रुकणार नाही, थकणार नाही, कुणासमोर झुकणार नाही..

मला कुठल्याही पदाची लालसा नाही, मला काही मिळाव हे माझ स्वप्न नाही. वंचिताचा वाली आणि वंचितांची वाणी बनायचंय अस बाबा नेहमी म्हणायचे. तुम्हाला काही तरी मिळाव, तुमच जीवनमान सुधाराव यासाठी भविष्यात आपण प्रतिष्ठाणच्या माध्यमातून काम करू. आजपासून समाजात आत्मविश्वासाने वावरा, पाठीराख्या सारखे उभे राहा. तुम्हाला चांगल्या पदावर बसवता येईल यासाठी तुमचे आशिर्वाद हवे आहेत.
pankaja munde interaction his followers news
pankaja munde interaction his followers news

औरंगाबादः आपल्या पाठीचा कणा जरा कडक आहे तो वाकणार नाही, गोपीनाथ मुंडेंनी आपल्याला स्वाभीमानाने जगायला शिकवले आहे. त्यामुळे पंकजा मुंडेकडे पद नाही, त्या काय करणार, कोणाच्या दारात जाणार असे प्रश्न तुमच्या मनात असतील. पण मी संघर्षातून सत्ता मिळवणाऱ्या स्वाभीमानी नेत्याची लेक आहे, तुमच्यावरही साहेबांनी हेच संस्कार केले आहे. त्यामुळे मी कुणाच्या दारात जाणार नाही, तुम्हालाही जाऊ देणार नाही. स्वाभीमानाची वज्रभूठ आवळून पुन्हा संघर्ष करणार, रुकणार नाही, थकणार नाही, कुणासमोर झुकणार नाही, असे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी समस्त कार्यकर्तांन्या पुन्हा नव्या जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी दिनी सोशल मिडियाच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी राज्यातील मुंडे समर्थकांशी संवाद साधला. कोरोनाच्या संकटामुळे गोपीनाथ गडावर पोहचता आले नाही, पण आज तुम्ही सगळ्यांनी आपल्या घरातच गोपीनाथ गड आणल्याचे चित्र पहायला मिळाले, याबद्दल त्यांनी सगळ्यांचे आभार देखील मानले. अर्ध्या तासाच्या या संवादात पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देत भविष्यात आपली वाटचाल कोणत्या दिशेने असेल हे देखील स्पष्ट केले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, ३ जून हा दिवस तुमच्या माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट दिवस, याच दिवशी काळाने आमच्या साहेबांवर घाला घातला होता. साहेबांच्या जाण्याचे दुःख उराशी बाळत तुम्ही खचून जाऊ नये, तुमची माझी नाळ पुन्हा जोडण्यासाठी मी पुन्हा संघर्ष यात्रा काढली. राज्यात भाजपची सत्ता आली मला मंत्रीपद मिळाले. ज्या गोपीनाथ मुंडे साहेबांना सत्तेच्या खुर्चीत पाहण्याचे स्वप्न तुम्ही पाहिले होते, ते भाग्य मला लाभले. मंत्रालयातील चौथा मजला गर्दीने फुलून गेला होता, इथूनच ९० टक्के लोकांची कामे केली, ज्या १० टक्के लोकांची कामे करु शकले नाही त्याची खंत आजही मला आहे.

परळीतील पराभवानंतर तुमच्या मनात अनेक प्रश्न होते, ताई बोलत का नाहीत? शांत का आहेत? पण मी पराभवाने निराश झाले नव्हते. बाबांच्या जाण्यापेक्षा दुसरे कोणते दुःख माझ्यासाठी मोठे असू शकेल का? त्या दुःखातून देखील मी सावरले, तुम्ही सावरलात. शांत होते यासाठी की काही निर्णय शांतपणेच घ्यावे लागतात. सत्तेत असतांना देखील मला संघर्ष करावा लागला, विरोधकांच्या आरोपांना तोंड द्यावे लागले. साहेबांच्या जीवनात देखील सातत्याने संघर्षाचे प्रसंग आले, पण त्यातून त्यांनी उच्च शिखर गाठले. आपल्यालाही संघर्षातून नवे शिखर गाठायचे आहे.

कोरोनाचे संकट दूर होताच भेटीला...

सध्या देशावर आणि राज्यावर कोरोनाचे संकट आहे, त्यामुळे मी दोन महिन्यापासून तुम्हाला भेटू शकले नाही. पण कोरोनाचे संकट दूर होताच मी तुमच्या भेटीला येणार आहे. सगळ्या महाराष्ट्रात जाणार आहे, तेव्हा माझ्या भेटीसाठी तुम्ही तितक्‍याच संख्येने आणि विश्वासाने या ज्याची सवय तुम्ही मला लावलेली आहे असे आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी केले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणच्या माध्यमातून जो सेवेचा यज्ञ आपण राज्यभरात सुरू केला आहे. त्या यज्ञात मला तुमच्या विश्वास आणि साथीच्या आहुतीची गरज आहे.

मला कुठल्याही पदाची लालसा नाही, मला काही मिळाव हे माझ स्वप्न नाही. वंचिताचा वाली आणि वंचितांची वाणी बनायचंय अस बाबा नेहमी म्हणायचे. तुम्हाला काही तरी मिळाव, तुमच जीवनमान सुधाराव यासाठी भविष्यात आपण प्रतिष्ठाणच्या माध्यमातून काम करू. आजपासून समाजात आत्मविश्वासाने वावरा, पाठीराख्या सारखे उभे राहा. तुम्हाला चांगल्या पदावर बसवता येईल यासाठी तुमचे आशिर्वाद हवे आहेत. तुमचा विश्वास हेच माझ्या पदारात बांबनी टाकलेले सर्वात मोठे दान असल्याचेही पंकजा म्हणाल्या.  

अमित शहा माझे नेते..

परळीतील विजयाची जेवढी चर्चा झाली नाही, त्याहून कितीतरी अधिक माझ्या पराभवाची झाली. मी मात्र दुसऱ्या दिवशी पराभवातून बाहेर पडले, तुम्ही यातून बाहेर पडणार आहात की नाही? हा खरा प्रश्न आहे. माझ्या बाबतीत अनेक बातम्या पसरवल्या जातात. पंकजा मुंडे पक्ष सोडणार, या पक्षात प्रवेश करणार, तुम्ही कोण माझ भविष्य आणि पक्ष प्रवेशाचे मुहूर्त ठरवणारे असा सवालही पंकजा यांनी केला. भारतीय जनता पक्ष हा मुंडे साहेब, प्रमोद महाजन साहेबांनी मोठा केला आहे. गोपीनाथ गडावरील साहेबांचे स्मारक देखील याच भाजप पक्षाच्या कमळात साकारण्यात आले आहे. त्यामुळे मी पक्ष सोडून जाव यासाठीच अशा बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप देखील पंकजा मुंडे यांनी केला.

विधान परिषद निवडणुकीत माझी लायकी असतांना मला डावलंल गेल. माझी दिल्ल्लीत नेत्यांशी चर्चा होत असते, अमित शहा माझे नेते आहेत, मी लवकरच त्यांना भेटून बोलणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आणि माझे ऋणानूबंध देखील चांगले आहेत. शरद पवार हे गोपीनाथ मुंडे साहेबांचे राजकीय विरोधक असले तरी, त्यांच्याशी देखील माझा संवाद आहे. शेतीच्या प्रश्नावर अनेकदा मी त्यांच्याशी बोलत असते. कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांशी माझे जिव्हाळ्याचे आणि राजकारणा पलीकडचे संबंध आहेत. त्यामुळे या अशा चर्चांना काही अर्थ नाही, पंकजा मुंडे कधी दगाबाज असूच शकत नाही. कुणाच्या दारात जाणार नाही आणि तुम्हालाही जाऊ देणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी आपण कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com