पंढरपूरातील मतदारांनी आपलं काम केले, आता फडणवीस आपले काम करतील.. - Voters in Pandharpur did their job, now Fadnavis will do their job .. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

पंढरपूरातील मतदारांनी आपलं काम केले, आता फडणवीस आपले काम करतील..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 मे 2021

आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक, स्वत: आवताडे व पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळे आवताडे यांना विजयापर्यंत पोचता आले.

पुणे : पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील समाधान आवताडे यांचा विजय हा आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक व पंढरपूर-मंगळवेढ्यातील जनतेचा विजय असल्याची भावना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याप्रती असलेली जनतेची नाराजी या मतदानातून बाहेर पडली आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, या विजयाबद्दल मी समाधान आवताडे तसेच परिचारक बंधू व पंढरपूर-मंगळवेढ्यातील तमाम जनेतेचे अभिनंदन करतो. मतदानाच्या रूपाने या मतदारसंघातील जनतेने भारतीय जनता पार्टीवर मोठा विश्‍वास व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक ते हारले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारच्याविरोधात लोकांच्या मनात असंतोष आहे. ही असंतोषाची भावना मतदानाच्या रूपाने बाहेर पडली आहे.’’

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते व्यवहारात आणतात. त्यामुळे मतदान करून पंढरपूरच्या मतदारांनी आपले काम केले आहे. त्यामुळे फडणवीसदेखील त्यांचे काम पूर्ण करतील, असे पाटील म्हणाले. आवताडे यांना निवडून द्या, या सरकारचा मी करेक्ट कार्यक्रम करतो, असे निवडणूक प्रचारादरम्यान फडणवीस म्हणाले होते. त्याची आठवण करून देताच पाटील यांनी वरील वक्तव्य केले.

आवताडे व भालके यांच्यातील निवडणूक चुरशीची होईल असे वाटत होते. दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे झालेल्या या पोटनिवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर भालके यांचे चिरंजीव भगीरथ निवडून येतील, असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र, तब्बल सात हजारांहून अधिक मतांनी आवताडे निवडून आल्याने सहानुभूतीची कोणतीही लाट चालली नाही. भाजपातील विविध घटकांनी आपले काम चोखपणे बजावल्याने आवताडे यांचा विजय सोपा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक, स्वत: आवताडे व पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळे आवताडे यांना विजयापर्यंत पोचता आले. मतमोजणीच्या पहिल्या एक-दोन फेऱ्या वगळता सुरवातीपासूनच आवताडे यांनी आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीत किमान दोनशे-चारशे मतांची आघाडी आवताडे घेत राहिले. ३८ व्या फेरीपर्यंत ही आघाडी ७ हजार १३० मतांपर्यंत जाऊन पोचली.

२००९ साली मतदारसंघांची पूर्नरचना झाली. तेवहापासून सलग तीनवेळा भालके यांनी या मतदांसंघाचे नेतृत्व केले. भालके यांच्या यशाची मालिका खंडीत करीत यावेळी भाजपाने प्रथमच या मतदारसंघात विजयाची गुढी उभारली आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख