`फडणवीस, दरेकर यांच्यावर खुशाल गुन्हा दाखल करा; आम्ही घाबरत नाही` - If you have courage file FIT against Fadnavis and Darekar challenges Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

`फडणवीस, दरेकर यांच्यावर खुशाल गुन्हा दाखल करा; आम्ही घाबरत नाही`

राजेंद्रकृष्ण कापसे
रविवार, 18 एप्रिल 2021

महाविकास आघाडी सरकार लोकांना वेडे बनवत आहे....

पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीत राज्य सरकार फक्त केंद्रावर खोटे आरोप करत आहे. मात्र, ही वेळ काही राजकारण करण्याची नाही. असे असेल तर, आम्हीही राजकारणात माहीर आहोत, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिला. केवळ भाजपला श्रेय मिळू नये, म्हणून ६० हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनची सोय होत असताना संबंधित पुरवठादारालाच ताब्यात घेतले. यात देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांवर  गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. याबाबत सरकारने खुशाल गुन्हा दाखल करावा. आम्ही घाबरत नाही, असा इशारा त्यांनी दिला.

 
केंद्राकडून सर्वाधिक लशी मिळूनही लसींचा तुटवडा असल्याचे आरोप राज्याच्या मंत्र्यांनी केले. गुजरातच्या अन्न व औषध प्रशासनाने रेमडेसिव्हिर बाबत जे आदेश दिले तेच आदेश महाराष्ट्रानेही दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर बोलणे होऊनही ते उपलब्ध होत नसल्याची खोटी माहिती दिली, असा आरोप चंद्रकांतदादा यांनी केला.

वापीतून साठ हजार रेमडेसिव्हिर आणण्यासाठी प्रवीण दरेकर यांनी एक पुरवठादार शोधला. मात्र कंपनीने अॅडव्हान्स देण्याची मागणी केली. दरेकर यांनी राजेंद्र शिंगणे यांना अॅडव्हान्स देण्याविषयी सांगितले. मात्र, राज्य सरकार अॅडव्हान्स देत नसल्याचे शिंगणे यांनी सांगितले. तेव्हा तुम्ही अॅडव्हान्स देणार नसाल, तर आम्ही ही इंजेक्शन खरेदी करतो, असे दरेकरांनी सांगितल्यानंतर तशी परवानगी दिली गेली. मात्र, नंतर या पुरवठादाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. भाजपला श्रेय मिळू नये, यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप पाटील यांनी केला.

खाटा, औषधे, इंजेक्शन साठी सर्वसामान्य नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक लोकप्रतिनिधींना स्वस्थ बसू देणार नाहीत. राज्यातील चार जिल्हाधिकाऱ्यांनीही मला इंजेक्शनाच्या मदतीसाठी विनंती केली. मग मुख्यमंत्री करतात तरी काय, असा सवाल पाटील यांनी केला.
 
राज्यात लशींचा काळाबाजार
लशींच्या बाबतीत राज्यात काळाबाजार झाला आहे, असा आरोप करून चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात ४५ पेक्षा कमी वयाच्या अनेकांना लशी दिल्या गेल्या. २३ लाख लशी शिल्लक असताना लशी नसल्याचा दावा करून लसीकरण केंद्र बंद केली. केंद्राने आकडेवारी दिल्यानंतर महाराष्ट्राला सर्वाधिक लशी मिळाल्याचे स्पष्ट झाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख