`प्रार्थनेसाठी मंदिरात जायचं नाही, तर मातोश्रीत जायचं का?` - Chandrakant Patil criticizes state govt for not opening temples | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

`प्रार्थनेसाठी मंदिरात जायचं नाही, तर मातोश्रीत जायचं का?`

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 30 ऑगस्ट 2021

महाविकास आघाडीला फक्त पैशाचा आवाज ऐकू येत असल्याची भाजपची टीका

पुणे : महाविकास आघाडी सरकारला केवळ नोटांचा आणि दारु दुकानदारांचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे त्यांना झोपेतून जागे करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून शंखनाद करण्यात येत आहे, असा घणाघात भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी केला. भारतीय जनता पार्टीच्यावतीने राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी आयोजित केलेल्या शंखनाद आंदोलनात पाटील पुण्यात सहभागी झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddav Thackeray) राज्यातील मंदिर उघडण्यासाठी सदबुद्धी मिळावी, यासाठी पाटील यांनी कसबा गणपतीला साकडे घालून गणपतीची महाआरती केली.  

या आंदोलनात पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, (Jagdish Mulik) संघटन सरचिटणीस राजेश पांडे, (Rajesh Pande) आमदार मुक्ता टिळक, (Mukta Tilak) महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne) सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar), युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे (Sushil Mengade) यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

ही पण बातमी वाचा : अण्णा हजारेही आमच्यासोबत, भाजपचा दावा

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जनजीवन सुरळीत झालं, त्यानंतरही सर्व सुरु झालं, मात्र मंदिरं सुरू झाली नाहीत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला रस्त्यावर उतरुन संघर्ष करावा लागल्याचे सांगत चंद्रकांत पाटील म्हणाले की, "हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव मुख्यमंत्री होण्याआधी मंदिरात जाऊन देवदर्शन घेण्याचे आग्रही होते. पण अल्पसंख्याकांच्या मतांसाठी धर्म न मानणाऱ्या पक्षांसोबत आघाडी केल्यानंतर मंदिरं उघडण्याला माझ प्राधान्य नाही, असं ते दाखवू लागले. आता त्यांना वारकऱ्यांचे, श्रद्धाळूंचे आवाज ऐकू येत नाहीत. त्यांना फक्त नोटांचे, नोटा देणाऱ्यांचे, दारु दुकानदारांचे आवाज ऐकू येतात."

ते पुढे म्हणाले की, "कोरोनाचे दोन्ही लाटेत सर्वांनी निर्बंधांचं कटाक्षाने पालन करुन, सरकारला सहकार्य केलं. मात्र, कोरोनाची लाट ओसरु लागल्यानंतर हे सरकार लोकांना त्यांना जगण्याचा अधिकार नाकारु लागल. त्यामुळे व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले. आताही मंदिरासंबंधीत जे छोटे-छोटे व्यवसाय आहेत, त्या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली असतानाही राज्य सरकार डोळे झाकून बसली आहे. हिंदू जसे मंदिरात जाऊन प्रार्थना करतात, त्याप्रमाणे मुस्लिम, ख्रिश्चन, शिख आणि जैन बांधव हे मश्चिद आणि चर्च, गुरुद्वारा, जैन मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करतात. या सर्वांनी प्रार्थनेसाठी मंदिरात जायचं नाही, तर मातोश्रीत जायचं का?" असा सवाल उपस्थित करत मंदिर उघडण्यासंदर्भातील आदेश तात्काळ जारी करावा, अन्यथा भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते मंदिराचे कुलूप तोडून, मंदिरे सर्व सामान्यांसाठी खुली करतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

यावेळी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवत, मंदिरे तातडीने उघडी करावीत अशी मागणी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख