get together between Nilangekar and Abhimanyu Pawar .. but | Sarkarnama

निलंगेकर, अभिमन्यू पवार यांच्यात दिलजमाई.. पण

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 जून 2020

या दोन नेत्यामध्ये संवादच नसल्याने काही तरी बिघडलंय हे स्‍पष्ट दिसत होते. निलंगेकरांनी पुढाकार घेत या सगळ्या उलटसुलट चर्चांना आपल्या कृतीतून उत्तर दिले असे वाटत असतांनाच अभिमन्यू पवार यांनी मात्र आमदार रमेश कराड यांना मंत्रीपदासाठी शुभेच्छा देत निलंगेकरांना पुन्हा एकदा डिवचल्याचे दिसून आले.

औसा : भाजपचे आमदार अभिमन्यू पवार आणि माज मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात दिलजमाई झाल्याचे चित्र लातूरकरांना पहायला मिळाले होते. औसा मतदारसंघातून पवार यांच्या उमेदवारीला निलंगेकराचा विरोध होता. या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्ह्यातील हे दोन्ही नेते एकत्र आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पंरतु लातूरच्या संपर्क कार्यालयाला भेट देऊन निलंगेकरांची पाठ वळत नाही तोच अभिमन्यू पवार यांनी नुकतेच विधान परिषदेवर बिनविरोध निवड झालेले आमदार रमेश कराड यांना भविष्यात मंत्रीपदासाठी शुभेच्छा देत आपला निंलगेकरांना विरोधच असल्याचे दाखवून दिले. 

अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीला संभाजी पाटील निलंगेकरांचा विरोध होता. पवार सोडून स्थानिकच्या कुणालाही उमेदवारी द्या, अशी भूमिका निलंगेकरांनी घेतली होती. पंरतु तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले वजर पवारांच्या पारड्यात टाकले.  कॉंग्रेचे दिग्‍गज उमेदवार बसवराज पाटील यांचा पराभव करत अभिमन्यु पवार यांनी देखील आपली निवड सार्थ ठरवली होती.

संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यात झिरो असलेली भाजप महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने हिरो ठरली होती. पण औसा विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी निंलगेकरांचा विरोध डावलून पवारांना उमेदवारी दिली. तेव्हापासून या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. पवारांच्या लातूर येथील संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट देत निलंगेकर यांनी ‘हम साथ साथ है‘ चे संकेत दिले, पण हे वरवरचे चित्र होते हे पवारांच्या विधानानंतर स्पष्ट झाले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर औसा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे अभिमन्यू पवार आणि तत्कालीन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात अनेकदा जाहीरपणे खटके उडाले. औसा मतदारसंघात अभिमन्यु पवारांना तिकीट मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. एकीकडे तगडा आणि सतत दोनवेळा निवडून आलेला बसवराज पाटलांसारखा कॉंग्रेसचा उमेदवार आणि दुसरीकडे प्रचंड पक्षांतर्गत विरोध असलेला, कुठलाही राजकीय अनुभव नसलेला अभिमन्यू पवार यांच्या सारखा नवखा उमेदवार. 

त्यामुळे औसा मतदारसंघातील लढत त्यावेळी राज्यातील चर्चेचा विषय ठरली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक एवढीच काय ती पवार यांची ओळख. त्यामुळे विधानभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान, विकास निधी, साखर कारखान्याच्या मुद्यावरून एकाच व्यासपीठावर आलेल्या संभाजी पाटील आणि अभिमन्यु पवार यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले होते. निलंगेकर मनाने पवारांच्या सोबत कधीच नव्हते असा आरोप देखील केला गेला.

पण फडणवीस यांची निवड योग्य होती हे अभिमन्यु पवार यांनी बसवराज पाटील यांच्यावर प्रचंड मतांनी विजय मिळवत दाखवून दिले होते. मात्र विजयानंतरही निलंगेकर आणि पवार फारसे एकत्र आले नाही. या दोघांमधील वाद आणि कटुतेची चर्चा भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह विरोधकांसाठी देखील नेहमीच उत्सूकतेचा विषय राहिली.  या सगळ्या चर्चेला संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या बाजूने पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात होते. 

अभिमन्यू पवारांनी लातूरमध्ये आपले संपर्क कार्यालय सुरू केले. नुकतीच निलंगेकरांनी या कार्यालयाला भेट देत त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चाही केली. दोघांच्याही समर्थकांना सुखावणारे असे हे चित्र होते. लातूरकरांसाठी देखील हा आश्चर्याचा धक्का होता. विधानसभा निवडणुकीपासून या दोघांमध्ये निर्माण झालेला हा दुरावा या निमित्ताने मिटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

अभिमन्यू पवारांनी वारंवार संभाजी पाटील माझे नेते असल्याचे सांगत आमच्यात कुठलाही वाद नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण या दोन नेत्यामध्ये संवादच नसल्याने काही तरी बिघडलंय हे स्‍पष्ट दिसत होते. निलंगेकरांनी पुढाकार घेत या सगळ्या उलटसुलट चर्चांना आपल्या कृतीतून उत्तर दिले असे वाटत असतांनाच अभिमन्यू पवार यांनी मात्र आमदार रमेश कराड यांना मंत्रीपदासाठी शुभेच्छा देत निलंगेकरांना पुन्हा एकदा डिवचल्याचे दिसून आले.

कराड मंत्री झाले तर मला आनंदच..

येत्या सहा महिन्यात राज्यात भाजपचे सरकार येणार आहे. त्या सरकारमध्ये लातूर जिल्ह्यातून नूतन आमदार रमेश कराड यांच्या समावेशाला माझा हिरवा कंदील असेल. कराड हे मंत्री झाले तर आपल्याला आनंदच होईल, अशी भूमिका अभिमन्यू पवार यांनी घेतली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील गाव भागातील रामलिंगेश्वर मंदिराच्या विकासासाठी दोन कोटीचा निधी मंजूर केला होता. या मंदिराच्या छती भरणाचा कार्यक्रम सोमवारी झाला.

यावेळी आमदार रमेश कराड, माजी आमदार पाशआ पटेल, गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थित पवारांनी केलेल्या या विधानमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.  येणाऱ्या सहा महिन्यात राज्यात भाजपचे सरकार येणार आहे. त्यात कराड मंत्री झाले तर मला आनंदच आहे. त्यांच्या मंत्रीपदाला माझा हिरवा कंदील असून कराड यांना मंत्री करण्यासाठी मी सर्वात पुढे असेन अशी भूमिका पवार यांनी घेतली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख