खंडणीप्रकरणी पुण्यातील गजा मारणे टोळीतील 13 जणांची कोठडी रवानगी 

एका अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने 25 लाख रुपये घेऊन भेटायला ये, असे सांगितले; परंतु या लोकांना भेटायला गेल्यावर काही घातपात होऊ शकतो, म्हणून त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
खंडणीप्रकरणी पुण्यातील गजा मारणे टोळीतील 13 जणांची कोठडी रवानगी 
13 members of Pune gang arrested in ransom case

वाई : बांधकाम व्यावसायिकाला धमकी देऊन खंडणीची मागणी करण्यासाठी आलेल्या पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणेच्या टोळीतील 13 संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयाले तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. 

जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन करून खंडणी उकळण्यासाठी आलेल्या पुण्यातील गजा मारणे टोळीतील १३ जणांना वाई पोलिसांनी जेरबंद केले होते. याप्रकरणी प्रवीण दिनकर शिंदे (रा. सोनगीरवाडी, वाई) यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, दीड वर्षापूर्वी साडू लक्ष्मण पार्टे (रा. तायघाट, ता. महाबळेश्वर) यांच्या मालकीची पाचगणी येथील शाळा चालविण्यास दिली होती.

त्यावेळी पुण्यातील एकाशी ओळख झाली होती. त्यानंतर त्याने पुण्यातील गुंड गज्या मारणे यांच्यासोबत काम करीत असून, तुला महाबळेश्वर येथे कन्स्ट्रक्‍शन व जमीन खरेदी- विक्रीचे व्यवहार चालू ठेवायचे असतील तर दरमहा 25 लाख रुपये अथवा प्रत्येक व्यवहारामागे पैसे द्यावे लागतील. नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. त्यावेळी याकडे  त्यांनी दुर्लक्ष केले होते.

मात्र, गुरुवारी (ता. 29) दुपारी पावणेदोनच्या सुमारास काही लोक तुला भेटायला घरी आले होते, त्यांनी तुझा मोबाईल नंबर घेतला आहे, असे वडिलांनी फोन करून सांगितले. त्यानंतर एका अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने 25 लाख रुपये घेऊन भेटायला ये, असे सांगितले; परंतु या लोकांना भेटायला गेल्यावर काही घातपात होऊ शकतो, म्हणून त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

त्यानुसार वाईचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पुणे- महाबळेश्वर रस्तावरील भीमनगर तिखटण्यात साध्या गणवेशातील कर्मचाऱ्याना नेमून खंडणी वसुलीसाठी तीन चारचाकी गाडीतून आलेल्या 13 जणांना सापळा रचून पकडले. त्यांनी गुन्हासाठी वापरलेल्या 19 लाखांच्या तीन चारचाकी गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून वाई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक संजय मोतेकर करीत आहेत. या गुन्ह्यातील 13 संशयितांना काल (शुक्रवारी) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांना तीन मे पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. 

यामध्ये वाघू तुकाराम हळंदे (वय 41, रा. जकातनाका वारजे, पुणे), गोरखनाथ माणिक शिळीमकर (वय 37), अमोल बंडू शिळीमकर (वय 33), विशाल चंद्रकांत शेळके (वय 23), सौरभ तानाजी शिळीमकर (वय 22), सचिन अंकुश शिळीमकर (वय 35 सर्व रा. तांबड, ता. भोर, जि. पुणे), बालाजी कमलाकर कदम (वय 28 रा. दत्तवाडी, सिंहगडरोड, पुणे), मंदार सुरेश बांदल (वय 33), राहुल रामकृष्ण कळवणकर (वय 26), रोहन रमाकांत वाघ (वय26, रा. विंग, ता. खंडाळा, जि. सातारा), तुषार बाळासाहेब बदे (वय 30), आनंद तुळशीदास यादव (वय 35), विक्रम विलास समुद्रे (वय 30, रा. दत्तवाडी, पुणे) अशी त्यांची नावे आहेत. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in