पुणे ःमाजी आमदार अशोक टेकवडे यांना ग्रामपंचायत निवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे. त्यांचे चिरंजीव अजिंक्य टेकवडे हे सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले असून ग्रामपंचायतीत अनपेक्षितपणे शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. येथे सोमनाथ दत्तात्रय कणसे सरपंचपदी निवडून आले तर उपसरपंचपदी प्रतिभा निलेश राणे या निवडून आल्या.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जवळार्जुन गावात २ जागा बिनविरोध झाल्या होत्या. ७ जागांसाठी निवडणूक झाली होती. एकूण ९ पैकी सेनेला २ जागा तर राष्ट्रवादीला ७ जागा मिळाल्या होत्या. माजी आमदार अशोक टेकवडे आणि सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक सुधाकर टेकवडे यांनी एकत्र येत बहुतांश सदस्य स्वतःच्या विचाराचे निवडले होते.
आज सरपंच पदाच्या निवडीच्या दिवशी मात्र सगळे फासे उलटे पडल्याचे दिसून आले. निर्धारित वेळेत सरपंच पदासाठी अजिंक्य अशोक टेकवडे तर उपसरपंच पदासाठी संगीता राणे यांचे अर्ज आले होते. शिवसेनेकडून अनुक्रमे सोमनाथ कणसे आणि प्रतिभा राणे यांनी अर्ज दाखल केले.
दुपारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर राष्ट्रवादीला डोळे पांढरे करणारा निकाल आला. काँग्रेसच्या छुप्या सहकार्याने शिवसेनेने अजिंक्य टेकवडे आणि संगीता राणे यांना ५ विरुद्ध ४ मतांनी पराभूत करीत अनपेक्षित विजय संपादन केला. यामुळे निकालामुळे राष्ट्रवादीच्या तंबूत शांतता पसरली होती.
Edited By : Jagdish Pansare

