पुणे ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जेजुरी गडावर पुतळा उभारल्याबद्दल मी मल्हारी म्हाळसाकांत ट्रस्टचे अभिनंदन करण्यासाठी आलो आहे. पुतळ्याच्या उद्धटनाच्या कार्यक्रमाचे त्यांनी मला निमंत्रण दिले होते. शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन होत आहे, त्याला विरोध असण्याचे कारण नाही, ते मोठे नेते आहेत, एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपली भूमिका मांडली. गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल मात्र त्यांनी नो काॅमेटस् म्हणत बोलणे टाळले.
अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा जेजुरी गडावर उभारण्यात आला. या पुतळ्याचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्याचे जेजुरी गड संस्थानने निश्चित केले होते. कार्यक्रम ठरला असतांना दोन दिवसांपुर्वीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गडावरील अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले. पडळकरांनी आपल्या समर्थकासंह गडावर जाऊन फीत कापत उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.
यावरून चांगलाच वाद पेटला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली, तर अजित पवार यांनी ज्यांचे डिपाॅझीट गेले त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याची तिखट प्रतिक्रिया दिली होती. या पार्श्वभूमीवर आज रासपचे महादेव जानकर दुपारी जेजुरी गडावर आले होते. त्यांचे हलगी वाजवून जोरदार स्वागत करण्यात आले. शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला संस्थानच्या निमंत्रणावरून आपण आलो असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलतांना सांगितले.
गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्याला विरोध दर्शवत दोन दिवसांपुर्वीच पुतळ्याचे उद्घाटन केले होते. या संदर्भात विचारले असता जानकर म्हणाले, मुळात हा काही राजकीय कार्यक्रम नाही, त्यामुळे त्यावरून वाद निर्माण करणे चुकीचे आहे. रासपने जेजुरी गडावर अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभारण्याची मागणी केली होती.
संस्थानने ती पुर्ण केली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मी इथे आलो आहे. शरद पवार यांच्या नावाला तुमचा विरोध आहे का? या प्रश्नावर देखील ते मोठे नेते आहेत, एक पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांना विरोध करण्याचे कारणच नाही, याचा पुनरुच्चार देखील जानकर यांनी केला. हा सर्वपक्षीयांचा कार्यक्रम आहे, याला राजकीय वळण देण्याची गरज नाही. गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेबद्दल तुमचे मत काय? या प्रश्नावर नो काॅमेटस् त्यावर न बोललेलंच बरं असे म्हणत यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
Edited By : Jagdish Pansare

