होत्याचं नव्हतं केल्याने भाजपला पवारसाहेबांची भीती वाटते : धनंजय मुंडे - BJP fears Pawar Saheb says Dhananjay Munde | Politics Marathi News - Sarkarnama

होत्याचं नव्हतं केल्याने भाजपला पवारसाहेबांची भीती वाटते : धनंजय मुंडे

उत्तम कुटे
बुधवार, 9 डिसेंबर 2020

एखाद्याचं श्रवण (कान) काम करीत नसेल, तर त्याच्या श्रवणाखाली देण्याची (कानफटवणे) तरतूद पाहिजे, असे समयोचित विधान मुंडे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची दखल न घेणाऱ्या केंद्र सरकारवर करताच उपस्थितांत हास्यस्फोट झाला. 

पिंपरी : विधानसभेला पवारसाहेबांनी होत्याचं नव्हतं केल्याने सत्ताधाऱ्यांना आमच्या या ८० वर्षाच्या नेत्याची भीती वाटते, असा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज भाजपला भोसरी येथे लगावला. 

गडाच्या मालकाने मागितले, तर गडकरी नाही म्हणू शकत नाही. साडेसहाशे कोटी रुपये तर काहीच नाहीत, असं वक्तव्य मुंडेंनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पुणे-नाशिक महामार्गासाठी साडेसहाशे कोटी रुपये आणणारे पक्षाचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासंदर्भात करताच उपस्थितांनी त्याला मोठी दाद दिली. 

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिरुर लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठांना तीन कोटी रुपयांची अत्याधुनिक डिजिटल श्रवणयंत्र वाटपास पिंपरी चिंचवडला भोसरीत सुरवात झाली. त्याप्रसंगी मुंडे बोलत होते. खासदार सुप्रिया सुळेंच्या संकल्पनेतून आणि कोल्हेंच्या प्रयत्नातून ही यंत्रे देण्यात आली.  भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे यांच्या राजमाता जिजाऊ महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा.कोल्हे, शिरूरचे आमदार अशोकबापू पवार, श्री. लांडे आदी उपस्थित होते.

एखाद्याचं श्रवण (कान) काम करीत नसेल, तर त्याच्या श्रवणाखाली देण्याची (कानफटवणे) तरतूद पाहिजे, असे समयोचित विधान मुंडे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची दखल न घेणाऱ्या केंद्र सरकारवर करताच उपस्थितांत हास्यस्फोट झाला. विनायक रणसुंभे आणि दीपक साकोरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शैलेश मोहिते यांनी आभार मानले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख