पंकजा मुंडेंच्या मनात चाललंय तरी काय?

डॉ. भागवत कराड आणि रमेश कराड यांना संधी देत मुंडे समर्थक आणि वंजारी समाजाच्या नाराजीची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला. पण कितीही कराडांना पुढे आणले तरी ते पकंजा मुंडेची बरोबरी करू शकणार नाही, असा सूर वंजारी समाज आणि पंकजा समर्थकांमधून निघाला. त्यामळे दिल्लीच्या नेत्यांनी देखील पंकजा यांच्या बाबतीत कुठलाही निर्णय घाईने घ्यायचा नाही अशी भूमिका स्वीकारलेली दिसते.
whats going on pankaja mundes mind news
whats going on pankaja mundes mind news

औरंगाबादः विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर  पकंजा मुंडे पुन्हा आक्रमक झाल्या. ही आक्रमकता त्यांनी कृतीतून दाखवली नाही, पण शांत राहून त्या काही तरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे चित्र निर्माण केले गेले. ३ जून गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी हाच तो मुहूर्त असे अंदाज बांधले जात होते. पण कोरोनाच्या संकटामुळे गोपीनाथ गडावर येण्याची पुन्हा एकदा समर्थकांना साद घालून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देण्याची पंकजा यांची संधी हुकली, आणि त्यांनी सोशल मिडियाचा आधार घेत संवाद साधला. विधानसभेतील पराभव, त्यानंतर विधान परिषदेत संधी नाकारल्या नंतरही पंकजा यांनी अमित शहा माझे नेते आहेत असे सांगत सगळ्यांना कोड्यात टाकले आहे. पंकजा यांच्या मनात नेमक चाललंय काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

या पुर्वी परळी विधानसभा निवडणुकीतील प्रचारानंतर काही महिने शांत राहिलेल्या पंकजा यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत गोपीनाथ गडावरून पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर तोफ डागली होती. त्यावेळी व्यासपीठावर एकनाथ खडसे यांच्यासह समस्त ओबीसी समाजातील नाराज नेते एकत्रित आले होते. पंकजा मुंडे भाजप सोडून राज्यात मोठा भूकंप घडवणार असे वाटत असतांनाच त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली म्हणा, की भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांना काही आश्वासन दिले म्हणा, पंकजा यांचे बंड तेव्हा थंड झाले होते. 

त्पानंतर दुसऱ्यांना पंकजा यांनी तुर्तास आपण कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट करत अमित शहा हेच आपले नेते असल्याचे सांगितले आहे. दिल्लीतील नेत्यांशी आपला संवाद होत असतो, मी अमित शहा यांना भेटणार, बोलणार असल्याचे सांगत त्यांनी आपल्या समर्थकांना एकप्रकारे सबुरीचा सल्ला दिल्याचे दिसते. विधान परिषद निवडणुकीत डावलल्यानंतर महाष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे चित्र होते.

दिल्लीतील वरिष्ठ नेते देखील यावर लक्ष ठेवून होते. पंकजा यांना तर धडा शिकवायचा, पण वंजारी समाजाची वोट बॅंक देखील कायम राहिली पाहिजे अशी दुहेरी तारेवरची कसरत भाजपच्या चाणाक्याने केली. गोपीनाथ मुंडे यांच्याच तालमीत तयार झालेले आणि त्यांच्यानंतर पंकजा यांच्या सोबत काम करणारे लातूरचे रमेश कराड यांना पुढे करत भाजपने एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले गेले.

महाराष्ट्रातून राज्यसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही जागांवर भाजपने मुंडे समर्थक आणि वंजारी असलेल्या अनुक्रमे डॉ. भागवत कराड आणि रमेश कराड यांना संधी देत मुंडे समर्थक आणि वंजारी समाजाच्या नाराजीची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला. पण कितीही कराडांना पुढे आणले तरी ते पकंजा मुंडेची बरोबरी करू शकणार नाही, असा सूर वंजारी समाज आणि पंकजा समर्थकांमधून निघाला. त्यामळे दिल्लीच्या नेत्यांनी देखील पंकजा यांच्या बाबतीत कुठलाही निर्णय घाईने घ्यायचा नाही अशी भूमिका स्वीकारलेली दिसते.

तिकडे पंकजा यांनी देखील भाजपमध्ये राहूनच आपले पुर्वीचे वजन निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. परळीतील पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मोठे नेते आणि स्वपक्षावर केलेली टिका पंकजा यांना चांगलीच महागात पडली होती. तेव्हाही त्यांनी थेट पक्ष न सोडता गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणच्या माध्यामातून स्वतंत्र चूल मांडण्याचा प्रयत्न केला होता. औरंगाबादेतील मराठवाड्याच्या पाण्यासाठीच्या आंदोलनातून पंकजा यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. त्यानंतर प्रतिष्ठाणचे काम पुन्हा मंदावले होते, त कोरोनाच्या संकटात पुन्हा दिसून आले.

वंजारी समाज, ऊसतोड कामगार पाठीशी राहावा म्हणून..

बीड जिल्ह्यातील राजकारण हे नेहमीड ऊसतोड कामगार आणि बहुसंख्य वंजारी समाजाच्या भोवती फिरत राहिले आहे. मुंडे यांच्या यशस्ववी राजकारणाचा तो पायच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या वर्गानेच दिवंगत गोपीनाथ मुंडे, पंडीत अण्णा मुंडे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि प्रितम मुंडे यांना राजकारणात विविध पदावर पोहचवले. वंजारी समाजाची ताकद ही कायम मुंडे घराण्या सोबतच रहावी यासाठीच गोपीनाथ मुंडे आणि आता पंकजा मुंडे या देखील पक्ष सोडण्यास धजावत नाहीयेत. त्यामुळेच आपली बार्गीनिंग पावर वाढवण्यासाठी पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणाच ढाली सारखा वापर करतांना दिसत आहे. भाजपला सोडचिठ्ठी ने देता प्रतिष्ठाणच्या माध्‍यमातून समाजकारणाच्या नावाखाली राजकारण करण्याचाच पंकजा यांचा प्रयत्न दिसतो.

समर्थकांना उद्देशून केलेल्या भाषणात पंकजा यांनी काही सूचक इशारे दिले आहेत. मी कुणाच्या दारात जाणार नाही, तुम्हाला जाऊ देणार नाही, रुकणार नाही, थकणार नाही, कुणासमोर झुकणार नाही या त्यांच्या विधानातून त्यांनी भाजपला पुन्हा एकदा अल्टीमेटम दिला असेच म्हणावे लागेल. दुसरीकडे भाजपच्या नेत्यांचा थेट रोष टाळण्यासाठी पंकजा यांनी यापुढे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणच्या माध्यमातून सेवेचा यज्ञ सुरू करण्याची घोषणा केली आहे. तुम्ही मला साथ द्या, माझ्या पाठीशी खंबीरपपणे उभे राहा हे पंकजा यांनी केलेले आवाहन देखील तितकेच महत्वाचे आहे. हे आवाहन करत असतांना त्यांनी आणखी एक महत्वाचे सूचक विधान केले, ते म्हणजे आपल्या पुढील पाच वर्ष, दोन वर्ष, दोन महिने की दोन आठवडे काम करावे लागेल हे सांगता येत नाही.

याचाच दुसरा अर्थ असा लावला जात आहे, की एकीकडे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यामातून दबावाचे राजकारण करत भाजप नेतृत्वाला आपल्या पुनर्वसनासाठी भाग पाडायचे, आणि दुसरीकडे तसे केले नाही तर मी स्वतंत्रपणे राजकारण करायला तयार आहे हे दर्शवायचे. मग यासाठी किती काळ लागेल हे सांगण्यासाठीच पंकजा यांनी वरील उल्लेख केल्याचे बोलले जाते. पंकजा यांच्या दबावाच्या राजकारणाला पक्षाने आतापर्यंत फारशी किंमत दिली नाही. अति स्वाभीमानामुळे माझे नुकसान झाले, मी लोकांना भेटत नाही, वेळ देत नाही, त्यांचे फोन घेत नाही, ही पंकजा यांनी दिलेली कबुली देखील तितकीच महत्वाची मानली जाते. 

अमित शहा माझे नेते आहेत, त्यांना मी दिल्लीत भेटणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे, याचाच अर्थ पकंजा मुंडे अजूनही वेट ॲन्ड वॉचच्या भूमिकेत आहे. केद्रांत भाजपची बुहमताची सत्ता, बहीण खासदार असल्यामुळे भाजपच्या नेत्यांशी जुळवून घेत पंकजा दुसऱ्या इंनिंगच्या तयारीत असल्याचेच यावरून सिध्द होते. आता पक्ष पंकजा यांच्या  पुनर्वसनाला पाच वर्ष, दोन वर्ष, दोन महिने, की दोना आठवडे लावणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com