जागरण, गोंधळानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आता पिंपरी पालिकेसमोर खाऊ गल्ली आंदोलन

पिंपरी-चिंचवडपालिकेची निवडणूक सहा महिन्यांवर आल्याने आठ दिवसांत एकाच मुद्यावरून राष्ट्रवादीने आज (ता. १) पुन्हा आंदोलन केले.
जागरण, गोंधळानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आता पिंपरी पालिकेसमोर खाऊ गल्ली आंदोलन
After the Jagran and chaos, the Khau Galli Andolan of NCP is now in front of Pimpri Municipality

पिंपरी : भाजप सत्ताधारी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसने बुधवारी (ता.१) पालिकेवर मोर्चा काढून प्रवेशद्वाराजवळ जोरदार आंदोलन केले. यावेळी स्थायी समितीसह पालिका बरखास्तीची मागणी पुन्हा करण्याद आली. धरा दाम करा दाम.., चोरांचा पक्ष भाजप पक्ष.., गली गली मे शोर है भाजप चोर है.. अशा जोरदार घोषणांनी पालिका परिसर काहीकाळ दणाणून गेला होता. After the Jagran and chaos, the Khau Galli Andolan of NCP is now in front of Pimpri Municipality

पिंपरी-चिंचवड पालिकेची निवडणूक सहा महिन्यांवर आल्याने आठ दिवसांत एकाच मुद्यावरून राष्ट्रवादीने आज (ता. १) पुन्हा आंदोलन केले. २५ तारखेला त्यांनी ते केले होते. त्यावेळी व यावेळीही सोशल डिस्टंसचा फज्जा उडविण्यात आला होता. तर, अनेकांनी मास्कही लावलेले नव्हते. एरव्ही विनामास्क दंडाची कारवाई सर्वसामान्यांवर होते. सोशल डिस्टंस न पाळता कार्यक्रम केला, तरी ती होते. मात्र, राजकीय पक्ष आणि त्यांच्या आंदोलनाला यातून सूट देण्यात आली आहे का, अशी विचारणा आजच्या आंदोलनानंतर ऐकायला मिळाली.  

१८ तारखेला पालिकेतील लाचखोरी प्रकरण उघडकीस आले. स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे व स्थायीतील चार कर्मचारी पालिकेच्या एका ठेकेदाराकडून एक लाख १८ हजाराची लाच घेताना पकडले गेले. मंजूर सहा निविदा रकमेच्या दोन टक्के रक्कम ही लाच म्हणून त्यांनी घेतली होती. त्यानंतर आठ दिवस उशीराने गेल्या बुधवारी राष्ट्रवादीने पालिकेवर मोर्चा काढून प्रवेशव्दारावर आंदोलन केले.पालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात जागरण,गोंधळ त्यांनी घातला. स्थायीसह पालिका बरखास्तीची मागणी त्यावेळी त्यांनी केली होती. त्याच मुद्यावरून राष्ट्रवादीने आठ दिवसांतच पुन्हा पालिकेवर आज मोर्चा काढून पुन्हा तीच मागणी केली. 

पक्षाचे शहरातील एकमेव आमदार अॅड. अण्णा बनसोडे हे गतवेळप्रमाणे यावेळीही आंदोलनाला अनुपस्थित राहिले. त्यामुळे ते ठळकपणे जाणवले. परिणामी त्याची चर्चाही झाली.पक्षाच्या कार्यक्रमात सुद्धा ते दिसून येत  नाहीत. माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील,विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक मयूर कलाटे, अजित गव्हाणे, प्रवक्ते फजल शेख, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी अध्यक्ष यश साने, पदवीधर अध्यक्ष माधव पाटील यांच्यासह नगरसेवक या आंदोलनात सामील झाले होते. 

तत्पूर्वी त्यांनी पालिका मुख्यालयाजवळच असलेल्या पिंपरी चौकातून पालिकेवर मोर्चा काढला. त्यात दाम धरा काम करा व खाऊगल्ली असे लिहून खोट्या नोटा ठेवलेली हातगाडी लक्ष वेधून घेत होती. स्थायीतील भ्रष्टाचार उघड झाल्याने यापुढे या समितीच्या बैठकांना पक्षाचे चारही सदस्य उपस्थित राहणार नाहीत, असे वाघेरे यांनी आंदोलनानंतर पत्रकारांना सांगितले. आमच्या सदस्यांना लाचखोरीप्रकरणी चौकशीला बोलावले, तर ते सहकार्य करतील, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपने त्यांच्या स्थायीच्या सदस्यांचे राजीनामा घ्यावेत, आम्हीही ते द्यायला तयार आहोत, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

दरम्यान, स्थायीवरील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (एसीबी) छापा आणि लाचेचा सापळा यानंतर स्थायीच्या आतापर्यंतच्या सर्वच सभापती तथा अध्यक्षांची नार्को चाचणी करण्याची मागणी भाजपचे सभागृहनेते नामदेव ढाके यांनी केली होती. तो संदर्भ देत माझ्यासह सर्व त्याला तयार आहोत, असे आव्हान स्थायीचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी भाजपला यावेळी दिले. स्थायीचे माजी अध्यक्ष, भाजपचे आमदार व शहर कारभारी असलेले महेश लांडगे व लक्ष्मण जगताप यांचीही नार्को करण्याची मागणी त्यांनी केली. स्थायीत राष्ट्रवादीचे सदस्य असले,तरी भ्रष्टाचार उघडकीस आला पाहिजे, असे बहल म्हणाले. तीच आमच्या नेत्यांचीही भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. तर,स्थायी बरखास्तीची मागणी मिसाळ यांनी केली.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in