मुंबईच्या धर्तीवर सोलापुरात जम्बो हॉस्पिटल उभारा - Build a jumbo hospital in Solapur on the lines of Mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबईच्या धर्तीवर सोलापुरात जम्बो हॉस्पिटल उभारा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 एप्रिल 2021

कर्जत व नाशिक धर्तीवर सोलापुरातील खासदार, आमदार यांनी हॉस्पिटल उभारण्यास पुढाकार घेणे गरजेचे आहे.

सोलापूर: सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, सध्या ऑक्‍सिजन व रेमडेसिवीरच्या प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.उपचाराअभावी रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. त्याचबरोबर सर्व शासकीय व खासगी रुग्णालयातील बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर सोलापूरमध्ये पाचशे ऑक्‍सिजन बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटल उभारावे,अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

शहराध्यक्ष श्‍याम कदम यांनी पालकमंत्री दत्ता भरणे व महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आली आहे. सोलापूर महापालिकेने १४ व्या वित्त आयोगाच्या योजनेतून किंवा अन्य योजनांच्या माध्यमातून सोलापूरमध्ये तात्काळ ५०० ऑक्‍सिजन बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटल उभे करणे गरजेचे आहे.

त्यामुळे एकाच छताखाली, एकाच ठिकाणी कोरोनावर दर्जेदार उपचार करून वाढता प्रादुर्भाव व मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. सध्या शाळा व महाविद्यालय तसेच मंगल कार्यालय हे बंद असून, सोलापुरातील विविध शाळा, मोठ्या महाविद्यालयांमध्ये व मंगल कार्यालयामध्ये जम्बो हॉस्पिटल उभी करता येतील.

सध्या मोठ्या मैदानावर कोविड हॉस्पिटल उभी करण्याची मागणी होत असली तरी अवकाळी पाऊस, वादळामुळे हॉस्पिटलचे नुकसान होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तसेच कोविड हॉस्पिटलसाठी केलेला त्याचा खर्च वाया जाऊ शकतो. त्यामुळे कर्जत व नाशिक धर्तीवर सोलापुरातील खासदार, आमदार यांनी हॉस्पिटल उभारण्यास पुढाकार घेणे गरजेचे आहे.

सोलापुरातील आरोग्य केंद्रात दर्जेदार उपचार केले जात नसल्याचा आरोपही संभाजी ब्रिगेडने केला आहे. जुनी मिल कंपाऊंडच्या जागेवर जम्बो कोविड सेंटर संदर्भात झालेलेली चर्चा तशीच राहिली. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने नेहरू हॉस्टेल येथे कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण पोलिसांच्या वतीने पंढरपूर येथे ३५ तासांमध्ये कोविड सेंटरची उभारणी केली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

पोलिस आयुक्तांनी कोविड सेंटरची उभारणी केली आहे. पण सोलापूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी असे कोणतेच कोविड सेंटर उभारले गेलेले नाही, याकडे देखील संभाजी ब्रिगेडने पत्रात प्रशासनाचे लक्ष वेघले आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख