पवारांनीच फोन केला; नगर - बीड - परळी लोहमार्गासाठी पासवानांना भेटा.. - Pawar himself called; Meet Paswan for Nagar - Beed - Parli Railway .. More about this source text | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

पवारांनीच फोन केला; नगर - बीड - परळी लोहमार्गासाठी पासवानांना भेटा..

दत्ता देशमुख
शनिवार, 12 डिसेंबर 2020

शरद पवार यांनी कायम राजकारण आणि पक्षविरहित सर्वांशी संबंध ठेवले. त्यांच्याकडे कुठलीही मागणी केली, प्रश्न मांडल्यानंतर त्याची सोडवणूक करुन ते स्वत: कळवितात.
 

बीड : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी पक्ष आणि राजकारणाच्या बाहेर जात संबंध जपले आणि मदत केली. म्हणूनच त्यांचा दबदबा कायम आहे. त्यांच्याकडे कुठलाही प्रश्न मांडून मागणी केल्यानंतर त्याची सोडवणूक करुन स्वत: काम झाल्याचे सांगणारे शरद पवार नेते असल्याचे काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारीणीच्या कायम निमंत्रित सदस्या आणि जम्मू काश्मिरच्या काँग्रेस प्रभारी रजनी पाटील यांनी ‘सरकारनामा‘शी बोलतांना सांगीतले.

शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्त त्यांनी शरद पवार यांच्यासोबतच्या काही आठवणींना उजाळा दिला. १९९७ साली रजनी पाटील बीड लोकसभा मतदार संघातून भाजपच्या उमेदवारीवर खासदार म्हणून विजयी झाल्या. केंद्रात अनेक पक्षांनी एकत्र येऊन सरकार बनविले आणि इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान होते. तर, सीसीईएचे (कॅबीनेट कमिटी ऑफ इकॉनॉमी) शरद पवार अध्यक्ष होते.

शरद पवारांना महाराष्ट्राच्या आणि विशेषत: मराठवाड्याच्या विकास प्रश्नांबद्दल कायम तळमळ राहीलेली असल्याचे रजनी पाटील सांगतात. असेच अहमदनगर - बीड - परळी लोहमार्ग हा बीड जिल्हावासियांच्या जिव्हाळ्याचा आणि जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेणारा प्रकल्प आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबीत हा प्रश्न हा माझ्या निवडणुक प्रचारातही महत्वाचा मुद्दा बनलेला होता. मात्र, केंद्रात सरकार वेगळ्या पक्षाचे होते. पण महाराष्ट्रातील खासदारांना शरद पवारांची कायम केंद्रात आणि दिल्लीत मदत राहीलेली आहे. अगदी कोणी कोणत्याही पक्षाचा असला तरी पवारांकडे मदत मागण्यासाठी गेलेल्यांना पवारांनी कधी मोकळ्या हाताने माघारी पाठविले नाही.

त्यावेळी मी पहिल्यांदाच संसदेची पायरी चढलेली होते. शरद पवार त्यावेळी काँग्रेसचे आणि मी भाजपची सदस्या होते. मात्र, आम्ही सर्व मिळून मग शरद पवारांना भेटलो आणि बीड - अहमदनगर - परळी लोहमार्गाबाबत अट घातली. या महामार्गाला अगोदर कॅबीनेट कमीटी ऑफ इकॉनॉमीची (सीसीईए) मान्यता लागत असल्याचे आम्हाला माहित होते. सदर मान्यता द्यावी आणि तत्कालिन केंद्रीय रेल्वेमंत्री रामविलास पासवान यांना या मार्गासाठी निधी व मान्यता द्यावी यासाठी मदत करावी, असे साकडे घातले.

नंतर काही दिवसांनीच शरद पवारांचा फोन आला, ‘बीड - नगर - परळी’ लोहमार्गाला सीसीईएची मान्यता भेटली आहे, माझे रामविलास पासवान यांच्याशी बोलणे देखील झाले आहे, तुम्ही त्यांना भेटून घ्या. एखादा प्रश्न मांडल्यानंतर त्याची सोडवणूक करुन परत स्वत:हून सांगणारे शरद पवार आहेत. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा असल्याचे रजनी पाटील सांगतात. मागे राज्यसभेत आम्ही दोघेही सदस्य होतो. तेव्हाही दोघांचे पक्ष वेगळे, ते राष्ट्रवादी आणि मी काँग्रेस. पण, वैयक्तीक संबंधात आणि जिव्हाळ्यात त्यांनी कधीच दुरावा जाणवू दिला नाही.

दुपारच्या जेवणाच्या सुटीत भेट होताच ’चला आपल्या घरी जेवण घेऊ, असे म्हणून पवार सोबत नेत. दिल्लीत कधीही भेट झाली तर काही अडचण अशी शरद पवारांकडून कायम विचारणा होते, असेही रजनी पाटील म्हणाल्या.

Edited By: Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख