एमआयएमचा पतंग आता ग्रामपंचायतींमध्येही उडणार - MIM's kite will now fly in Gram Panchayats | Politics Marathi News - Sarkarnama

एमआयएमचा पतंग आता ग्रामपंचायतींमध्येही उडणार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

आम्हाला याची बी टीम, त्याची सी टीम म्हणून हिणवले गेले, पण त्याकडे लक्ष न देता आम्ही काम करत गेलो. त्याचाच हा परिणाम आहे की ग्रामीण भागात देखील लोकांचा विश्वास एमआयएमवर व्यक्त होत आहे. जातीयवादी पक्ष म्हणून आम्हाला बदनाम केले गेले, पण जात-धर्म या पलीकडे जाऊन आम्ही गोर-गरीबांसाठी काम करत आहोत आणि भविष्यातही करत राहू, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे.

औरंगाबाद ः नांदेड मार्गे महाराष्ट्रात दाखल झालेल्या एमआयएमने गेल्या पाच-सात वर्षात शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात देखील जम बसवायला सुरुवात केली आहे.

नांदेड महापालिका, बीड नगरपालिका, औरंगाबाद, पुणे अशा शहरांमध्ये कुठे विरोधी पक्षाच्या भुमिकेत तर कुठे किंगमेकर ठरलेल्या एमआयएमने गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगलाच जोर मारला होता. महाराष्ट्रातून एकमेव खासदार औंरगाबादमधून निवडून गेल्यानंतर एमआयएमने ग्रामीण भागात देखील हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एमआयएमचे बरेच सदस्य निवडून आले. आता जिल्ह्यातील चार ग्रामपंचायातींमध्ये एमआयएमचे सरपंच देखील झाले आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीत पाच आमदार निवडून आल्यानंतर एमआयएमने आता आपले लक्ष गुजरात महापालिका व आगामी पश्चिम बंगाल विधानसभेवर केंद्रीत केले आहे. राज्य व राष्ट्रीय पातळीवर सत्ताधारी पक्षांच्या नाकीनऊ आणणारी एमआयएम खेड्यापाड्यात देखील पोहचत असल्याचे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक व सरपंच पदाच्या निवडीवरून दिसून आले आहे. प्रस्थापित पक्षांच्या तुलनेत हे यश कमी असले तरी एमआयएमचा या निमित्ताने ग्रामपंचायतींमध्ये चंचू प्रवेश झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील अब्दीमंडी, रौरसपुरा, नायगांव आणि भालगांव ग्रामपंचयातीमध्ये एमआयएमचे सरपंच निवडून आले आहेत. एमआयएमचे खासदार तथा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी या यशाबद्दल सरपंच व सदस्यांचे अभिनंदन केले आहे. नवनिर्वाचित सरपंचांना शुभेच्छा देतांनाच ग्रामीण भागाच्या विकासात चांगले योगदान देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा, असेही त्यांनी सुचवले आहे. एमआयएमच्या या यशाबद्दल ट्विट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आम्हाला याची बी टीम, त्याची सी टीम म्हणून हिणवले गेले, पण त्याकडे लक्ष न देता आम्ही काम करत गेलो. त्याचाच हा परिणाम आहे की ग्रामीण भागात देखील लोकांचा विश्वास एमआयएमवर व्यक्त होत आहे. जातीयवादी पक्ष म्हणून आम्हाला बदनाम केले गेले, पण जात-धर्म या पलीकडे जाऊन आम्ही गोर-गरीबांसाठी काम करत आहोत आणि भविष्यातही करत राहू, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख