदारकीची पेन्शन मदत म्हणून देणे, आदित्य ठाकरे यांच्या निरोपावरून चेन्नई येथे अडकलेल्या दामपत्यांला मदतीचा हात देत खैरे यांनी ठाकरेंचा विश्वास पुन्हा संपादन करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना वर्धापनदिनाच्या कार्यक्रमा निमित्त खैरेंची ठाकरे यांच्याशी समोरासमोर भेट झाली, पण ती केवळ औपचारिकच ठरली.

शिवसेनेमध्ये पुन्हा मानाचे स्थान मिळवण्यासाठी खैरे प्रयत्नशील आहेत. अशातच औरंगाबाद दौऱ्यावर शरद पवार यांची भेट घेण्याची संधी ते दवडणार नाहीत हे स्पष्ट होते. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक १०५ आमदार असलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसवून तीन वेगवेगळ्या विचारांच्या पक्षाला सत्तेत बसवण्याचा चमत्कार शरद पवारांनी महाराष्ट्रात केला. त्यांच्यासाठी चंद्रकांत खैरे यांचे पुनर्वसन करणे फार अवघड नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत खैरेंनी शरद पवारांची घेतलेली भेट त्यांच्यासाठी भविष्यात ‘चमत्कार' घडवणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com