एअरोनॉटिकल इंजिनिअर असलेले पृथ्वीराज चव्हाण राजीव गांधीच्या आग्रहाखातर राजकारणात आले.... - Prithviraj Chavan, an aeronautical engineer, entered politics at the behest of Rajiv Gandhi .... | Politics Marathi News - Sarkarnama

एअरोनॉटिकल इंजिनिअर असलेले पृथ्वीराज चव्हाण राजीव गांधीच्या आग्रहाखातर राजकारणात आले....

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 17 मार्च 2021

केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक पदांचा कार्यभार पाहिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, संसदीय व्यवहार आणि पंतप्रधान कार्यालय ही त्यापैकी प्रमुख खाती त्यांच्याकडे होती. काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय करारांमध्ये त्यांनी याकाळात महत्त्वाची भूमिका बजावली.

सातारा : एअरोनॉटिकल इंजिनिअर असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी काही काळ या क्षेत्रात नोकरी केली. पण माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधीच्या आग्रहाखातर पृथ्वीराज चव्हाण यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचा कारभार संभाळला. तसेच महाराष्ट्राचे २२ वे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. गांधी घराण्याशी
असलेले जवळचे संबंध व निष्ठेमुळे त्यांच्यावर आता आसामच्या निवडणूकीची जबाबदारी काँग्रेसच्या सर्वेसर्वा श्रीमती सोनिया गांधी यांनी सोपवली आहे. 

पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म इंदूरमध्ये मराठी कुटुंबात झाला. त्यांचे आईवडीलही राजकारणात होते. त्यांचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाताई चव्हाण हे दोघेही काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते होते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू पृथ्वीराज यांना लहानपणापासूनच मिळालेले. त्यांचे सातवीपर्यंतचं शिक्षण क-हाडच्या नगरपालिका शाळेत तर त्यापुढील शिक्षण
दिल्लीत झालं. चव्हाणांनी बिट्स पिलानी येथून त्यांनी बी.ई. (ऑनर्स) ही पदवी मिळवली.

त्यानंतर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून एम.एस. ही पदवी मिळवली. अमेरिकेत काही काळ काम केल्यानंतर ते भारतात परतले. त्यानंतर एअरोनॉटिकल क्षेत्रात त्यांनी काही काळ नोकरी केली. गांधी घरण्याशी श्री. चव्हाण कुटुंबियांचे असलेले जवळच्या संबंधामुळे राजीव गांधींच्या आग्रहाखातर पृथ्वीराज यांनी सक्रिय़ राजकारणात प्रवेश केला. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार समर्थपणे सांभाळला. 

केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक पदांचा कार्यभार पाहिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, संसदीय व्यवहार आणि पंतप्रधान कार्यालय ही त्यापैकी प्रमुख खाती त्यांच्याकडे होती. काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय करारांमध्ये त्यांनी याकाळात महत्त्वाची भूमिका बजावली. विविध कार्यक्रम तसंच शिष्टमंडळाचे सदस्य असलेल्या चव्हाण यांनी अमेरिका , फ्रान्स , जपान , जर्मनी , चीन , इटली , नेदरलॅंण्ड , पोर्तुगाल , स्वित्झर्लंड यासह अनेक देशांचे सरकारी खर्चाने दौरे केले.

सध्या त्यांच्याकडे आसामच्या निवडणूकीची जबाबदारी काँग्रेसच्या सर्वेसर्वा श्रीमती सोनिया गांधी यांनी सोपवली आहे. १० नोव्हेंबर २०१० मध्ये काँग्रेस पक्षाने त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली. महाराष्ट्राचे २२ वे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठिशी मोठा राजकीय वारसा आहे. त्यांनी ११ नोव्हेंबर २०१० ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर कऱ्हाडला तब्बल ५० वर्षानंतर मुख्यमंत्रीपद मिळाले. त्या संधीचे सोने करून त्यांनी समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.  २०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीपूर्वी श्री. चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आज ते ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख