जुन्नर : ग्रीन झोनमध्ये असलेल्या जुन्नर तालुक्यात अखेर पाहुण्यांच्या रूपाने कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मुंबईहुन धोलवड ता.जुन्नर येथे आलेल्या दोन जणांचे तपासणी अहवाल ता.२३ रोजी पॉझिटिव्ह आले आहेत. तर गोळेगाव व उच्छिल येथील प्रत्येकी एका रुग्णाचे अहवाल निगेटिव्ह आल्याने दोन्ही गावांनी सुस्कारा सोडला आहे.
जुन्नर मधील दोघांचे अहवाल काल शनिवार पर्यत (ता.२३) आले नसल्याने जुन्नरवासीय चिंतेत आहेत. लॉकडाऊन शिथील केल्याने पुण्या-मुंबईकडून वैध-अवैध मार्गाने जुन्नरकर मंडळी कोरोना बाधित क्षेत्रातून रात्री अपरात्री कुटूंबासह गावी येत आहेत. दोन महिन्यांपासून पोलिस, महसूल प्रशासन आणि आरोग्य विभागातील अधिकाऱी कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे तालुक्यात कोरोनाचा अटकाव झाला होता. स्थानिक तरूण मंडळीं, गावोगावचे लोकप्रतिनिधी यांनी परप्रांतीय मजुरांची सुरक्षितपणे त्यांच्या घरी पाठवणीही केली.
पोलिसांच्या चेकपोस्टमुळे पुण्या-मुंबईतील जुन्नरवासीय येण्यावर निर्बंध आले होते. तथापि गेल्या आठवडा भरापासून तालुक्यात मोठ्या संख्येने नागरिक आले आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली आहे. त्यामुळे कोरोटाईन करूनही ते फिरत असतात. पुण्यामुंबईमध्ये दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. लॉकडाऊनमधील शिथिलतेचा फायदा घेवून पुण्यातील बाधित क्षेत्रातील काही मंडळींची पावले पुन्हा गावाकडे वळू लागली आहे.
ही मंडळी रात्री अपरात्री घरी येत आहेत. नव्याने आलेल्या लोकांबद्दल ग्रामस्थांची दबकी चर्चा सुरू असते. दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये शक्यतो घराबाहेर पडू नये प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन आमदार अतुल बेनके यांनी केले आहे.

