कवठे : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशिवायही अनेक विषय आहेत. चंद्रकांत पाटील मात्र पुण्याच्या, कोल्हापूरच्या की राज्याच्या राजकारणात राहायचे की परत जायचे याविषयीच्या चर्चेत राहून स्वतःला सीमित करत आहेत. मला चंद्रकांत पाटील यांच्यापूरते का मर्यादित ठेवतायं. दुसरे काही प्रश्न महाराष्ट्रात आहेत का नाहीत. प्रत्येक वेळी चंद्रकांत पाटलांच्या बाबतीत प्रश्न विचारण्याची काहीही आवश्यकता नाही. आता चंद्रकांत पाटील यांना थोडी विश्रांती द्या, असा खोचक टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला.
जयंत पाटील आज जोशीविहिर (ता. वाई) येथील कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, नितीन पाटील, शशिकांत पिसाळ, धनंजय पिसाळ उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, कोरोना प्रादुर्भावाच्या झालेल्या परिणामातून बाहेर पडून सरकार आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष जबाबदारीने विकासाला गती देण्याचे काम करीत आहेत, असे असताना सगळीकडे गेल्यावर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील असे म्हणाले याविषयीच विचारतात. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशिवायही राज्यात अनेक विषय आहेत.
त्यामुळे आम्ही राज्याच्या महत्वाच्या विषयांना प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. राज्य सरकारचे एक वर्षे कोरोना आपत्तीतून बाहेर पडण्यात गेले आहे. त्यामुळे सरकार आता पूर्ण गतीने कामाला लागले आहे. महाविकास
आघाडीच्या घटक पक्षात चांगला समन्वय आहे. राज्यात अनेक वर्षे धरणांची व उपसा सिंचन, कालव्यांची कामे प्रलंबित आहेत. या प्रलंबित कामांना चालना देण्याला आमचे प्राधान्य असेल.
मला चंद्रकांत पाटील यांच्यापूरते का मर्यादित ठेवताय. दुसरे काही प्रश्न
महाराष्ट्रात आहेत का नाहीत. प्रत्येक वेळी चंद्रकांत पाटलांच्या बाबतीत प्रश्न विचारण्याची काहीही आवश्यकता नाही, आता चंद्रकांत पाटील यांना थोडी विश्रांती द्या, असा खोचक टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला.
भिडे, एकबोटेंवर कारवाई होणार....
संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाईसाठी महाविकास आघाडी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. दोघांविरोधात आरोप दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. त्यामुळे जे पुरावे समोर येतील त्यानुसार कारवाई केली जाईल. कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, त्यांच्यावर काय कारवाई होणार हे त्या विभागाचे मंत्री सांगू शकतील.

