विमान प्रवासावर स्पष्टीकरण, तरी टीका; मग आमदारांच्या नियुक्तीवर गप्प का? - Criticism of the explanation on air travel, then why the silence on the appointment of MLAs? | Politics Marathi News - Sarkarnama

विमान प्रवासावर स्पष्टीकरण, तरी टीका; मग आमदारांच्या नियुक्तीवर गप्प का?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरून विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. राज्यपालांच्या विमान प्रवासावर स्पष्टीकरण दिल्यानंतरही टीका केली जातेय, मग विधान परिषदेतील आमदारांच्या वेळेत नियुक्तीच्या मद्यावर ते गप्प का? असा सवाल पवार यांनी केला आहे.

पुणे ः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना उत्तराखंड दौऱ्यासाठी विमान नाकारत त्यांना खाली उतरवून दिल्याचाआरोप भाजपने सरकारवर केला. विरोधी पक्ष नेत्यांसह राज्यातील सर्वच भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री व महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. राज्य सरकारकडून याबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतरही विरोधकांची टीका सुरूच आहे.

यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरून विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. राज्यपालांच्या विमान प्रवासावर स्पष्टीकरण दिल्यानंतरही टीका केली जातेय, मग विधान परिषदेतील आमदारांच्या वेळेत नियुक्तीच्या मद्यावर ते गप्प का? असा सवाल पवार यांनी केला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात व देशात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाविकास आघाडी सरकारने उत्तराखंडला जाण्यासाठी विमान नाकारल्याची चर्चा सुरू आहे. एवढेच नाही तर विमानात बसलेल्या राज्यपालांना खाली उतरवण्यात आल्याचा आरोप दखील विरोधकांकडून करण्यात आला.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप मधील सर्वच नेत्यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर तोंडसुख घेतले. विशेष म्हणजे राज्यपालांच्या या विमान प्रवासावर सरकारकडून सविस्तर स्पष्टीकरण देखील देण्यात आले. तरीही सरकारवरील टीकेची विरोधकांची धार काही कमी झालेली नाही.

यावर आमदार रोहित पवार यांनी विरोधकांच्या दुटप्पीपणावर हल्लाबोल केला. पवार यांनी ट्विट करून विरोधकांना संविधानाची आणि विधान परिषदेतील आमदारांच्या नियुक्तीबाबतच्या बंधनाची आठवण करून दिली आहे. रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून विरोधकांचा समाचार घेतला.

ते म्हणाले, राज्यपालांच्या विमान प्रवासाबाबत सरकारने स्पष्टीकरण दिलं तरी सगळे विरोधक एकसूरात टिका करतायेत. पण विधानपरिषदेत आमदारांच्या नियुक्तीचं घटनात्मक बंधन वेळेत पाळलं जात नसताना विरोधी पक्षातील एकही नेता यावर का बोलत नाही? की संविधानाबाबत काहीच बोलायचं नाही असंच या सर्वांनी ठरवलंय? असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख