महाराष्ट्राच्या कल्याणासाठी सैदव कार्यरत रहावे, भाजपच्या शिवसेनेला शुभेच्छा..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या शिवसेनेवर संधी मिळेल तेव्हा टिका करायची, त्यांना अडचणीत आणायचे हे धोरण असतांना आज ५४ व्या वर्धापनदिनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा देत शिवसेनेला सुखद धक्का दिला असेच म्हणावे लागेल.
bjp president chandrakant patil best whishesh for shivsena news
bjp president chandrakant patil best whishesh for shivsena news

औरंगाबादः महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास ज्या शिवसेनेशिवाय पुर्ण होत नाही अशा या पक्षाचा आज ५४ वा वर्धापनदिन. पण कोरोनाच्या संकटामुळे शिवसेनेला हा वर्धापनदिन धुमधडाक्यात साजरा करता येणार नाहीये. राज्यात सत्ता आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री हे स्वप्न साकार झाल्यानंतरचा वर्धापनदिन विशेष असाच आहे. ज्या भाजपसोबत एकत्रित निवडणूका लढवल्या आणि निकालानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी-कॉंग्रेस सोबत जाऊन मुख्यमंत्रीपद आणि सत्ता मिळवली, त्याच भाजपने वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेला शुभेच्छा मात्र दिल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातून शिवसेनेला शुभेच्छा देतांना ‘ महाराष्ट्राच्या कल्याणासाठी शिवसैनिक नेहमीच कार्यरत रहावेत ही सदिच्छा‘,असे म्हटले आहे.

पाच वर्ष कुरबुरी करत का होईना शिवसेना-भाजप युतीचे सरकार राज्यात सत्तेत होते. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि सत्तेत असूनही विरोधकांच्या भूमिकेत वावरत सतत भाजपची कोंडी करणाऱ्या शिवसेनेने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी मात्र भाजपला नमते घ्यायला लावले होते. मातोश्रीवर जाणार नाही असे म्हणणाऱ्या भाजपच्या अमित शहा यांना देखील युतीची बोलणी करायला तिथे जावेच लागले होते. विशेष म्हणजे भाजपवर अविश्वास दाखवत तेव्हा शिवसेनेने लोकसभा आणि त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची बोलणी देखील केली होती. त्यानूसार दोन्ही निवडणुका सेना-भाजप युतीत लढले. लोकसभेत पुन्हा मोदी सरकार आणि राज्यात युतीला कौल मिळाला.

पण बंददाराआड झालेल्या चर्चेत जे ठरले ते भाजप आता नाकारत आहे, असे म्हणत शिवसेनेने पुन्हा आपला पंजा उगारला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली. १०५ आमदार असणाऱ्या भाजपचे राष्ट्रवादीच्या अजित पवारांना सोबत घेऊन शिवसेना आणि राष्ट्रवादीसह कॉंग्रेसला धोबीपछाड देण्याचा प्रयत्न क्षणिक ठरला. पहाटे घेतलेलेली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही औटघटकेची ठरली आणि भाजप- सेने मधील बिघडलेले संबंध अधिकच ताणले गेले. अजित पवारांना आपल्या बाजूने घेऊन फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा, शिवसेनेवर सडकून टिका करण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच आघाडीवर होते.

अगदी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या दररोजच्या पत्रकार परिषदा आणि वेगवेगळ्या दाव्यांवरून ‘ उद्धव साहेब, संजय राऊत यांना आवरा, ते शिवसेनेची वाट लावतायेत' असा सल्ला देखील चंद्रकातं पाटील यांनी दिला होता. पण शरद पवारांनी भाजपचा डाव उलटवून लावला आणि राज्यात महाविकास आघाडी स्थापन करत भाजपला चारीमुंड्या चीत केले. सत्ता स्थापनेनंतरही भाजपकडून सातत्याने हे तीन पायांचे सरकार आहे, किती दिवस टिकणार, एकमेकांच्या कर्मानेच हे सरकार पडले अशी टिका केली गेली. विधानसभेच्या नागपूर आणि मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेकदा टिका केली. महाविकास आघाडीचे सरकार असले तरी भाजपचे टार्गेट सभागृहात आणि बाहेर देखील शिवसेनाच राहिली.


कोरोनाच्या संकटातही राजकारण..

देशावर विशेषतः महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट ओढावले, त्याच्या प्रादुर्भाव अजूनही वाढलेला असतांना देखील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले असा ठपका ठेवत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपने नारायण राणे यांच्या माध्यमातून राज्यपालांकडे केली. या शिवाय भाजप सेनेत दुसरा एक वाद रंगला तो म्हणजे पीएम केअर्स फंड आणि मुख्यमंत्री सहायती निधीचा. यातही भाजपने राजकारण करत राज्यला मदत करण्यापेक्षा केंद्राच्या पंतप्रधान फंडात मदत देत उद्धव ठाकरेंची कोडी करण्याचा प्रयत्न केला.

उद्धव ठाकरे यांना सहा महिन्यात आमदार म्हणून शपथ घेणे आवश्यक असतांना त्यांच्या राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यपदाच्या निवडीला देखील भाजपने विरोधे केला. शेवटी पंतप्रधान मोदींना फोन केल्यानंतर विधान परिषदेच्या रिक्त जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आणि उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद साबूत राहिले. त्या दरम्यानही चंद्रकांत पाटील यांनी ‘महाविकास आघाडीतील काही नेत्यांनाच उद्धव ठाकरे आमदार होऊ नये असे वाटते‘ असा आरोप केला होता.

एकंदरित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या शिवसेनेवर संधी मिळेल तेव्हा टिका करायची, त्यांना अडचणीत आणायचे हे धोरण असतांना आज ५४ व्या वर्धापनदिनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा देत शिवसेनेला सुखद धक्का दिला असेच म्हणावे लागेल. अर्थात या शुभेच्छामध्ये देखील ‘महाराष्ट्राच्या कल्याणासाठी शिवसैनिक नेहमीच कार्यरत रहावेत ही सदिच्छा‘, चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला चिमटा काढल्याचे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com