बंद बालवाड्या, शाळांमध्ये कूलर बसविण्याचा पिंपरी पालिकेचा पुन्हा घाट - Pimpri Municipality's plan to install coolers in closed kindergartens and schools | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

बंद बालवाड्या, शाळांमध्ये कूलर बसविण्याचा पिंपरी पालिकेचा पुन्हा घाट

उत्तम कुटे
मंगळवार, 15 जून 2021

बालवाडीपासून प्राथमिक शाळा प्रत्यक्षात सुरु होण्याची शक्यता नाही. त्यापुढील वर्गही ऑनलाईन सुरु होणार असल्याने तूर्त, तरी पालिकेच्या ११० प्राथमिक आणि १८ माध्यमिक अशा १२८ शाळांत हे वॉटर फिल्टर, कूलर बसविण्याची आवश्यकता दिसत नाही. तरीही ते बसविण्याचा घाट घातला असल्याने तो टक्केवारीसाठीच असल्याच्या विरोधकांनी केलेल्या आरोपांना बळ मिळाले आहे. 

पिंपरी : सध्या कोरोनामुळे बालवाड्यांसह शाळा गेले वर्षभर बंद आहेत. त्या सुरु झाल्या, तरी ऑनलाईनच होतील. तरीही या बंद पालिका बालवाड्या व शाळांत अडीच कोटी रुपये खर्चून वॉटर फिल्टर Water Filter व कूलर Cooler बसविण्याचा दीड महिन्यापूर्वी २८ एप्रिलला दफ्तरी दाखल केलेला विषय भाजप सत्तेत असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या उद्याच्या (ता.१६) बैठकीत पुन्हा मंजूरीसाठी ठेवण्यात आला आहे. पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा हा प्रकार फक्त टक्केवारी आणि ठेकेदार पोसण्य़ासाठी असल्याचा आरोप मागीलवेळीच विरोधी बाकावरील राष्ट्रवादीने केला होता. त्यानंतरही हा विषय पुन्हा स्थायीच्या अजेंड्यावर घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. PCMC IS PLANNING TO INSTALL WATER FILTER,COOLER IN CLOSED SCHOOL. 

दरम्यान, या विषयांला कडाडून विरोध करीत त्यावर सडकून टीका केलेल्या शहरातील राष्ट्रवादी नेत्यांच्या पक्षाचे स्थायी समितीतील सदस्य याच नव्हे, तर इतरही सर्वच मंजूरीच्या प्रस्तावांवर दरवेळी सूचक मौन बाळगतात. ते उद्या, तरी या विषयाला विरोध करणार का याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :  कोरोना कमी होतोय ! दिवसभरात वाढले कोरोनाचे ४८३ रुग्ण

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट ही लहान मुलांना लक्ष्य करणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे बालवाडीपासून प्राथमिक शाळा प्रत्यक्षात सुरु होण्याची शक्यता नाही. त्यापुढील वर्गही ऑनलाईन सुरु होणार असल्याने तूर्त, तरी पालिकेच्या ११० प्राथमिक आणि १८ माध्यमिक अशा १२८ शाळांत हे वॉटर फिल्टर, कूलर बसविण्याची आवश्यकता दिसत नाही. तरीही ते बसविण्याचा घाट घातला असल्याने तो टक्केवारीसाठीच असल्याच्या विरोधकांनी केलेल्या आरोपांना बळ मिळाले आहे. 

आवश्य वाचा : विखे पाटील यांची वर्षभरातील ही आहे सर्वात मोठी उपलब्धी

याजो़डीने सुरु होण्याची अजिबात शक्यता नसलेल्या बालवाड्यांतील बालकांना स्वच्छता किट देण्याचा वॉटर फिल्टरसारखाच मलईदार विषय उद्याच्या स्थायीत मंजूरीसाठी आला आहे. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे जून २१ ते एप्रिल २२ या कालावधीत दर तीन महिन्यांनी हे किट देण्यात येणार आहे. त्यावर किती खर्च होणार आहे, याचा उल्लेख, मात्र महिला व बालकल्याण समितीने अगोदरच मंजूर केलेल्या या ठरावात खूबीने टाळण्यात आला आहे. 

कोरोना काळातही श्रीमंत पिंपरी पालिकेची अनावश्यक खरेदीवर कोट्यवधी रुपयांची कशी उधळपट्टी सुरु आहे, हे कोरोनामुळे बंद शाळांना कोट्यवधी रुपयांचे नवे फर्निचर आणि तेथील मुलांना डायरी DIARY खरेदी करण्याचे दोन मलईदार विषय स्थायीसमोर गेल्या महिन्यात आल्याने दिसून आले होते. प्रत्येक विद्यार्थ्याला डायरी दिली, तर पालिका शाळांचा दर्जा खासगी शाळांसारखा होऊन त्यांची पटसंख्याही  सुधारणार असल्याचा अजब दावा हा प्रस्ताव देताना करण्यात आला होता.

यासह कोरोना काळातही हारतुऱ्यांवर वर्षाला साडेअकरा, तर दोन वर्षात २३ लाख रुपये पालिका खर्च करणार होती. सध्याच्या महापौर माई ढोरे व याअगोदरचे राहूल जाधव आणि नितीन काळजे यांनी कार्यक्रमात भेट म्हणून पुस्तके देण्याचा, घेण्याचा चांगला पायंडा पाडलेला आहे. त्याला बळ देण्याऐवजी पालिकेच्या विविध कार्यक्रमांतील हारतुऱ्यांवर लाखो रुपये खर्चून आपल्याच आजी, माजी महापौरांच्या निश्चयाला भाजपची स्थायी समिती हरताळ फासणार होती.

याबाबत ११ मे रोजी 'सरकारनामा' ने श्रीमंत पिंपरी पालिकेची कोरोनातही उधळपट्टी सुरुच, हारतुऱ्यांवर वर्षाला करणार अकरा लाख रुपये खर्च` या मथळ्याखाली बातमी दिली होती. तिचा नेमका परिणाम झाला आणि ही गरज नसलेली खरेदी थांबली. कारण दुसऱ्याच दिवशी (ता.१२) स्थायीने हे विषय दफ्तरी दाखल केले होते. मात्र, असाच दफ्तरी दाखल केलेला वॉटर फिल्टर व कूलरचा विषय पुन्हा स्थायीसमोर उद्या आल्याने बाकीचेही अनावश्यक व करदात्यांच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणारे प्रस्तावही पालिका निवडणूक जवळ आल्याने हळूच पुन्हा मंजूरीसाठी येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख