Rajya Sabha candidate gets Munde supporter in place of a retired Munde supporter ... | Sarkarnama

एका निवृत्त मुंडे समर्थकाच्या जागी मुंडे समर्थक नेत्यालाच मिळाली राज्यसभेची उमेदवारी...

मंगेश वैशंपायन
गुरुवार, 12 मार्च 2020

नवी दिल्ली : राज्यसभेवर भाजपकडून महाराष्ट्रातून निवडून येणाऱ्या तिसऱ्या जागेवर औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी आज जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपमध्ये आलेल्या शिरपूरचे अमरीश पटेल यांना उमेदवारीची घोषणा दिल्लीतून आज करण्यात आली. भाजपने आज दुसऱ्या टप्प्यात हरियाणा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश व महाराष्ट्रातील 5 उमेदवार जाहीर केले. 

नवी दिल्ली : राज्यसभेवर भाजपकडून महाराष्ट्रातून निवडून येणाऱ्या तिसऱ्या जागेवर औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी आज जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपमध्ये आलेल्या शिरपूरचे अमरीश पटेल यांना उमेदवारीची घोषणा दिल्लीतून आज करण्यात आली. भाजपने आज दुसऱ्या टप्प्यात हरियाणा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश व महाराष्ट्रातील 5 उमेदवार जाहीर केले. 

 

 

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीतर्फे 26 मार्चला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठीची यादी जाहीर केली. महाराष्ट्रातून तिसऱ्या जागेसाठी डॉ. कराड यांची उमेदवारी सत्तारूढ पक्षाने जाहीर केली आहे. या जागेसाठी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्या विजया रहाटकर, संजय काकडे आदींची नावे चर्चेत होती. मात्र कराड यांना संधी मिळाली. डॉ. कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात. 

योगायोग असा की या टप्प्यात निवृत्त होणारे अमर साबळे हेही मुंडे समर्थकच मानले जातात व त्यांच्या जागी दुसऱ्या मुंडे समर्थक नेत्यालाच संधी देण्याचे भाजप श्रेष्ठींनी ठरविले. भाजपच्या पहिल्या यादीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले व खासदारकीवर पाणी सोडून भाजपमध्ये आलेले उदयनराजे भोसले यांची नावे होती. डॉ. कराड हे रहाटकर यांच्याच गावचे म्हणजे औरंगाबादचे माजी महापौर आहेत. 

सध्या ते मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत. उमेदवारी अनपेक्षित असली तरी राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याने आपले स्वप्न पूर्ण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान भाजपने राज्यसभेवर हरियाणातून संघनेते डॉ. दुष्यंतकुमार गौतम व रामचंद्र झांगडा तसेच मध्य प्रदेशातील दुसऱया जागेसाठी सुमेरसिंह सोळंकी यांना तिकीट दिले आहे. 

भाजपचे राज्यसभा उमेदवार असे - 
महाराष्ट्र- रामदास आठवले, उदयनराजे भोसले व डॉ. भागवत कराड 
हरियाणा - दुष्यंतकुमार गौतम व रामचंद्र झांगडा 
मध्य प्रदेश- ज्योतिरादित्य शिंदे व सुमेरसिंह सोळंकी 
हिमाचल प्रदेश - इंदू गोस्वामी 
आसाम -भुवनेश्वर कलिता व बुस्वजीत डायमरी, 
बिहार- विवेक ठाकूर, 
गुजरात- अभय भारद्वाज व रमीलाबेन बारा, 
झारखंड- दीपक प्रकाश, 
मणीपूर- लिएसेबा महाराजा, 
राजस्थान- राजेंद्र गेहलोत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख