.....तर महाराष्ट्राच्या विधानसभेत ओबीसींचे दोनशेच्यावर आमदार दिसतील : डॉ. अर्चना पाटील  - Over 200 OBC MLAs will be seen in Maharashtra Legislative Assembly: Dr. Archana Patil | Politics Marathi News - Sarkarnama

.....तर महाराष्ट्राच्या विधानसभेत ओबीसींचे दोनशेच्यावर आमदार दिसतील : डॉ. अर्चना पाटील 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता देण्यात यावे, अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे. ओबीसींनी यासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे. ओबीसीतील सुशिक्षित घटकांनी एकत्र येऊन दबाव वाढवण्याची गरज आहे. 

सातारा : महाराष्ट्राच्या २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसींनी ठरवले तर २०० च्या वर आमदार ओबीसी समाजाचे निवडून येतील. एवढी ताकत ओबीसी समाजात आहे. ओबीसी समाजातील सर्व घटकांतील युवकांनी एकत्र येऊन समाज परिवर्तन करावे व राजकारण या विषयांकडे गांभीर्याने बघितले पाहिजे, असे झाले तरच ओबीसींचे सर्व प्रश्न सुटतील, असे मत राष्ट्रवादीच्या सातारा जिल्हा महिला आघाडी निरीक्षक डॉ. अर्चना पाटील यांनी व्यक्त केले आहे.  

डॉ. अर्चना पाटील म्हणाल्या, मराठा आरक्षणाचे बाळासाहेब सराटे यांनी धनगर आणि वंजारी समाजाचे आरक्षण काढून टाका, अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात इतपत मजल गेली आहे. जाती- जातींमध्ये तेड निर्माण करण्याचे काम सराटे सारखी लोक करतात. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही.

मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता देण्यात यावे, अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे. ओबीसींनी यासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे. ओबीसीतील सुशिक्षित घटकांनी एकत्र येऊन दबाव वाढवण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाला राजकीय व सामाजिक न्यायापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान केले आहे, असा आरोप डॉ. अर्चना पाटील यांनी केला आहे. 

महाराष्ट्रात अनुसूचित जमातींसाठी २५ व अनुसूचित जातींसाठी २९ अशा ५४ आरक्षित जागा आहेत. उरलेल्या २३४ जागांपैकी किमान २०० च्यावर ओबीसींचे आमदार निवडून येऊ शकतात, असे ही त्यांनी नमुद केले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख