अवताडेंचा विजय खडकवासल्याच्या पोटनिवडणुकीची आठवण करून देणारा - victory of Awtade gives memory of Khadakwasla by election | Politics Marathi News - Sarkarnama

अवताडेंचा विजय खडकवासल्याच्या पोटनिवडणुकीची आठवण करून देणारा

उमेश घोंगडे
रविवार, 2 मे 2021

दिवंगत नेत्याच्या वारसदाराला मतदारांनी नाकारण्याची घटना दुर्मिळच

पुणे : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे यांनी ऐतिहासिक विजय मिळविला आहे. दिवंगत आमदारांच्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सहानुभूतीची लाट प्रत्येकवेळी असतेच असे नाही, हे या निवडणुकीतून अलीकडच्या काळात दुसऱ्यांदा दिसून आले आहे. या निकालाने २०११ साली झालेल्या पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची आठवण ताजी झाली आहे. आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिविडणुकीत वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांचा पराभव भाजपाचे आमदार भीमराव तापकीर यांनी केला होता.

वांजळे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने २००९ च्या निवडणुकीत निवडून आले. मात्र,२०११ च्या जून महिन्यात वांजळे यांचे आकस्मिक निधन झाले. यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने निवडून लढविली. वास्तविक हर्षदा वांजळे या त्यावेळी कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या. मात्र, वांजळे यांच्या निधनानंतर त्यांनी मनसेची उमेदवारी न घेता राष्ट्रवादीत प्रवेश करीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली. या निवडणुकीत भाजपाच्या भीमराव तापकीर यांच्याकडून हर्षदा वांजळे सुमारे साडेतीन हजार मतांच्या फरकारने पराभूत झाल्या होत्या. रमेश वांजळे हे सोनेरी आमदार म्हणून राज्यात प्रसिद्ध होते. त्यामुळे हर्षदा यांचा पराभव तेव्हा धक्कादायक ठरला होता.

दिवंगत लोकप्रतिनिधीच्या वारसाला उमेदवारी देण्याची परंपरा सर्वच पक्षांनी जोपासली आहे. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई या पोटनिवडणुकीत विजय झाल्या.  सहानुभूतीच्या लाटेत बड्या नेत्यांचाही निभाव लागत नाही. भिलवडीमध्ये 1998 मध्ये पतंगराव कदम यांना दिवंगत आमदार संपतराव देशमुख यांचे पुतणे पृथ्वीराज देशमुख यांच्याकडून पोटनिवडणुकीत पराभव झाला होता.  2015-16 मध्ये वांद्रे येथील शिवसेनेचे आमदार शाम सावंत यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली. तेथे त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना पक्षाने उमेदवारी दिली. तेथे काॅंग्रेसकडून नारायण राणे विरोधात उभे ठाकले. पण राणे यांचाही सहानुभूतीच्या लाटेत टिकाव लागू शकला नाही. दिवंगत नेत्याच्या मुलाला किंवा वारसाला उमेदवारी न देण्याची घटना अलीकडच्या काळात डहाणूमध्ये घडली. भाजपचे आमदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर भाजपने त्यांच्या वारसदाराला उमेदवारी नाकारली आणि तेथे राजेंद्र गावित हे खासदार झाले. नंतर चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास हे शिवसेनेत गेले आणि तेथून आमदार झाले. पण या सहानुभूतीच्या लाटेतही पराभव होऊ शकतो हे खडकवासला आणि पंढरपूरने दाखवून दिले. खडकवासल्यात हर्षदा वांजळे यांनी पक्ष बदलला म्हणून त्यांच्याबद्दल नाराजी होती. पंढरपुरात तसे नव्हते. हा मोठा फरक आहे. 

पंढरपूर मतदारसंघातून भारत भालके २००९ साली विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव करून निवडून आल्याने त्याची राज्यभर चर्चा झाली. मोहिते-पाटलांच्या राजकीय जीवनातील हा पहिलाच पराभव होता. भालके यांच्यासारख्या नवख्या कार्यकर्त्यांने त्यांचा पराभव केला होता हे विशेष.त्यानंतर भालके २०१४ व २०१९ असे सलगपणे या मतदारसंघातून निवडून आले. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाल्याने त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीने निवडणुकीच्या रिगंणात उतरले. भारत भालके यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याची चर्चा सुरवातीला होती. मात्र, अंतिमत: त्यांचे चिरंजीव भगीरथ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉग्रेने घेतला.

या संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होती. उमदेवार ठरविण्यापासून प्रचारापर्यंतचे सारे निर्णय अजित पवार यांनीच घेतले.पवार यांच्यावतीने करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी संपूर्ण प्रचारकाळात या मतदारसंघात तळ ठोकला होता. या साऱ्या पाश्‍र्वभूमीवर भालके व आवताडे यांच्या मतांमधील फरक पाहता भालके यांना अजिबातच सहानुभूती मिळाली नसल्याचे स्पष्ट होत आहे. भारतीय जनता पार्टीने निवडणुकीचे केलेले योग्य नियोजन, प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर शहरात प्रामाणिकपणे केलेले काम व मंगळवेढ्यातील मतदारांनी आपल्या तालुक्यातील आमदार होईल म्हणून आवताडे यांना दिलेली साथ याचा परिणाम म्हणून आवताडे मोठ्या फरकारने निवडून आल्याचे दिसत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख